esakal | Olympics : इतिहास रचणारी चानू कधीकाळी लाकडाच्या मोळ्या उचलायची
sakal

बोलून बातमी शोधा

mirabai chanu

Olympics : इतिहास रचणारी चानू कधीकाळी लाकडाच्या मोळ्या उचलायची

sakal_logo
By
सुशांत जाधव

Olympics 2020 : भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने दुसऱ्या दिवशी देशाला पहिले पदक मिळवून दिले. देशासाठी रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी देशातील लेकींसाठी प्रेरणादायी ठरेल. त्या खेळाच्या मैदानात सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वासही मीराबाई चानूने व्यक्त केला. ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणे हे स्वप्न होते. यासाठी कठोर मेहनत घेतली. पाच वर्षांत केवळ 5 वेळा घरी गेले, असेही मीराबाई चानूने सांगितले. ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिल्या दिवशीच्या खेळात पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला देखील ठरलीये.

देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मीराबाई चानूने देशातील लेकींना प्रोत्साहन देण्यासाठी खास संदेशही दिलाय. मुलींना शिक्षण देण्यासोबतच त्यांना खेळाच्या मैदानात उतरण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. मी केलेल्या कामगिरीमुळे देशातील मुलींना खेळाच्या मैदानाकडे येण्याचा मार्ग सुकर होईल, असा विश्वासही तिने व्यक्त केलाय. रिओ ऑलिम्पिकमधील अपयश त्यानंतर खांद्याला झालेली दुखापत या सर्वातून सावरत सकारात्मकतेनं तिने कामगिरीत सुधारणा केली. यात सातत्य राखून तिने जगातील मानाच्या स्पर्धेत वजनदार कामगिरी करुन दाखवलीये.

हेही वाचा: 'चंदेरी' कामगिरीनंतर मीराबाई चानू झाली भावूक; देशवासियांचे मानले आभार

देशाला पहिले पदक मिळवून देणाऱ्या चानूचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता. चानूच्या इथपर्यंतच्या प्रवासाची कहाणी रंजक आणि प्रेरणादायी अशीच आहे. तिला तिरंदाजीमध्ये करियर करायचे होते. आठवीतील शालेय पुस्तकातील एका धड्याने तिला वेटलिफ्टर बनवले. देशातील महान वेटलिफ्टर कुंजरानी देवींचा धडा वाचल्यावर मीराबाई चानूने वेटलिफ्टर होण्याचा संकल्प केला. इम्फालमधील नोंगपोक काकचिंग या छोट्याशा गावात जन्मलेली मीराबाई चानून वयाच्या बाराव्या वर्षी लाकडाच्या मोठ्या-मोठ्या मोळ्या उचलायची. छोट्या गावात लाकडाच्या मोळ्या उचलणारी ही मुलगी वजनदार वेट उचलून जगात देशाची मान उंचावेल, असा विचार त्यावेळी कोणीच केला नसेल. पण आज तिने स्वत:मधील धमक दाखवून देत चमकदार कामगिरी करुन दाखवलीये.

हेही वाचा: कोरोना निर्बंध; पाहा मीराबाई पदक स्वीकारताना काय घडलं (VIDEO)

कठोर मेहनत आणि प्रंचड इच्छाशक्तीच्या जोरावर मीराबाई चानूने आपलेच नाही तर देशवासियांचे स्वप्न साकार केले. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात जर्क 115 किलो आणि स्नॅच 87 किलो असे एकूण 202 किलो वजन उचलून ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. तिने मुलाखतीमध्ये म्हटल्याप्रमाणे तिची कामगिरी देशातील प्रत्येक लेकीला खेळाच्या मैदानात येण्यासाठी मोकळीक देणारी अशी निश्चितच आहे.

loading image
go to top