चैत्रांगण

मैत्रिणी, तुला चैत्रातलं चैत्रगौरीचं हळदी-कुंकू आठवतं का गं? आता ‘आठवतं का’ असंच विचारते आहे, कारण अलीकडे असे हळदी-कुंकू समारंभ कमी होऊ लागले आहेत ना!
chaitragauri
chaitragaurisakal

- डॉ. समिरा गुजर-जोशी

मैत्रिणी, तुला चैत्रातलं चैत्रगौरीचं हळदी-कुंकू आठवतं का गं? आता ‘आठवतं का’ असंच विचारते आहे, कारण अलीकडे असे हळदी-कुंकू समारंभ कमी होऊ लागले आहेत ना! पण आपल्या लहानपणीच्या किती आठवणी या अशा घरगुती सेलिब्रेशनशी निगडित आहेत. आज इव्हेंट्सचा जमाना आला आहे. सगळ्याच उत्सवांतली झाकपाक वाढली आहे; पण त्या पूर्वीच्या घरगुती हळदी-कुंकू समारंभांत काही वेगळाच गोडवा होता.

आज आठवण झाली तरी इन्स्टाच्या रीलच्या जमान्यात सतत काहीतरी नवीन कानावर पडत असताना अचानक वसंत प्रभू - पी. सावळाराम आणि लता मंगेशकर यांचं भावगीत कानावर पडलं, की जणू जत्रेत कोणीतरी ओळखीचं भेटल्यासारखंच वाटतं. आता, भावगीतावरून एकदम या त्रयीचेच ‘कोकिळ कुहू कहू बोले’ हे भावगीत आठवलं. किती गोड गाणं आहे हे!

त्यात या ऋतुराज वसंताचाही उल्लेख आहे, ज्याचं स्वागत आपण चैत्र- वैशाखात करत असतो. यालाच कवी ‘मधुमास’ असंही म्हणतात. या वसंतात निसर्गात चैत्रपालवी फुटलेली असते. आंब्याला छान मोहर आलेला असतो. चाफा फुलतो. लालभडक गुलमोहर आणि पिवळा धम्मक बहावा आपलं लक्ष वेधून घेतात. उन्हाच्या काहिलीत मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध अक्षरशः ‘अरोमा थेरपी’ करत असतो.

अशा वेळी कोणीतरी चैत्रगौरीच्या हळदी- कुंकवाचं आमंत्रण देतं. आता या घरी जाऊन खायची प्यायची काय चंगळ अनुभवायची आहे याची आपल्याला पूर्ण कल्पना असते. आता चाखायची असते चटपटीत आंबेडाळ, खिरापतीचा अर्थातच सरप्राइज पदार्थ, आणि थंडगार (म्हणजे बर्फ घातलेलं नव्हे तर ) माठाच्या पाण्यात केलेलं घरगुती आंबट-गोड असं कैरीचं ताजं पन्हं. कल्पनेनंसुद्धा तोंडाला पाणी सुटावं!

अशा वेळी चैत्रगौरीच्या स्वागतासाठी दारात रांगोळीनं ‘चैत्रांगण’ रेखाटलं जातं. ही रांगोळी जवळजवळ ५१ शुभ चिन्हांनी सजलेली असते. वर आंब्याचं तोरण काढलं जातं, त्याखाली मखरात बसलेले शिव-पार्वती, कारण पार्वती म्हणजेच तर चैत्र- गौरी. मग आजूबाजूला सूर्य-चंद्र, गणपती, सरस्वती, ध्वज, गुढी, शिवाय शंख, पद्म, गदा, चक्र, गोपद्म, ओम, स्वस्तिक, सौभाग्याचं लेणं म्हणजे हळदी-कुंकवाचा करंडा, फणी, आरसा, सनई, चौघडा, मोरपीस, बासरी, तुळशी वृंदावन, सवत्स धेनू असं बरंच काही.

भारतीय संस्कृतीतील समग्र प्रतीकं जणू त्या रांगोळीत एकवटतात. आता ही जुनी पद्धत टिकवायची जबाबदारी आपलीच म्हटली पाहिजे ना. आणि हो, आठवतं का? ती झोपाळ्यावर विराजमान होणारी माहेरवाशीण गौर. तिच्या भोवतीची ती पानाफुलांची साधीशी; पण तजेलदार आणि सुबक सजावट. चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षयतृतीयेपर्यंत ही माहेरवाशीण बनून लाड करून घ्यायला आलेली शिवाची पार्वती.

अनेक ठिकाणी देवघरातली अन्नपूर्णाच लख्ख करून झोपाळ्यात ठेवतात. मी आजीला विचारलं, ‘पण हा सण पार्वतीचा ना! मग अन्नपूर्णा आणि पार्वती एक कसे?’ त्यावर आजीनं हसून म्हटलं, ‘‘त्याची एक गोष्ट आहे. एकदा शंकर पार्वती चर्चा करत होते, तेव्हा भगवान शंकर म्हणाले, की ‘केवळ ब्रह्म हेच सत्य. ज्ञान, वैराग्य या योगे ते जाणून घेणे हेच आयुष्याचे ध्येय.’ गौरीला हे पटेना. ती म्हणाली, ‘म्हणजे हा जगाचा पसारा व्यर्थ?

हा निसर्ग, ही माणसे हे सगळे असत्य? केवळ ब्रह्मच सत्य, तर या सगळ्यांना जगवणारे अन्नही असत्य?’ भगवान शंकर म्हणाले, ‘हो, तेही असत्य.’ यावर गौरी चिडून निघून गेली. तिनं सगळ्या जगाचा अन्नपुरवठाच बंद केला. मानवच नव्हे देवदेखील भुकेने व्याकुळ झाले. स्वतः साक्षात भगवान शंकरांनाही भूक सहन होईना. त्यांनी जाणलं, की पार्वतीमाता चिडून काशीनगरीत जाऊन बसली आहे.

अन्न हेही ब्रह्मस्वरूप आहे आणि परम सत्य ब्रह्म जाणून घ्यायचं असेल, तर अन्नाचं महत्त्व नाकारता येणार नाही हे तिचं म्हणणं होतं. प्रत्यक्ष कृतीतून तिनं ते सिद्धही केलं. मग तिचा मुद्दा मान्य करून भगवान शंकरांनी तिच्याकडे अन्नाची भिक्षा मागितली आणि अन्नपूर्णारूपात पार्वतीमातेनं ती भिक्षा प्रसन्नमनानं दिली.’

आजी पुढे म्हणाली, ‘म्हणून तर आद्य शंकराचार्य म्हणतात -

अन्नपूर्णे सदा पूर्णे

शङ्करप्राणवल्लभे!।

ज्ञान-वैराग्य-सिद्धयर्थं

भिक्षां देहि च पार्वति!

अगदी योगी आणि वैरागी व्यक्तीलाही थोड्या प्रमाणात का होईना अन्न हे हवेच.’

बघ, आज या निमित्तानं माझ्या किती जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि एकदम एक विचार मनात आला, की ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला खरा; पण हा असा पार्वतीदेवीचे माहेरपण करणारा महिनाभर चालणारा उत्सव हाही स्त्रीत्वाचाच सण - उत्सव. मग तो काळाच्या पडद्याआड जाऊ नये.

अगदी ऑफिसमध्ये वीकडेला किंवा सोसायटीत वीकेंडला असा पारंपरिक उत्सव करायला काय हरकत आहे? उगीच फॅन्सी वे ने नाही हां! तर डब्यातून आंबेडाळ, खिरापत आणि एयरटाईट डब्यातून पन्हं नेऊन किंवा एखाद्या पोळी भाजी केंद्रवाल्या अन्नपूर्णा मावशीला हा मेन्यू बनवण्याचा रोजगार देऊन. कदाचित चैत्रांगणची रांगोळी किंवा चित्रही काढता येईल. करायला गेलो तर आणखीही काही सुचेल! कशी वाटते कल्पना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com