Pro Kabaddi : युपीचे योद्धा पडले बंगळूर बुल्सवर भारी!

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

बंगळूर संघाला पवनच्या 15 गुणांनी देखील विजयाला गवसणी घालता आली नाही. बचावात आलेले अपयशच त्यांच्या पराभवाचे खरे कारण ठरले.

अहमदाबाद : प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात गतविजेत्या बंगळूर बुल्स संघाला सोमवारी तळात असणाऱ्या युपो योद्धाजकडून पराभवाचा सामना करावा लागला. स्टार पवन कुमार खेळूनही बंगळूरला युपी योद्धाज संघाकडून 33-35 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. युपीचा हा दुसराच विजय ठरला. आज झालेल्या पहिल्या लढतीत तेलुगू टायटन्स संघाने बंगाल वॉरियर्सला 29-29 असे बरोबरीत रोखले. 

बंगळूर संघाला पवनच्या 15 गुणांनी देखील विजयाला गवसणी घालता आली नाही. बचावात आलेले अपयशच त्यांच्या पराभवाचे खरे कारण ठरले. एरवी चढाईपटू म्हणून खेळणाऱ्या पवनने आज अष्टपैलू कामगिरी करताना बचावाची जबाबदारी घेत तीन गुणांची कमाई केली. त्याच्या पंधरा गुणात सहा टच, सह बोनस असे बारा चढाईतील गुण होते. त्यांचे नियमीत बचावपटू आपली किमान कामगिरीही दाखवू शकले नाहीत. त्याउलट युपी संघाला आज श्रीकांत जाधव आणि मोनू गोयतच्या चढाईतील गुणांची चांगली साथ मिळाली. बचावात त्यांच्या सुमीतने "हाय फाईव्ह' केले. युपीच्या राखीव खेळाडूसह प्रत्येकाने गुणांची कमाई केली. हेच त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. 

तेलुगूची दुसरी बरोबरी 
त्यापूर्वी झालेल्या सामन्यात तेलुगू टाययन्स संघाने रविवारी विजयाचे खाते उघडले आणि त्यानंतर आज बंगाल वॉरियर्सचे आव्हान 29-29 असे बरोबरीत सोडवले. सूरज आणि सिद्धार्थ देसाई यांनी केलेल्या चढाया तेलुगूसाठी निर्णायक ठरल्या. त्याचवेळी बंगालसाठी नबीबक्षने आज छसा उमटवला. त्याने 8 गुणांची कमाई करताना बंगालचे आव्हान राखले होते. मनिंदरला आज लय गवसली नाही. प्रपंजनने मोक्‍याच्या वेळी गुण मिळवून नबीबक्षला साथ केली. 

यानंतरही दोन्ही संघाकडून झालेला भक्कम बचावच या सामन्याच्या बरोबरीसाठी महत्वाचा ठरला. यातही बंगालने 11-10 असे निसटते वर्चस्व राखले. चढाईत दोन्ही संघांनी प्रत्येकी 13 गुण मिळविले. तेलुगूला मोसमात दुसऱ्यांदा बरोबरीवर समाधान मानावे लागले. यापूर्वी युपी योद्धाजविरुद्ध त्यांची लढत 20-20 अशी बराबेरीत सुटली हाेती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UP Yodhha win against Bengaluru Bulls in Pro Kabaddi