सुवर्ण कन्या "विनेश फोगट"

योगेश कानगुडे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत देशाला पदक मिळवून देणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते. पदकाच्या स्वप्नपूर्तीसाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या यादीत आता पुरुषांसोबत महिलांची संख्याही लक्षणीय दिसत आहे. या दृष्टीने गेले २०१६ चे रिओ ऑलिम्पिक मैलाचा दगड ठरू शकेल. केवळ या स्पर्धेत दोन भारतीय महिलांनी पदक मिळवले म्हणून नाही, तर एकूणच भारतीय महिला खेळाडूंच्या वाढत्या आत्मविश्वासाचा ठसा या स्पर्धेत उमटला होता. त्यानंतर झालेल्या कॉमन वेल्थ गेम्समध्ये महिलांचा दबदबा दिसला. आता सुरु असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेतही दमदार कामगिरी सुरूच आहे.  

ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत देशाला पदक मिळवून देणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते. पदकाच्या स्वप्नपूर्तीसाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या यादीत आता पुरुषांसोबत महिलांची संख्याही लक्षणीय दिसत आहे. या दृष्टीने गेले २०१६ चे रिओ ऑलिम्पिक मैलाचा दगड ठरू शकेल. केवळ या स्पर्धेत दोन भारतीय महिलांनी पदक मिळवले म्हणून नाही, तर एकूणच भारतीय महिला खेळाडूंच्या वाढत्या आत्मविश्वासाचा ठसा या स्पर्धेत उमटला होता. त्यानंतर झालेल्या कॉमन वेल्थ गेम्समध्ये महिलांचा दबदबा दिसला. आता सुरु असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेतही दमदार कामगिरी सुरूच आहे.  

एकंदर क्रीडा क्षेत्राचा विचार करायचा, तर या क्षेत्रात दीर्घकाळ पुरुषांचाच प्रभाव राहिला आहे. स्त्रिया म्हणजे नाजूक, अबला... अंगमेहनतीच्या कामांसाठी पुरुषांवर अवलंबून असणाऱ्या असे मानले जाते. स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक रचनेचा विचार करता त्यात तथ्यही आढळते. निसर्गाने स्त्रीच्या शरीराची रचना प्रजननाच्या दृष्टीने केलेली आहे. त्यामुळे शारीरिक शक्तीच्या बाबतीत तिला अनेक मर्यादा असतात. या मर्यादांची जाणीव असतानाही, करिअर म्हणून आज अनेक जणी या क्षेत्राची निवड करतात. जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर सर्व मर्यादा तोकडया ठरवत यशाचा नवा इतिहास रचतात. गेल्या काही दशकांत अनेक महिला खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ला सिध्द केले. विविध क्रीडाप्रकारांतील भारतीय महिला खेळाडूंची कामगिरी पाहता या क्षेत्रातील पुरुषी मक्तेदारी आता संपुष्टात आली आहे. असाच इतिहास विनेश फोगट हिने आशिया क्रीडा स्पर्धेत रचला आहे. 

आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत विनेशने जपानच्या युकी आईरीवर मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली. पहिल्या डावात विनेशने बेसावध असलेल्या जपानच्या आईरीला चितपट करण्याचा प्रयत्न केला. विनेशचा हा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरीही यातून तिने ४ गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. मात्र दुसऱ्या डावात अखेरच्या सेकंदांमध्ये विनेशने जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चीतपट करत सामना आपल्या नावावर केला. विनेश केलेली कामगिरी ही विशेष आहे कारण तिचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिच्या आयुष्यात एक काळ असा होता की डॉक्टरांनी तिला कुस्ती न खेळण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांचे म्हणणे असे होते कि परत कुस्ती खेळण्यास सुरुवात केली तर ते जीवावर बेतू शकते. २०१६ झालेल्या ऑलिम्पिक फ्री स्टाईल कुस्तीमध्ये ४८ किलो वजनी गटात चीनची पैहलवान सुन यानान विरुद्ध खेळताना जखमी झाली होती. जवळपास ती एक वर्षभर कुस्तीपासून दूर होती. विनेशला हा सर्वात मोठा धक्का होता. साहजिकच यामुळे तिच्या मनाची घालमेल होत होती. विनेश मात्र हार मानायला तयार नव्हती. संघर्षाशिवाय पर्याय नाही हे तिला माहित होते.  गुरु व चुलते महावीर फोगट आणि बहिणींनी परत एकदा नव्या उमेदीने लढण्यासाठी प्रोत्साहित केले. 

जखमी अवस्थेतून बाहेर पडल्यानंतर तिने दररोज पाच ते सहा तास न थकता सरावाला सुरुवात केली. यातूनच कॉमन वेल्थ गेम्सची तयारी ही सुरु केली.  विनेशचा खेळ हा आक्रमक स्वरुपाचा होता. न थांबता लढणं हे तिचं मुळ वैशिष्ट्य होतं, पण तिने आपल्या खेळात बराच बदल केलेला आहे. समोरील खेळाडूच्या हालचाली व परस्थिती पाहुन ती आपले डावपेच आखते आहे. तिचा खेळ लवचिक व चपळ आहे. पटात सुर मारत पाठीवर जात ती गुणांची कमाई करते तसेच भारंदाज तर कधी एकचाक डाव मारत ती गुण मिळवण्याच्या प्रयत्नांत असते. फक्त तयारीच केली नाही तर सुवर्ण पदक जिंकत स्वतःला सिद्ध केले. कॉमन वेल्थ गेम्सनंतर ती आशिया क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली. या स्पर्धेची सुरुवात ऑलिम्पिक स्पर्धेत जिच्याकडून जखमी झाली होती त्या सुन यानानला हरवून केली. या सामन्यानंतर विनेशची आई व बहिण यांनीही जोरदार सेलिब्रेशन केले. पुढे स्पर्धेत सर्वच विरोधी स्पर्धकांवर मत करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. आता तिचे लक्ष्य आहे २०२० ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचे. त्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा.

Web Title: Wrestler Vinesh Phogat wins gold in Asian Games