मानससूत्र : मैत्री एक सुसंग

मैत्रीचे बंध कधी जुळतात, तर कधी तुटतात. वाढत्या वयात समान आवडी-निवडी, एकसारखे छंद, जोपासलेली नैतिक मूल्यं ही सर्व कारणं मैत्रीस कारणीभूत ठरतात.
Friendship
FriendshipSakal

- डॉ. जयश्री फडणवीस

आपलं बालपण किती छान होतं ना? अगदी निरागस. दोन बोटं जोडली, की मैत्री पक्की. एकदम बट्टी.

मैत्रीचे बंध कधी जुळतात, तर कधी तुटतात. वाढत्या वयात समान आवडी-निवडी, एकसारखे छंद, जोपासलेली नैतिक मूल्यं ही सर्व कारणं मैत्रीस कारणीभूत ठरतात. एकमेकांना प्रोत्साहित करणं, चांगल्या- वाईट प्रसंगांत बरोबर राहणं, भक्कम आधार देणं या सर्वांतून मैत्री विकसित होत जाते.

मैत्री एखाद्या सुंदर फुलासाररखी हळुवार उमलत जाते. तिचं रंग, रूप, गंध आणि हो, ती तशीच प्रफुल्लीत ठेवण्याकरिता जे कष्ट आपण घेतो, त्यातून आपलंही व्यक्तिमत्त्व खुलत जातं... पण कधीतरी ही मैत्री कोमेजू लागते? का बरं?

समज-गैरसमज : अनेकदा आपल्या मनातील विचारांचं स्वरूप, किंवा आपल्या बोलण्यामागचा हेतू समोरच्याच्या लक्षात येत नाही. त्या संवादामागे असलेला प्रचलीत हेतूच कधीकधी वरवर घेतला जातो. चुकीचा अर्थ घेतल्यानं गैरसमज होतो.

एकदा नुकतंच लग्न ठरलेली एक मैत्रीण तिच्या भावी पतीबरोबर फिरायला जात असताना तिची एक घट्ट बालमैत्रीण भेटली. ‘ए! तुझे मिस्टर अगदी अमुक अमुक अभिनेत्यासारखे दिसतात का!’ असा प्रश्न तिनं विचारला. झालं! पहिली मैत्रीण चिडली, तिला वाटलं, माझे मिस्टर विनोदी दिसतात, असं म्हणतेय; पण त्या सखीला ‘त्या अभिनेत्यासारखे देखणे आहेत’ असं म्हणायचं होतं. चाळीस वर्षांपूर्वीची घटना, आज या सख्या साठीच्या घरात गेल्या आहेत; पण कट्टी आहे!

विश्वासघात : मैत्रीत अनेक गुपितं एकमेकांना सांगितली जातात. गुपित दोघांमध्येच राहिलं पाहिजे ही अपेक्षा असतेच; पण जेव्हा त्याच गोष्टी इतरांमध्ये पसरवल्या गेल्या, तर वाईट वाटतं, अपमानितही वाटतं. झालेल्या विश्वासघाताने मैत्रीही संपुष्टात येते. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी, की मैत्रीत कितीही वितुष्ट आलं, तरीही इतरांशी बोलताना आपल्या भूतकाळीतील मैत्रीबद्दल अथवा मित्राबद्दल एकही अपशब्द निघता कामा नये. इतरांना त्याचं भांडवल बनवण्याची संधी आपणच देता कामा नये. कधी काळी आपणच या मैत्रीत खूप आनंदी क्षण घालवले आहेत, हे विसरता कामा नये.

प्राधान्य : जसजसं वय वाढत जातं, तसतसं आपल्या आयुष्यातील व्यक्तींचे प्राधान्यक्रमही बदलत जातात. नवजात बालकाला आईशिवाय विश्व नसतं. तेच बाळ बालवाडीत जाताच, सर्व काही शिक्षिका सांगेल तसं होऊ लागतं. मग मोठी शाळा, किशोरवयातील मैत्रीच्या नात्याला सर्वांत जास्त प्राधान्य दिलं जातं.

त्यापुढील आयुष्यात मात्र मैत्रीचं नातं हे भोवतालचा परिस्थितीनुसार बदलत जातं. आयुष्यातील जोडीदाराला सर्वप्रथम प्राधान्य देणं आवश्यक आहे. त्यानंतर येतात ते व्यवसाय अथवा ऑफिसमधील मित्रमंडळी. इथं आपण नातेवाईकांबद्दल चर्चा करत नाही, तर मैत्रीबद्दल विचार करतोय.

विविध सामाजिक कार्यातून एकत्रित येणारे मैत्रसंबंध उदा. रोटरी, लायन्स क्लब, तत्सम अनेक ग्रुप्स आपल्या आयुष्यात येतात. ‘व्हॉट्सॲप’नं तर जगभरातील मित्र-मैत्रिणी जोडल्या गेल्या आहेत. या सर्व प्रकारांतील मैत्रीचा प्राधान्यक्रम समजून उमजून चालणाऱ्या व्यक्तीशी मैत्री दीर्घकाळ टिकेल.

स्पर्धा, हेवेदावे : अनेकदा एखादा मित्र हा सर्व ग्रुपमधून खुप यशस्वी होतो, अनेक पारितोषिकं मिळवू लागतो, आर्थिक सुबत्ताही वाढते. अशा वेळी ग्रुपमधील काही लोक अशा व्यक्तीला टाळू लागतात. अनेकांना दुसऱ्यांचं यश सहन होत नाही. ‘त्याला कुठं वेळ आहे’ हे उगीचच गृहीत धरून त्या व्यक्तीला हळूहळू टाळलं जाऊ शकतं.

एखाद्या मैत्रीत अचानक समोरची व्यक्ती भेटेनाशी झाली, अथवा फोनही करत नसेल, तर प्रत्यक्ष भेटून कारणं जाणून घ्या. नेहमी आपणच चुकतो असं नाही, तर कधी त्या व्यक्तीची परिस्थितीही असेल.

मैत्री टिकवून ठेवायला दोन्ही बाजूंनी प्रयत्न करावे लागतात. दुर्लक्ष केल्यास निर्माण झालेला दुरावा विकोपाला जाऊ शकतो. अनेकदा विविध प्रकारच्या न्यूनगंडांमधूनही व्यक्ती दुरावते. अशा मैत्रीत समक्ष भेटून आत्मविश्वास निर्माण करता येतो.

मैत्रीचं स्वरूप हे गतिमान असतं. मैत्रीचं नातं अनुभवातून, मुक्त संवादातून विकसित होत जातं. एकमेकांप्रती असलेला आदर; तसंच सहिष्णूता या नात्याला अधिक दृढ करते.

सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com