
WTC Final 2023: ओव्हलवर टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! 'या' कांगारू खेळाडूच्या कामगिरीने फुटला घाम
Ind vs Aus WTC Final 2023 : भारतीय संघ बुधवार सात जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. डब्ल्यूटीसीमध्ये टीम इंडियाची ही सलग दुसरी फायनल असणार आहे. गेल्या वेळी 2021 मध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ आयसीसी ट्रॉफीसाठी 10 वर्षांची प्रतीक्षा संपवणार आहे. त्याआधी केनिंग्टन ओव्हल क्रिकेट ग्राऊंडवरील काही खेळाडूंचे रेकॉर्ड पाहिल्यास ऑस्ट्रेलियाचा एक फलंदाज टीम इंडियासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा त्या खेळाडूपेक्षा खूप मागे आहेत.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ जो ओव्हल मैदानावर टीम इंडियासाठी धोका बनू शकतो. त्याचा येथील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याची सरासरीही या मैदानावर 100 च्या आसपास आहे. त्याने येथे तीन सामने खेळले असून पाच डावात 97.75 च्या सरासरीने 391 धावा केल्या आहेत.
स्टीव्ह स्मिथने येथे दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. विराट कोहलीची येथे सरासरी 28.16 आहे, तर रोहित शर्माने या मैदानावर 69 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. म्हणजेच स्मिथ या दोन्ही खेळाडूंपेक्षा खूप पुढे आहे.
इतकंच नाही तर स्टीव्ह स्मिथच्या नावावर टीम इंडियाविरुद्ध कसोटीतही मोठा विक्रम आहे. त्याने आतापर्यंत भारताविरुद्धच्या 18 कसोटीत 65.06 च्या सरासरीने 1887 धावा केल्या आहेत. एकूण 8 शतके आणि 5 अर्धशतके भारतीय संघाविरुद्ध त्याच्या बॅटने झळकावली आहेत.
स्मिथच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 96 कसोटी सामने खेळताना 59.80 च्या सरासरीने 8792 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर 30 शतके आणि 37 अर्धशतके आहेत. पण टीम इंडियासाठी एक सकारात्मक बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावसकर करंडक स्पर्धेतील त्यांची कामगिरी काही खास नव्हती.
विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर या दोन खेळाडूंच्या खांद्यावर संपूर्ण भारताची स्वप्ने असणार आहे. रोहितने ओव्हल मैदानावर एक कसोटी सामना खेळला आहे आणि 2021 मध्ये त्याने शतकही केले आहे. त्याने येथे 2 डावात 138 धावा केल्या असून 127 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
दुसरीकडे या मैदानावर विराटची कामगिरी काही विशेष झाली नाही. मात्र टीम इंडियाने येथे जिंकलेल्या शेवटच्या कसोटीत विराट कर्णधार होता आणि त्याने फलंदाजी करत 44 आणि 50 (94) धावा केल्या. त्याने येथे 3 सामन्यात एकूण 169 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे. अशा स्थितीत विराटला या मैदानावर आपली कामगिरी सुधारावी लागणार असून त्याचा अलीकडचा फॉर्मही याकडे लक्ष वेधत आहे.