
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, एक महान शिक्षक आणि प्रख्यात शास्त्रज्ञदेखील होते. सामान्य लोकांना विशेषत: तरुणांना आपलंसं करण्याच्या त्यांच्या अद्वितीय गुणामुळे ते खऱ्या अर्थाने जनतेचे राष्ट्रपती होते.
अब्दुल कलाम यांचे १० विचार, जे तुमचे आयुष्य बदलवू शकतात
जागतिक विद्यार्थी दिवस २०२१ : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजेच १५ ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जगभरात साजरा केला जाते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, एक महान शिक्षक आणि प्रख्यात शास्त्रज्ञदेखील होते. सामान्य लोकांना विशेषत: तरुणांना आपलंसं करण्याच्या त्यांच्या अद्वितीय गुणामुळे ते खऱ्या अर्थाने जनतेचे राष्ट्रपती होते. भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डॉ. कलाम यांनी दुसऱ्याच दिवशी अध्यापनाचं काम सुरु केले.
तरुणांना त्यांनी मोठी स्वप्न पाहण्यास आणि अपयशाची भीती न बाळगता मेहनत करण्यास नेहमीच प्रेरित केले. डॉ. कलाम हे केवळ विद्यार्थ्यासाठीच नव्हे, तर त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठीही आदर्श होते. डॉ. कलाम यांचा विश्वास होता की, ''चांगले शिक्षक महान व्यक्तिमत्त्वं घडवू शकतात.''
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी २००४ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार समारंभावेळी शिक्षकांना संबोधित करताना म्हटले होते की, “शिक्षण प्रक्रिया, शालेय वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रज्वलित करणे हे सर्व शिक्षकांच्या क्षमतेवर अवलंबून असते. ''शिक्षण सर्जनशीलता देते, सर्जनशीलता विचार करण्यास प्रेरित करते, विचार ज्ञान देते, ज्ञान आपल्याला महान बनवते. "

APJ abdul kalam
कलाम यांच्या संघर्षमय जीवनातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. त्यांचे विचार आजही तरुण पिढीला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. डॉ. कलाम यांच्या विचारांचा अवलंब केला, तर तुमचे आयुष्य बदलू शकते.
१. ''स्वप्ने ती नाहीत जी तुम्ही झोपल्यानंतर बघता, स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.''
२. ''आपला आजचा त्याग येणाऱ्या पिढीचं भविष्य घडवू शकतो.''
३. ''विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला हवेत. हा विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम गुण आहे.''
४. ''देशासाठी सर्वोत्तम विचार करणारे वर्गाच्या शेवटच्या बाकांवरही असू शकतात.''
५. ''जे थांबतात त्यांना फक्त तेच मिळते, जे प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिले आहे.''
६. ''आयुष्यात आनंदाचा अनुभव तेव्हाच येतो, जेव्हा तो आनंद अडचणींमधून मिळतो.''
७. ''शिखर गाठण्यासाठी ताकद लागते, मग तो माउंट एव्हरेस्ट शिखर असो किंवा इतर कोणतेही ध्येय.''
८. ''दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात येते, या दुःखांमध्येच प्रत्येकाच्या संयमाची परीक्षा होते.''
९. ''स्वप्ने तेव्हाच पूर्ण होतात, जेव्हा आपण स्वप्ने पाहण्यास सुरुवात करतो.''
१०. ''अडचणींनंतर मिळालेले यश खरा आनंद देते.''