समृद्ध करणाऱ्या वाचनवाटा

मी बऱ्याच वर्षांनी दैनंदिन मालिका करते आहे. त्यामुळे कुणीतरी सहज विचारले, ‘मग, काय फरक जाणवतो आहे तुला, तेव्हा आणि आतामध्ये?’ मी हसून म्हटलं, ‘खूपच!
Reading
Readingsakal

- डॉ. समिरा गुजर-जोशी

मी बऱ्याच वर्षांनी दैनंदिन मालिका करते आहे. त्यामुळे कुणीतरी सहज विचारले, ‘मग, काय फरक जाणवतो आहे तुला, तेव्हा आणि आतामध्ये?’ मी हसून म्हटलं, ‘खूपच! कितीतरी गोष्टी बदलल्या आहेत. असं पटकन नाही सांगता येणार!’ खरंच होतं ते. या विषयावर अख्खा लेख लिहूनही तो संपणार नाही; पण मग मनाला तो चाळा लागला.

काय काय बदललं आहे ह्याची माझ्याही नकळत मी नोंद घेऊ लागले आणि एक गोष्ट पटकन लक्षात आली. ती म्हणजे पूर्वी सेटवर रिकामा वेळ असला की कलाकारांच्या हातात हमखास पुस्तक दिसायचं. गप्पांमध्ये ‘काय वाचते / वाचतो आहेस सध्या?’ हा प्रश्न असायचाच. म्हणजे तेव्हाही सगळे वाचायचे असं नाही; पण वाचनाची आवड बहुसंख्यांना असायची.

आजकाल सेलिब्रिटी इंटरव्ह्यूमध्ये एक सेगमेन्ट असतो बघा, ‘माझ्या बॅगेत असणाऱ्या अत्यावश्यक वस्तू’ ...त्यामध्ये ‘सनस्क्रीन, लिप ग्लॉस, सनग्लासेस’ अशा अनेक गोष्टींची वर्णी लागते; पण सहसा पुस्तक असं उत्तर मिळत नाही. हां, माझे इयर-पॉडस असं उत्तर ऐकलं आहे मी. पूर्वी असा प्रश्न विचारला असता तर मात्र ‘पुस्तक’ असं उत्तर अनेकांनी दिलं असतं असं वाटतं.

अर्थात हे केवळ कलाक्षेत्रात आहे असं नाही. आजकाल सगळीकडे सहसा हेच चित्र दिसतं. मोकळा वेळ मिळाला, की हातातच असलेला मोबाइल मनोरंजनाच्या इतक्या शक्यता उघडतो, की पुस्तकापर्यंत पोचायला वेळच मिळत नाही; पण वाचनाचा आनंद काही वेगळाच असतो हेही तितकंच खरं.

आपण एखादी गोष्ट पाहणं आणि वाचणं या अनुभवात फरक आहे. आज आपण आपल्या डोळ्यांनी खूप बघतो आहोत; पण आपण वाचतो तेव्हा आपण मनाच्या डोळ्यांनी बघतो. आपली कल्पनाशक्ती कामाला लागते. आज आपण सतत मल्टिटास्किंग करत असतो; पण वाचन करताना मात्र आपण आपोआप फोकस करायला शिकतो. एकाग्रता सहजच वाढते.

मलाही जगभरच्या फिल्म्स बघायला, ओटीटीमध्ये रमायला अतिशय आवडतं; पण वाचनातून मिळणारा आनंद हा वेगळ्या प्रतीचा आहे, तो आपण गमवू नये एवढंच माझं म्हणणं आहे. मला माझ्या मुलीला एकच गोष्ट भेट द्यायची असेल, तर नि:शंकपणे मी तिला पुस्तकं भेट देईन किंवा परमेश्वराकडे तिला वाचनाची आवड लागावी अशी प्रार्थना करीन; पण नुसती प्रार्थना करून काही होणार नाही.

त्यासाठी मलाही काहीतरी पाऊलं उचलावी लागतील. सगळ्यात आधी मला वाटतं, तिच्यासमोर आणि तिच्यासोबत मी वाचायला हवं. सगळ्या कुटुंबानं एकत्र बसून एखादं पुस्तक वाचणं यासारखा आनंदच नाही. अर्थात घरात सहज हाताशी येतील अशी पुस्तकं हवीत. आता या बाबतीत स्मार्टफोनही मदतीला येऊ शकतो. जरा सवय केली तर फोनवर विविध रीडिंग ॲप्सच्या मदतीने पुस्तकं साठवणं आणि वाचणं अतिशय सोयीचं ठरू शकतं.

आजही हातात पुस्तक घेऊन वाचणं हेच मला अधिक आवडतं. मात्र, या नवीन पद्धतीनं वाचण्याचे काही खास फायदे आहेत. ॲपवर पुस्तक वाचताना एखादं छान वाक्य वा उतारा हायलाइट अर्थात अधोरेखित करून ठेवणं सोपं जातं. वाचताना थांबलो, तर बुकमार्कची सोय उपयोगी पडते. आज नेमकं किती वाचलं याचा अंदाज घेणं सोपं जातं.

विशेषतः इंग्रजी पुस्तकं वाचताना एखादा शब्द अडला, तर तिथल्या तिथं त्याचा अर्थ / उच्चार समजून घेणंही शक्य होतं. सगळ्यांत महत्त्वाचा फायदा म्हणजे ही पुस्तकं जागा घेत नाहीत. पुस्तकं सांभाळणं एकदम सोपं होतं. एकावेळी अनेक पुस्तकं वाचणं सहज शक्य होतं. त्यातही काही ॲप्सवर लायब्ररीसारखी सोयही असते. म्हणजे पुस्तक विकत घ्यायला नको. वाचून परत द्यायचं.

अर्थात पुस्तकं विकत घ्यायला हवीत. तो अमूल्य ठेवा आहे. मात्र, आज आपल्याकडे अनेक अशी कुटुंबं आहेत, जी कामाच्या निमित्तानं सतत फिरत असतात, त्यांना घरंसुद्धा सतत बदलावी लागतात. अशा मंडळींना हे फार सोयीचं ठरू शकतं.

नुकतंच मी अमेरिकन अभिनेत्री ज्युलिआना मार्गूलियस हिचं ‘सनशाईन गर्ल’ नावाचं आत्मचरित्रात्मक पुस्तक मागवलं. फार मजा आली वाचताना. ती सात वर्षं एक दैनंदिन मालिका करत होती. तिचे अनुभव वाचताना किती नवीन गोष्टी कळल्या, शिकायला मिळाल्या. वाचनाचा हा सगळ्यात मोठा फायदा. मग सहज मी तिचं इन्स्टा हॅंडल फॉलो केले आणि पाहते तर काय? तिच्या अनेक पोस्ट बुक रिकमेंडेशनच्या होत्या.

त्याखाली अनेकांनी आपण हे पुस्तक वाचल्याचं सांगितलं होतं, आपला अभिप्रायही दिला होता. अचानक मला साक्षात्कार झाला, की वाचणारी माणसं जगभर आजही वाचत आहेत आणि वाचत राहतील. आपण मोबाइल आणि सोशल मीडियाला दोष देण्यापेक्षा त्याचा योग्य वापर करण्यावर भर द्यायला हवा. तेव्हा चला, वाचू आनंदे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com