संवाद प्राण्यांशी...

आयुष्यात आपण स्थिरस्थावर होतो, करिअर व्यवस्थित सुरू असतं, त्यावेळी काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा होतेच, तशी मलाही झाली.
Animal
Animalsakal

- ऐश्वर्या नारकर

आयुष्यात आपण स्थिरस्थावर होतो, करिअर व्यवस्थित सुरू असतं, त्यावेळी काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा होतेच, तशी मलाही झाली. माझं शिक्षण मायक्रोबायोलॉजीमध्ये झालं आहे. त्यात पुढे काही करण्यासाठी तेवढा वेळ देणं मला शक्य नव्हतं. म्हणून मग आपल्या वेळेत बसेल आणि आवडेलही असं काय शिकता येईल म्हणून मी हिलिंग थेरपीकडे वळले.

यातून आपण दुसऱ्यांची मदत करू शकतो, असं मला वाटतं. मी ॲनिमल कम्युनिकेशन, रेकी, पेंड्युलम थेरपी या गोष्टी मी शिकले आहे. मी माझ्या मैत्रिणीकडून रेकी शिकले आणि या थेरपीमध्ये मला रस वाटू लागला. मी साधारण २००७-२००८ पासून हे तंत्र शिकत आहे.

लॉकडाऊनच्या काळात मी ॲनिमल कम्युनिकेशन शिकले. या तंत्रामुळे तुम्ही निसर्गातल्या कोणत्याही गोष्टीसोबत संवाद साधू शकता. कंपनांच्या साह्याने तुम्ही अगदी मुंगीपासून, हत्तीपर्यंत सर्वांशी स्वतःला जोडून घेऊ शकता. प्राणी हुशार असतात. त्यांना सांभाळणाऱ्या माणसामध्ये कोणत्या विटॅमिनची कमतरता आहे का, किंवा घरात काय कमी आहे, अशी सगळी माहिती प्राण्यांशी बोलल्यावर ते तुम्हाला देतात.

मी कोणत्याही माणसापेक्षा प्राण्यांशी पटकन जोडली जाते. त्यामुळे मला वाटलं, की आपण प्राण्यांशी बोलावं, त्यांच्याबद्दल जाणून घ्यावं. आता मी बऱ्याचदा लोकांच्या प्राण्यांशी संवाद साधते. हरवलेले अनेक प्राणी त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्या घरी गेले आहेत. अनेकजण मला सांगतात, की ‘तू ये आणि माझ्या प्राण्याशी बोल.’ मला एका बाईंनी त्यांच्या कुत्र्याविषयीची एक समस्या सांगितली.

तो कुत्रा पाहुणे आले की भुंकायचा आणि चावायला जायचा. तो असं का करतोय, हे त्या बाईंना कळत नव्हतं. मी त्याच्याशी बोलले, तेव्हा त्या कुत्र्याचं म्हणणं असं होतं, की ‘मी या घरात फक्त या बाईंसाठी, त्यांच्या साथीसाठी आहे. पाहुणे येतात, तेव्हा त्यांना किचनमध्ये काम करावं लागतं आणि त्यांना त्रास होतो. म्हणून मी त्यांना चावतो, मला ते बघवत नाही.’ अशावेळी त्या प्राण्यांना समजवावं लागतं, की ‘तू चावू नकोस, फक्त गुरगुर.’

मी माझं सोशल मीडिया हँडल सुरू केलं, तेव्हा मी चाहत्यांना अनेकदा विचारलं की, तुम्हाला ॲनिमल कम्युनिकेशनबद्दल मी काही सांगितलं तर ऐकायला आवडेल का? पण आपल्या पाळीव प्राण्यांसोबत कोणीतरी संवाद साधून त्यांची सुख-दुःखं जाणून घेतंय, हे लोकांना माहीत नाही. या विषयाबद्दल फारशी जागृती नाही, त्यामुळे चाहत्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

सौंदर्य, डाएट, आरोग्य याबद्दलच तुम्ही माहिती द्या, असं माझ्या चाहत्यांचं म्हणणं होतं. ॲनिमल कम्युनिकेशन बरेच जण व्यावसायिकपणे करतात, त्यासाठी पैसे घेतात; पण मी आवड असल्यानं हे काम करते. तो माझ्यासाठी टाईमपास निश्चितच नाही. मला त्यातून आनंद मिळतो आणि त्यासाठी फार कष्टही घ्यावे लागत नाहीत.

मला प्राण्यांशी लवकर जुळवून घेता येतं, त्यामुळे मला त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. खूपच घाई असेल, तर मी शूटिंगमधून थोडासा वेळ काढून प्राण्यांशी बोलते. काही सेशन्स मी रात्री झोपण्यापूर्वीही घेतलेले आहेत.

लहानपणी आई आपल्याला स्वयंपाक करायला शिकवते; पण आपण स्वतः स्वयंपाक करायला लागतो, तेव्हा आपण आपल्या सोयीने, आपल्या पद्धतीने गोष्टी करू लागतो. तसंच इथं आहे. मी आता या क्षेत्रातल्या बेसिक गोष्टी शिकले आहे, आता मी यात स्वतःला अधिकाधिक तज्ज्ञ बनवत आहे.

माझ्या क्षमता प्रयत्नपूर्वक विस्तारण्याचा प्रयत्न करते आहे. मला व्यवसाय म्हणून हे करायचं नाही, तर आवड म्हणूनच जपायचं आहे. माझ्या या आवडीमुळे मला लोकांची मदत करता येईल आणि ती मी करत राहीन.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com