सेलिब्रिटी वीकएण्ड : Me आणि We टाईम

Prajakta-Hanamghar
Prajakta-Hanamghar

माझ्यासाठी वीकएण्ड खूप स्पेशल असतो आणि तो आठवड्याच्या गुरुवारपासूनच सुरू होतो. आठवड्याभराचं काम संपवल्यानंतर मी वीकएण्डसाठी खूप एक्साइट असते. खरंतर सुट्टीचा दिवस आणि वीकएण्ड हा माझ्यासाठी ‘Me’ आणि ‘We’ टाइम असतो.

अनेकदा कामामुळे फक्त विश्रांतीची गरज असते. अशावेळी मी आणि माझा नवरा घरीच राहणं पसंत करतो. घरीच सिनेमे, वेबसीरिज पाहतो. घरी असताना मी वाचन, लिखाणही करते. हाच माझ्यासाठी ‘मी’ टाइम आहे. ‘वुई’ टाइमविषयी सांगायचं तर मी व माझा नवरा आणि आमचे काही जवळचा मित्र परिवार असे सर्व जण आम्ही फिरायला जातो. वीकएण्डला नातेवाईक आणि मित्रपरिवार आम्हा दोघांना ‘फिरणारं कपल’ असंच म्हणतात. कारण दोघांसाठी फिरणं हे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यात फिरणं हे इतर मूलभूत गरजांसारखंच आहे. फिरणं हा माझ्यासाठी श्‍वास आहे. फिरल्यानं माणसं कळतात आणि आपल्या जोडीदाराला नव्याने ओळखता येतं.
वीकएण्डला फिरण्यासाठी कुठे जायचं याचं माझ्यावर कोणतंही बंधन नसतं.

ठिकाणापेक्षा प्रवास महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे अनेकदा फक्त गाडी काढून ठिकाण न ठरवता मी आणि नवरा रजत फिरायला बाहेर पडतो. महाबळेश्‍वर हे आमचं अतिशय आवडतं ठिकाण आहे. अनप्लान्ड ट्रिप्स या खरचं खूप भारी असतात. पण त्याचसोबत मी मोठ्या ट्रिप्स आणि व्हेकेशनला जाण्यावरही भर देते. एकूणच फिरण्याची आवड आम्हा दोघांना असल्याने वर्षातून किमान एक देश आणि एक राज्य फिरण्याचा आमचा संकल्प असतो.

मला एकटं पेक्षा जवळच्या व्यक्तींसोबत फिरायला आवडतं. कोणताही फिरण्याचा प्लान ठरला, की मी मित्र-मैत्रिणींना विचारते आणि त्यांनाही सोबत घेऊन जाते. सर्वांना सोबत घेऊन फिरण्याची मजाच वेगळी आहे. सोबत फिरण्याचा ग्रुप ठरलेला नसतो. रजतचा त्याचा वेगळा ‘फ्री सोल्स’ नावाचा बुलेट ग्रुप आहे. यामध्ये त्याचे बुलेट चालवणारे मित्र आहेत. मी आणि रजत श्रीलंकेला फिरायला गेलो होतो तेव्हा याच बुलेट ग्रुपसोबत गेलो होतो. तिथे बुलेटवर फिरण्याचा अनुभव खूपच खास होता.

मागच्या वर्षी हॉंग काँगला फिरायला गेलो होतो. हाँगकाँगला मी, रजत आणि आमच्या दोन भाच्यांनासोबत घेऊन गेलो होतो. वेगवेगळ्या लोकांसोबत फिरण्याची मजाही वेगळी आहे. फिरण्यासोबत मी खाण्याचीही तेवढीच शौकीन आहे. फिरायला जाते तिथलं प्रसिद्ध खाणं आवर्जून चाखते. फिरायला जाताना कपड्यांपेक्षा जास्त खाण्याचे पदार्थ माझ्यासोबत असतात. मी चहाप्रेमी आहे. मी गाडीमध्ये एक थर्मास सोबत घेऊन जाते. मला आवडतो तिथला चहा थर्मासमध्ये घेते. फिरताना चहाचा आस्वाद घेणं मला आवडतं.

या वर्षीही अनेक ठिकाणी फिरण्याची माझी विशलिस्ट तयार आहे. फुड ट्रिपसाठी मी लवकरच इंदूरला जाणार आहे. धकाधकीच्या जीवनात, कामाच्या व्यापात वीकएण्डला फिरणं म्हणजे माझ्यासाठी मोकळा श्‍वास आहे.
(शब्दांकन - ऋतुजा कदम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com