बाला रफि शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी

वृत्तसंस्था
रविवार, 23 डिसेंबर 2018

- बालारफिक शेख नवा "महाराष्ट्र केसरी'
- आक्रमक कुस्ती करीत गतविजेता अभिजित कटकेवर मिळविला विजय 

जालना- अभिजितच्या वेगवान चालीने लढतीच्या सुरवातीलाच मैदानाबाहेर गेलेल्या बालारफिक शेखने नंतर प्रतिहल्ला चढवून सर्वोत्तम आक्रमक कुस्तीचे प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र केसरी' किताबावर आपली मोहोर उमटविली. 

प्रचंड उत्साहात रविवारी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम लढतीत बाला रफिक शेखने आपल्या आक्रमकतेच्या जोरावर गतवेळेचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेला 11-3 च्या फरकाने पराभूत केले.

पहिल्या मिनिटात अभिजितने एकेरी पट काढताना बालाला सुरक्षित झोनच्या बाहेर नेत एक गुण मिळविला होता. या प्रयत्नात तो आखाड्याच्या बाहेरही गेला. पण या धक्‍क्‍यातून सावरून जात बालारफिकने जोरदार आक्रमण करत अभिजितला निष्प्रभ केले. अभिजितवर पकड मिळवीत बालाने दोन गुण मिळवीत आघाडी घेतली आणि मागे वळून बघितलेच नाही. आपल्या एकेरी पट काढण्याच्या हुकमी अस्त्राचा पुरेपूर वापर करताना बालाने अभिजितलाही आक्रमक होण्याचे आव्हान दिले. मात्र संपूर्ण स्पर्धेत आपल्या सावधपणावर विसंबून राहिलेला अभिजित मुसंडी मारू शकला नाही. वजनात काहिसा अधिक असलेला बाला पुण्याच्या अभिजितला पेलला नाही. वजनाने अधिक असूनही बालाने दाखविलेली चपळता निर्णायक ठरली.

विश्रांतीच्या 3-0 अशा आघाडीनंतर बाला दुसऱ्या फेरीत अधिक आक्रमक झाला. अभिजितच्या हप्ताबंद डावातून चपळाईतून सुटका करून घेत, त्याने त्याच्यावर स्वार होत गुणांची कमाई करत आघाडी फुगविली. पिछाडी वाढत चालल्यावर अभिजितवर दडपण आले आणि याचाच फायदा घेत बालाने 62व्या महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरले.

लढत संपण्यास काही सेकंद असतानाच अभिजितची देहबोली तो हरल्याची कबुली देत होती आणि शेजारी बाला आनंदाने उडी मारून आपला विजय साजरा करीत होता.  मातीतून अंतिम फेरीत धडक मारलेल्या बालाने अभिजितवर निर्विवाद वर्चस्व राखले. विजयानंतर तोच काय, अंतिम लढतीसाठी उपस्थित असलेल्या त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले होते. आई- वडिलांकडे आनंद व्यक्त करण्यास शब्दच नव्हते. घरच्या चौथ्या पिढीने कुस्तीत मिळविलेल्या नावलौकिकामुळे सारे शेख कुटुंबीय भावनाविवश झाले होते. कुस्तीसाठी बुलडाणा सोडून पुण्यात हनुमान आखाड्यात आलेल्या बालाच्या विजयात सर्वांत मोठा गुरू स्व. गणपतराव आंदळकरांचा असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

या स्पर्धेची मानाची गदा तथा बक्षीस वितरण विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे, राज्यमंत्री तथा आयोजन समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर, खासदार प्रतापराव जाधव, बाळासाहेब लांडगे, डॉ. दयानंद भक्त यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी रुस्तुम- ए- हिंद अमोल बुचडे, कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते पाटील, अनिरुद्ध खोतकर, "महिको'चे संचालक राजेंद्र बारवाले, आमदार शशिकांत खेडकर, राजेश टोपे, दिलीप सानंदा, माजी आमदार सुरेश जेथलीया, संतोष सांबरे, अरुण चव्हाण, सर्जेराव शिंदे, चंद्रकांत दानवे, प्रा. भागवत कटारे, नागनाथ देशमुख, दिनेश गुंड, ऑलिम्पियन नागनाथ अडकन, बंकट यादव, राजेश राऊत, गणेश दांगट, चंद्रकांत कटके, गुलाब पटेल आदींची उपस्थिती होती. 

मैदानाबाहेर फेकला गेल्याने थोडासा घाबरलो होतो. पण ही कुस्ती आपण कव्हर करू असा विश्‍वास मनात कायम होता. मॅटवरसुद्धा प्रशिक्षक मंडळीने माझा खूप सराव घेतला त्याचा फायदा झाला. - बाला रफिक शेख (महाराष्ट्र केसरी 2018)

Web Title: This year Maharashtra Kesari is Bala Rafi Shaikh