शाळेपासून आत्तापर्यंत टिकून राहिलेली मैत्री

असं म्हणतात की दोन व्यक्तींचे विचार जुळले, की त्यांचं नातं घट्ट होतं; पण प्रत्येक वेळी असंच असण्याची काही गरज नाही.
akshaya deodhar and mukta lele
akshaya deodhar and mukta lelesakal

- अक्षया देवधर / मुक्ता लेले

असं म्हणतात की दोन व्यक्तींचे विचार जुळले, की त्यांचं नातं घट्ट होतं; पण प्रत्येक वेळी असंच असण्याची काही गरज नाही. कधी कधी दोन भिन्न विचारांच्या आणि भिन्न स्वभावाच्या व्यक्तींमधली केमिस्ट्रीदेखील भारी असते. असंच उदाहरण आहे अभिनेत्री अक्षया देवधर आणि मुक्ता लेले यांचं.

अक्षया आणि मुक्ता यांची पहिली भेट शाळेच्या पहिल्या दिवशीच झाली. मिनिटामिनिटाला आपल्या प्रायोरिटीज बदलत जाण्याच्या आजच्या काळात अक्षया आणि मुक्ता शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत एकमेकांच्या जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत, हे खरंच कौतुकास्पद आहे.

मुक्तासोबतच्या मैत्रीविषयी अक्षया म्हणाली, ‘‘मुक्ता माझी पहिली मैत्रीण आहे. मी हे माझं नशीब म्हणीन, की आमच्या शैक्षणिक प्रवासात कधी आमची तुकडीसुद्धा बदलली नाही. बऱ्याच वेळा आपण बघतो, की प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, कॉलेज, त्यापुढचं शिक्षण हे टप्पे पार करत असताना आपल्यासोबतचे मित्र-मैत्रिणी बदलत जातात; परंतु असं आमच्यात कधीच नाही झालं.’

अक्षया पुढे म्हणाली, ‘मुक्ताचं घर शाळेशेजारीच होतं आणि त्यांच्या घराजवळच त्यांचं मंगल कार्यालय होतं. मग त्यांच्या इथं लग्न वगैरे असलं, तर आम्ही शाळेतून येताना जाताना आम्ही ते पापडाचे तुकडे, पुऱ्या, वडे असं काही काही उचलून घेऊन जायचो. ही केलेली मज्जादेखील मी कधीच विसरणार नाही.’

मुक्ता म्हणते, ‘‘आमचे स्वभाव खूप वेगळे आहेत. मी जेवढी इमोशनल आहे, अक्षया तेवढीच प्रॅक्टिकल आहे. मी आधी बऱ्याच बाबतीत दुसऱ्यांवर अवलंबून असायचे; पण ती या बाबतीत मात्र स्वावलंबी आहे. काही कामं करताना एकट्यानं बाहेर कुठे जायची वेळ आली, तर मला खूप जास्त टेन्शन यायचं.

परंतु तिचं तसं कधीच नव्हतं.’ ती पुढे म्हणाली, ‘अक्षया समजायला थोडी कठीण आहे. तुम्ही तिला पहिल्यांदा भेटता, तेव्हा तुम्हाला वाटेल की ती थोडी कठोर आहे. कारण ती पटकन् कोणाशी कनेक्ट नाही होत; पण एकदा जर तिची तुमच्याशी ओळख झाली, की मग ती तुमच्यासाठी नेहमीच काहीही करायला तयार असते. अक्षया आणि मी नेहमीच एकत्र असायचो; पण अक्षयाला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली आणि ती शूटिंगसाठी चार वर्षं कोल्हापूरला गेली, त्यावेळी आम्ही फार काळ एकमेकांपासून लांब होतो.

गंमतीची बाब म्हणजे या चार वर्षात आम्ही दोघीही एक्स्चेंज झालो. आमचे सगळे गुण बदलले. म्हणजे ती खूप जास्त प्रॅक्टिकल होती; पण ती त्या काळानंतर कुठेतरी इमोशनल झाली आणि या उलट मी प्रॅक्टिकल झाले. या काळात अक्षयाच्या ज्या ज्या क्वालिटीज बदलल्या पाहिजेत असं मला वाटत होतं, त्या सगळ्या गोष्टींत कुठेतरी बदल झाले. तिचा चिडचिडेपणा, तिचं इम्पेशंट वागणं या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झाला.’

अक्षया म्हणाली, ‘मी मुक्ताची कंपनी एन्जॉय करते. ती माझा कंफर्ट झोन आहे. मला आठवतंय, आम्ही एका ट्रिपवर गेलेलो. आमच्यासोबत आमच्या काही मैत्रिणीदेखील होत्या. सगळ्यांचं एका पॉइंटला येऊन असं झालं की ते सारखे सारखे तेच चेहरे बघून कंटाळले. मी आणि मुक्ता ट्रिपवरून आल्यावर दुसऱ्या दिवशीच परत रेस्टॉरंटला एकत्र जेवायला गेलो आणि मग सगळेच आम्हाला विचारायला लागले, अरे तुम्ही कालपर्यंत एकत्र होता ना... म्हणजे आम्ही कधीच एकमेकांसोबत कंटाळत नाही.’

यावर मुक्ता म्हणते, ‘आम्ही फ्री असलो, तर रोज रात्री कॉफी प्यायला भेटतोच भेटतो. आमची रात्रीची कॉफी खूप जास्त खास आहे. तो आमचा क्वालिटी टाइम आहे आणि यावरून बऱ्याच वेळा माझ्यात आणि अक्षयाचा नवरा हार्दिकमध्ये नेहमीच गमतीशीर वाद होतात. माझ्यात आणि अक्षयात कितीही वाद झाले, तरी शेवटी आम्ही रात्रीची कॉफी प्यायला एकत्रच जातो.’

(शब्दांकन : मयुरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com