Noise Pollution : कर्कश आवाजाचा आरोग्यावर आघात; चिडचिड, डोकेदुखीचे रुग्ण वाढले.. ध्वनिप्रदूषणात हॉर्न, डीजे अतिगंभीर

मोठा आवाज वारंवार कानावर पडत असेल तर त्याचा बौद्धिक आणि कुशल कामात व्यत्यय येऊ शकतो. शिवाय कायम स्वरूपाचे बहिरेपण, झोपमोड, मानसिक आणि भावनिक असंतुलन, हृदयरोग, रक्तदाब, प्रसंगी मृत्यू देखील होऊ शकतो.
Noise Pollution
Noise PollutioneSakal

Noise Pollution Effect : गोंगाट, कर्कश आवाज, अनावश्यक किंवा अप्रिय आवाज कोणालाही आवडत नाही. क्षमतेपेक्षा अधिक डेसिबलचा आवाज जर वारंवार कानावर पडत असेल तर मानवावरच नाही तर प्राण्यांवर देखील याचा दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास येतेय. या कर्कश आवाजामुळे चिडचिड, डोकेदुखीसह आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहेत. हा प्रकार नियंत्रणात आणला नाही तर प्रत्येक व्यक्तीत कर्णदोष आढळून येतील.

आवाजाचे रूपांतर गोंगाटात होते. तेव्हा त्याचा मानवाच्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या श्वसन संस्थेवर, चेतासंस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या बुधवारी आंतरराष्ट्रीय आवाज जनजागृती दिवस पाळला जातो, त्या औचित्याने तज्ज्ञांनी यासंबंधी जनजागृतीपर माहिती दिली. प्रामुख्याने मोटार वाहतुकीचे आवाज, विनाकारण वाजवले जाणारे हॉर्न, टीव्ही, मोबाईल यांचे आवाज, नवीन तंत्रज्ञानाचे साऊंड सिस्टिम्स, चित्रपटगृहातील आवाज, मिक्सर, फटाके, बांधकामाची यंत्रे आदी ध्वनीप्रदूषणाचे अनेक स्रोत असून त्यांचे नियंत्रण करणे ही आजची गरज आहे.

आवाजाचे गंभीर परिणाम

मोठा आवाज वारंवार कानावर पडत असेल तर त्याचा बौद्धिक आणि कुशल कामात व्यत्यय येऊ शकतो. शिवाय कायम स्वरूपाचे बहिरेपण, झोपमोड, मानसिक आणि भावनिक असंतुलन, हृदयरोग, रक्तदाब, प्रसंगी मृत्यू देखील होऊ शकतो. तसेच गर्भवती स्त्रीच्या गर्भाला हानी पोचू शकते. गोंगाटामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. वृद्धांचा रक्तदाब वाढू शकतो. हृदयविकाराची तीव्रता वाढू शकते. श्रवणशक्ती कमी होऊ शकते. प्राण्यांमध्येसुद्धा काही दुष्परिणाम नोंदवले गेले आहेत.

Noise Pollution
MS Dhoni IPL 2024 : धोनी आला की ध्वनी प्रदुषण! यंदाच्या हंगामात 'या' सामन्यात प्रेक्षकांनी केला रेकॉर्ड ब्रेक दंगा

सहन करण्याची क्षमता ८० डेसिबलपर्यंतच!

आवाजाची तीव्रता डेसिबलमध्ये मोजता येते. डेसिबल हे घातांकित एकक असून दर दहा डेसिबलला आवाजाची तीव्रता दहा पट वाढते. अर्थात २० डेसिबलचा आवाज १० डेसिबलच्या १० पट तर ३० डेसिबलचा आवाज १० डेसिबलच्या १०० पट असतो. साधारणपणे ८० डेसिबलपर्यंत आवाज मनुष्य सहन करू शकतो. त्यापेक्षा मोठ्या आवाजामुळे त्रास होतो. या कोलाहलात पक्षांची किलबिल, हवेच्या झुळुकीची शीळ, आपल्याला ऐकू येत नाही. थोडक्यात मानवाने मांडलेल्या पसाऱ्यात निसर्गाचा आवाज हरवून जातो.

  • ० ते ७० डेसिबल : हलका आवाज

  • ७० ते ८० डेसिबल : त्रासदायक आवाज म्हणजे गर्दीचा रस्ता, संभाषण इत्यादी

  • ८० ते ९० डेसिबल : त्रस्त करणारा आवाज म्हणजे खूप गर्दीचा अथवा रेल्वेचा आवाज

  • ९० ते १२० डेसिबल : अतिशय त्रासिक आवाज म्हणजे प्रचंड रहदारीचा आवाज

  • १२० ते १३० डेसिबल : डीजे, सार्वजनिक कार्यक्रम आणि बांधकामाच्या ठिकाणची विविध यंत्रे, विमान इत्यादी

Noise Pollution
Ringing Noises In Ear :  कानात सतत शिट्टी वाजल्याचा आवाज येतोय का? असू शकतो हा आजार  

साधारणपणे ८० डेसिबलपर्यंत आवाज मनुष्य सहन करू शकतो. मात्र, अलीकडच्या काळात त्याची काळजी कुणीही करताना दिसत नाही. मोबाईलवर सतत हेडफोन घालून बातचीत, सोशल मीडिया बघणे व ऐकणे. सोहळ्यांमधील गोंगाट, बॅन्ड, डीजेचा जीवघेणा आवाज, हे थांबले नाही तर प्रत्येक व्यक्तीची ऐकण्याची क्षमता क्षीण होण्याचा दिवस दूर नाही.

- डॉ. अनिता भोळे, कान-नाक-घसा तज्ज्ञ, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com