तू फुलराणी : सुरुवातीची ‘पहाट’पेरणी

मैत्रिणी, नव्या वर्षाची सुरुवात होते आहे. सुरुवात हे शब्दच किती उत्साह वाढवणारे आहेत. या शब्दातच सकारात्मकता, उत्सुकता आणि काहीशी अधीरतासुद्धा आहे.
11
11

- डॉ. समिरा गुजर

मैत्रिणी, नव्या वर्षाची सुरुवात होते आहे. सुरुवात हे शब्दच किती उत्साह वाढवणारे आहेत. या शब्दातच सकारात्मकता, उत्सुकता आणि काहीशी अधीरतासुद्धा आहे. लहानपणी शाळेत घोकलेलं इंग्रजी सुभाषित आठवतं? - ‘Well begun is half done.’ एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली झाली की अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे..... पण माझा प्रश्न आहे - well begun या पार्टबद्दल. Well or not... योग्य असेल वा नसेल- सुरवात करणं महत्त्वाचं नाही का? हा प्रश्न मला का पडला तेही सांगते. आठवतंय, आपण शाळेत, कॉलेजमध्ये होतो, नवीन काही करायचं म्हटलं की किती उत्साह असायचा; पण जसजसे आपण मोठे होऊ लागतो तसा हा उत्साह कमी होतो का? वर्षाचीच नव्हे, तर प्रत्येकच दिवसाची सुरवात new beginning असायला हवी; पण असं होत नाही, असं तुलाही वाटतं का?

असं का वाटलं तेही सांगते. नवीन वर्षाच्या संकल्पांविषयी मी ज्या-ज्या लोकांशी बोलले, त्यातल्या ७० टक्के लोकांचं म्हणणं होतं, की ‘एक जानेवारीला करायचा आणि पाच-सात जानेवारीपर्यंत विसरूनही जायचा, अशा संकल्पाला काय अर्थ आहे?’ त्यांचं म्हणणं खोटं नव्हतं. तरीही मला ते पूर्णपणे पटलं नाही- कारण ते भूतकाळातच रमले आहेत. पण सुरुवात करण्याची गंमत ही आहे, की Begin at the beginning and go on till you come to the end; then stop.

मग सहज वाटलं मोठं होता होता ज्या गोष्टी आपण मागे टाकल्या, त्यात ही नव्याची नवलाई मागे पडली का? अपयश येऊ नये म्हणून आपण ‘wel begun’ ची full proof योजना आखताआखता सुरवातच नको म्हणू लागलो. पुन्हा एक विसरलो, की ‘बिगिनिंग’ची सुरुवात ‘सुरुवात’ करण्यापासून होते. म्हणजे मगाशी घेतलेल्या उदाहरणात १ जानेवारीला केलेला संकल्प ५ जानेवारीला विसरलो तर ठीक आहे ना...६ जानेवारीला तो परत करायचा. सुरवात कितीही वेळा, कधीही करता येते, नाही का!

माझाच किस्सा सांगते. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, असं मला वाटतं होतं. त्यासाठी दिवस लवकर सुरू करणे, पहाटे उठणं हा उत्तम उपाय हेही कळत होतं; पण मी स्वतःच स्वतःला सांगायचे....तुला कसं जमणार पहाटे उठणं? उशिरापर्यंतचं शूटिंग, कार्यक्रम यांतून कसं शक्य आहे पाच वाजता उठणं? सहज माझ्या वाचनात डॉ. इंगळहळ्ळीकरांची एक कविता आली.

दिवस संपून रात्र आपोआप होते....

रात्र संपून सकाळ आपोआप होते...

पहाटेच मात्र तसं नसतं...

पहाट आपोआप होत नसते...

रात्र संपून दिवस सुरू होण्याच्या मधल्या वेळेत...आपली पहाट आपण पेरायची आपली पहाट आपण पेरायची हा विचारच मला खूप आवडून गेला. मी विचार केला प्रयत्न तर करून बघूया. दुसऱ्याच दिवशी प्रयत्न केला. साडेपाचचा गजर लावला. Snooz च्या बटणाकडे वळणारी बोटं थांबवली. उठले. खिडकी उघडली आणि बाहेरच्या गार हवेनं डोळ्यावरून हळुवार बोटं फिरवली. एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्साहात पावलं स्वयंपाकघराकडे वळली. शांतपणे चहा ठेवला. आलं किसून घातलं, पाती चहा चुरडून टाकला, त्याचा सुगंध वाफेवर दरवळेपर्यंत पाणी उकळू दिलं. मग चहा कपात घेऊन खिडकी गाठली. बाग न्याहाळली. झाडांना कुरवाळलं....मला तर हा ‘अलिबाबाची गुहा सापडल्याचा’ क्षण होता. आज साडेपाचला उठले. पाचला उठले, तर वाढीव अर्ध्या तासात आता मी वाचन, व्यायाम करू शकणार होते.... मला खूप शक्यता दिसू लागल्या. आता तर लवकर उठण्याची इतकी गंमत वाटू लागली, की मी जागणं टाळू लागले. अधूनमधून ब्रेक सुरू असले, तरी मी दर दिवशी नव्यानं सुरवात करते. कारण मला माहिती आहे, पहाटेचा चहा जसा लागतो तसा कुठलाच चहा फक्कड लागत नाही...आणि पहाट आपोआप होत नाही.

लवकर उठायचं ठरवल्यावर मी त्याविषयीची छान पुस्तकं वाचली, अनुभव ऐकले. पहाटे उठण्याच्या प्रवासात खूप सहप्रवासी आहेत हे लक्षात येऊन उत्साह अधिक वाढला. आता या कॉलमचीसुद्धा ही सुरवात नाही का? मनात प्रश्न, शंका तर आहेतच. पण मी त्याआधीच सुरवात केली. विचार एकच.... सुरवात तर करूया. या नवीन वर्षात आपण एकत्र प्रवास करूया. Let''s be a better version of ourselves. आज आपण जशा आहोत.. त्याच्या पुढे दोन पावलं जाऊया...चल मैत्रिणी, नवी सुरवात करूया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com