
Wrestlers Protest : अखेर कुस्तीपटू गेले गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या चर्चेत काय केली मागणी?
Wrestlers Met Amit Shah : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी करणारे कुस्तीपटू शनिवारी रात्री उशिरा गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. 28 मे रोजी खाप पंचायतींनी पदक दाखविण्यासाठी जाणाऱ्या कुस्तीपटूंना रोखले आणि पाच दिवसांचा वेळ मागितला. हा कालावधी संपण्यापूर्वीच खेळाडू अमित शाहांना भेटायला पोहोचले.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत, ज्यामध्ये अल्पवयीन कुस्तीपटूच्या आरोपांवर आधारित POCSO (मुलांच्या लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण) कायद्यांतर्गत एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ही बैठक दोन तास चालली आणि मध्यरात्रीनंतर संपली. या बैठकीत बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि काही प्रशिक्षक उपस्थित होते. बैठकीत काय चर्चा झाली, असे विचारले असता बजरंग म्हणाले- 'आम्ही गृहमंत्र्यांशी बोललो आहोत. याशिवाय मी आणखी काही सांगू शकत नाही.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुस्तीपटूंनी अमित शाहा यांच्याकडे ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याची मागणी केली आहे. यानंतर गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन पैलवानांना दिले. पोलिसांना तपासासाठी वेळ देण्याची गरज आहे.
या बैठकीनंतर बजरंग पुनिया रविवारी महापंचायतमध्ये सहभागी होण्यासाठी सोनीपतला पोहोचले. यापूर्वीच्या महापंचायतींना येथे उपस्थित न राहिल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असून, सध्या कोणताही निर्णय घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खेळाडूंची लवकरच महापंचायत होणार असल्याचे बजरंग यांनी येथे सांगितले. स्थळ आणि तारीख ठरल्यानंतर तो सर्वांना याची माहिती देईल. बजरंग पुनिया सांगितले की, सर्व संघटनांना लवकरच एका व्यासपीठावर आणण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांच्यात फूट पडू नये. या पंचायतीत पुढील निर्णय घेतला जाईल.