‘पालन’गोष्टी : टाळू भेदाभेद

‘सर मुलाकडे जरा लक्ष द्या.’’ एक पालक शिक्षकाला सांगतात. ‘अहो, तुमची मुलगी पण खूप हुशार आहे. तिलाही चांगलं शिकवा,’ शिक्षकांनी असं म्हणताच पालकांनी तोंड कसनुसं केलं.
Childrens
ChildrensSakal

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

प्रसंग :

‘सर मुलाकडे जरा लक्ष द्या.’’ एक पालक शिक्षकाला सांगतात. ‘अहो, तुमची मुलगी पण खूप हुशार आहे. तिलाही चांगलं शिकवा,’ शिक्षकांनी असं म्हणताच पालकांनी तोंड कसनुसं केलं. ‘पोरीचं काय लग्न झालं की संपलं. पोरगा शिकून घराचं बघणार. मग पोरगाच शिकला पाहिजे.’

शिक्षकांनी निराश मनानं मान डोलावली.

हा प्रसंग अगदी जवळचा वाटतोय ना? म्हणजे आपल्या घरात, आसपास, पाहुण्यारावळ्यांत हे कधीतरी ऐकलंच असेल. आपल्या मुलांमध्ये आपण रंग, देखणेपण, उंची, हुशारी आणि अशा बऱ्याच मुद्द्यांवरून भेद करत असतो; परंतु माणूस म्हणून दुसऱ्या माणसाला नाकारू धजावणारा हा भेद अत्यंत वाईट आहे. लिंगभावविषयक भेद. मुलगा-मुलगी म्हणून केला गेलेला भेद.

आजकाल कोण असा भेद करतो, असा प्रश्न काहीना पडला असेल; परंतु वस्तुस्थिती आणि आपली धारणा यातलं अंतर मोजता येणार नाही इतकं आहे. आपण जाता जाता सहजपणे मुलांमध्ये भेद करत राहतो. ते इतके अंगवळणी पडलेले असतात, की आपणाला जाणवतही नाही, की आपण भेद करतोय. कोणते भेद आहेत ते...

वाढ-विकास : मानवी जीवनात वाढीला आणि विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु एकाच घरात मुलगा आणि मुलगी यांच्या वाढीसाठी म्हणून एकसारखे प्रयत्न केले जात नाहीत. अनेक घरांत आहार, कपडे, इतर सुविधा याबाबत मुलांना नेहमीच झुकतं माप दिलं जातं आणि मुलींना आहे त्यात समाधान मानायला लावलं जातं. हा फरक तर स्पष्टपणे जाणवतो.

प्रेम : अनेक घरातील मुलांच्या वाट्याला थोडं जास्तीचं प्रेम येतं. मुलींना कमी प्रेम दिलं जातं, ती आपली मुलगी आहे म्हणून आणि आज ना उद्या ती परक्या घरी जाणार आहे म्हणून. अगदी लहानपणापासून मुलींना परक्याचं धन म्हणून वाढवलं जातं. सतत तिला त्याची आठवण करून दिली जाते.

संस्कार : एकाच घरतील मुलगा आणि मुलगी यांच्यावर संस्कार करतानासुद्धा आपण दुजाभाव करत असतो. मुलींना सतत तिच्या जबाबदाऱ्या आणि उद्या सासरी गेल्यावर कसं रहायचं याचं शिक्षण दिलं जातं; परंतु मुलांना उद्या इतरांशी आणि खासकरून इतर स्त्रियांशी कसं वागावं याचं शिक्षण देताना फारसं कुणी आढळत नाही. मुलाचं लग्न झाल्यावर बायकोशी कसं वागावं हे कुणी घरात मुलाला शिकवलेलं उदाहरण अगदीच दुर्मीळ.

शिक्षण : भारतातील बहुतांश मुलींचं शिक्षण लग्न, कुटुंब, मुलं या कारणांनी सुटतं. आणि योग्यता असूनही शिक्षणाच्या वाटा बंद होतात. बहुतांश पालक मुलींना शिकवायला तयार नसतात. मुलगी शिकून काय करणार, हा प्रश्न हमखास विचारला जातो. याचं उत्तर खरंच शोधून ठेवावं लागेल. आणि सतत ते सांगत राहावं लागेल.

संधी : मुलगी म्हणून मुलींना कुटुंबातून कमी संधी मिळतात. अनेक बंधनं आणि काटेकोर नियम त्यांना बांधून टाकतात. मग ना शिकण्याची संधी मिळते, ना नोकरी करण्याची, ना स्वत:ला सिद्ध करण्याची. अशावेळी पालक म्हणून आपण काय विचार करतो? आपणही आपल्या मुलींना ती मुलगी आहे म्हणून संधी नाकारतो का?

परकेपणा : मुलगी बाबांची लाडकी असते. आईच्या निगराणीखाली ती वाढत असते; पण कुठं ना कुठं ती परक्या घरी जाणार आहे, इथं आहे तोवर तिला मनासारखं राहू दे असं पालक म्हणत असतात. मुलगा म्हणून जी भावना आपल्या मनात असते, तीच भावना मुलगी म्हणून आपल्या मनात का नसते? का आपण मुलीला आपलंच धन म्हणून वाढवलं जात नाही. सतत ‘परक्याचं धन’ म्हणून तिला परकं का ठरवलं जातं?

बरेच मुद्दे आहेत; परंतु आपण साधारणपणे या गोष्टींबाबत भेद करतच असतो. खरंतर आपल्याला हा अधिकार आहे का? आणि आपण असं वागून आपण आपल्याच मुलींवर अन्याय करत असतो याची पुसटशी जाणीव तरी आपणाला असते काय? संत म्हणतात, भेदाभेद अमंगळ. मग अशी अमंगळ गोष्ट आपण करायला धजावतो तरी कसं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com