esakal | Corona virus : कापूर, लवंग अन् ओव्यामुळे वाढते ऑक्सिजनची पातळी?

बोलून बातमी शोधा

increase oxygen levels

Corona virus : कापूर, लवंग अन् ओव्यामुळे वाढते ऑक्सिजनची पातळी?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात कोरोनाचा उद्रेक झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. प्रत्येक जण स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेत आहे. तर, प्रशासनदेखील युद्धपातळीवर लसीकरण आणि कोरोना उपचारांवर भर देत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता आता अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर व बेडची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे सध्या प्रशासनासमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. कापूर, लवंग आणि ओवा यांच्या सेवनामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते असा दावा या मेसेजमध्ये करण्यात येत आहे. मात्र, या मेसेजमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं 'झी न्यूज'च्या वृत्तात म्हटलं आहे.

कोरोना काळात प्रत्येकाने स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणं हे प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे घरात राहणं,मास्क वापरणं, सतत हात धुणं हे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचं सेवन करणदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र, यासोबतच काही आयुर्वेदिक काढे घेण्याचाही सल्ला देण्यात येत आहे. विशेष म्हणजे अनेक जण योग्य ती खबरदारी घेत आहे. मात्र, काही जण कोणत्याही गोष्टीचं तथ्य न जाणता थेट नवनवीन उपाय करुन पाहत आहेत. यामध्येच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक उपाय नागरिक करु लागले आहेत. कापूर, लवंग, ओवा आणि निलगिरीचं तेल एकत्र करुन ते हुंगल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते असा दावा करणारा हा उपाय नागरिक करतांना दिसत आहेत. मात्र, या उपायामागे कोणत्याही डॉक्टरांनी किंवा तज्ज्ञांनी दुजोरा दिलेला नाही.

हेही वाचा: सावधान! आठ पदार्थांमुळे कोरोनाचा धोका; इम्युनिटीवर करतात परिणाम

खरंच कापूर, लवंग आणि ओव्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते?

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये कापूर, लवंग, ओवा व निलगिरी तेल एकत्र करुन हुंगल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते असं नमूद करण्यात आलं होतं. तसंच लडाखमध्ये पर्यटकांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर त्यांना हा घरगुती उपाय दिला जातो, असंही त्यात म्हटलं होतं. तेव्हापासून नागरिक हा उपाय करु लागले आहेत. मात्र, दावा सिद्ध करणारा कोणताही अहवाल नाहीये.

लवंग, कापूर, ओवा व निलगिरी तेल यांच्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते किंवा श्वसनाशी संबंधित समस्यांपासून दूर होतात, असा दावा करणारा कोणताही अहवाल नाही.

हेही वाचा: कोरोनाच्या भीतीने वारंवार हात धुताय, मग थांबा...

कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी प्रत्येक जण आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय करतांना दिसत आहेत. यात काढा घेणे, वाफ घेणे हे आवर्जुन करण्यात येत आहे. तसंच काही जण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या उपायांचादेखील अवलंब करत आहेत. मात्र, कोणत्याही व्हायरल मेसेजवर विश्वास ठेऊन उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.