कसरत आणि आनंदही

आईपणाची चाहूल लागली तेव्हा ‘बेधुंद मनाची लहर’ ही माझी मालिका सुरू होती. ही मालिका मुलांच्या कॉलेज जीवनामधील असल्यामुळे ती खूप लोकप्रिय झाली होती. अर्थात त्या मालिकेमुळे मला तडजोड करावी लागली नाही, कारण मालिका संपायला आली होती.
career and be a mother tips by rujuta deshmukh
career and be a mother tips by rujuta deshmukhSakal

- ऋजुता देशमुख

आईपणाची चाहूल लागली तेव्हा ‘बेधुंद मनाची लहर’ ही माझी मालिका सुरू होती. ही मालिका मुलांच्या कॉलेज जीवनामधील असल्यामुळे ती खूप लोकप्रिय झाली होती. अर्थात त्या मालिकेमुळे मला तडजोड करावी लागली नाही, कारण मालिका संपायला आली होती. त्याच वेळेला माझी ‘झी टीव्ही’वर ‘जगावेगळी’ ही मालिका सुरू होती.

राकेश सारंग आमचे निर्माते होते आणि उपेंद्र लिमये व मी त्या मालिकेमध्ये नवरा-बायकोची भूमिका साकारत होतो. मी सारंग यांना सांगितलं, ‘‘मी आता प्रेग्नंट आहे. आता काय करू? थोड्याच दिवसांत पोट दिसायला लागेल.’’

सारंग यांनी त्या पात्रालाच प्रेग्नंट करून टाकलं. ते म्हणाले, ‘‘तुला काम करायचं आहे ना?’’ मी ‘हो’ म्हणाले. त्यामुळे मी आठव्या महिन्यापर्यंत काम केलं आणि नववा महिना सुरू झाल्यावर मला सुट्टी मिळाली. त्यांनी माझ्या व्यक्तिरेखेलाच प्रेग्नंट करून टाकल्यानं मी अख्ख्या प्रेग्नन्सीत ती मालिका केली आणि एन्जॉय करत चित्रीकरणही केलं.

त्यावेळी मी इतकी तरुण होते, की बिनधास्त इकडे-तिकडे फिरायचे. संजय मोने, सीमा देशमुख, उपेंद्र लिमये, स्पृहा जोशी, राजन भिसे हे सगळे मला काळजी घेण्यासाठी सांगत असत. त्यामुळे माझी प्रेग्नन्सी खूपच सुखकारक गेली. राकेश सारंग यांचं प्रॉडक्शन हाऊस असल्यामुळे त्यांनीही खूप काळजी घेतली. त्यांच्या कुटुंबीयांनीही मला मोलाची साथ दिली.

माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी पुण्याला माझ्या माहेरी गेले. त्यावेळी बाळासह सर्व गोष्टींचा मी आनंद घेत होते. त्यानंतर पुन्हा एकदा राकेश सारंग यांच्या प्रॉडक्शन हाऊसमधून मला फोन आला की, ‘या गोजिरवाण्या घरात’ नावाची जी मालिका होती,  जिचे आम्ही चाळीस भाग वर्षभरापूर्वी चित्रित करून ठेवले होते आणि ती अचानक ‘ऑनएअर’ जात आहे.

सारंग यांनी मला विचारलं की, ‘तुला रिप्लेस करूयात, की तुला काम करायची इच्छा आहे? अजून एक-दीड महिना आहे. तू वेळ घेऊ शकतेस.’  त्यावेळी माझा नवरा व  सासू-सासरे यांचा पाठिंबा होता. त्यामुळे मुलगी अडीच-तीन महिन्यांची असताना मी ‘या गोजिरवाण्या घरात’साठी परत सेटवर जॉईन झाले.

तेव्हा मला संध्याकाळी लवकर घरी सोडत असत.  आई झाल्यावर मी तिसऱ्या महिन्यात काम  सुरू केले. नंतर हळूहळू थोडं हेक्टिक झालं. आपण आपलं मूल घरी सोडून काम करतोय. त्यामुळे थोडीशी  नकारात्मकता निर्माण झाली.  माझी सासू, सासरे व नवरा यांचा पाठिंबा असल्यामुळे ते मुलीकडे व्यवस्थित लक्ष देत होते; पण मी मुलीला मिस करत होते.

हे सगळे माझ्या मनाचे खेळ वर्षभर सुरू होते. आई झाल्यानंतर एक गोष्ट झाली, ती म्हणजे मालिकेचं चित्रीकरण वर्षभरापूर्वी झालं होतं, तेव्हा मी व्यवस्थित सडपातळ होते आणि डिलिव्हरीनंतर तिसऱ्या महिन्यात मी जॉईन झाल्यानंतर मी छान ‘पुटऑन’ केलं होतं. मी माझ्या आरोग्याची व शरीराची चांगल्या प्रमाणात काळजी घेतली.

व्यायाम आणि घरातीलच पदार्थ खाण्यावर मी भर दिला. प्रेग्नन्सीत खूप वजन वाढलं नव्हतं; पण ‘पोस्ट डिलिव्हरी’ १५-२० किलो वजन वाढलं होतं. बारीक व्हायला हवं, त्यामुळे डाएट करायला हवं, या सगळ्या विचारांत माझी तारांबळ उडाली होती. माझ्या तब्येतीची आणि माझ्या लेकीच्या तब्येतीची हेळसांड न करता मला बारीक व्हायचं होतं आणि मी काही महिन्यात ते केलं.

माझ्या करिअरच्या त्या टप्प्यात अनेकांना माहीतही नव्हतं, की मला मूल झालं आहे. कारण, त्या काळात एवढा सोशल मीडिया नव्हता. दोन-तीन वर्षांनी मी ‘कळत-नकळत’ ही मालिका केली. लोकांना तिचं टायटल सॉंग आवडलं होतं.

त्या मालिकेच्या दरम्यान माझी मुलगी साधारण चार-पाच वर्षांची असेल; पण तेव्हासुद्धा लोकांना हे माहीतच नव्हतं की, मला एक पाच वर्षांची मुलगी आहे. माझ्या घरून पाठिंबा असल्यामुळे माझा करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीच बदलला नाही आणि हे केवळ माझ्या कुटुंबामुळे शक्य झालं.

मूल झाल्यावर बायकांना घरी थांबावं लागतं आणि पुन्हा करिअरमध्ये  जॉईन होताना एक वेगळा त्रास होतो. हा सगळा त्रास मला झाला नाही. मला पुन्हा नव्यानं स्ट्रगल करावं लागलं नाही, हे केवळ आणि केवळ माझ्या कुटुंबामुळे.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स

  • आत्ताच्या तरुण मुली आई होण्यासाठी खूप घाबरत आहेत आणि करिअरचा विचार करत आहेत. महिलांकडे आईपण आणि करिअर या दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळण्याची शक्ती असते. आई होणं ही एक दैवी गोष्ट आहे.  त्याचा अनुभव घेतल्याशिवाय त्यातला दैवीपणा कळत नाही, जाणवत नाही. एक जन्म दिला आहे माणसाचा आणि त्यात महिलेचा जन्म आणि आपण अजून एका सुंदरशा मुलाला जन्म देतो, ही खूप दैवी गोष्ट आहे.

  • आई होण्यापूर्वी मुलींनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि आईपण, करिअर हे सगळं ज्या मुलीला करायचं आहे,  तिनं स्वतः फिट राहणं खूप गरजेचं आहे.

  • व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. ज्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी सुरळीत होतात. आपली तब्येत आणि मानसिक अवस्था चांगली राहते.

  • बाळाचा विचार करत असताना करिअरचाही तितकाच विचार करावा. बाळासाठी करिअर सोडलं आणि मी घरी बसलीये, असं मुलींनी करू नये. दोन्ही गोष्टी छान पद्धतीने सांभाळता येतात.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com