esakal | सलाम! फोटोतून झाले डॉक्टर व्यक्त; सोशल मीडियावर होतेय चर्चा

बोलून बातमी शोधा

सलाम! फोटोतून झाले डॉक्टर व्यक्त; सोशल मीडियावर होतेय चर्चा
सलाम! फोटोतून झाले डॉक्टर व्यक्त; सोशल मीडियावर होतेय चर्चा
sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर, बेड, रेमेडिसिवीर आणि अन्य औषधांची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. मात्र, तरीदेखील प्रशासन व डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करुन रुग्णांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही तर आता डॉक्टर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहे. आतापर्यंत अनेक डॉक्टरांचे जनतेला आवाहन करणारे, सध्या कोविड वॉर्डमधील परिस्थिती सांगणारे किंवा डॉक्टरांना करावा लागत असलेल्या संघर्षाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्येच सध्या गुजरातमधील डॉ. सोहिल यांचा एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. २४ तास पीपीई किटमध्ये राहून डॉक्टरांची नेमकी अवस्था कशी असते हे त्यांनी या फोटोच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे कोविड सेंटर, रुग्णालये येथे मोठ्या प्रमाणावर कोविड पेशंट असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारी रुग्ण संख्या आणि डॉक्टरांची कमी संख्या यामुळे आरोग्ययंत्रणेवर भार पडत आहे. अनेक डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी एकही सुट्टी न घेतात दिवसरात्र काम करत आहेत. यामध्येच डॉ. सोहल यांनी एक फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा: लहान मुलांसाठी कोरोना गाईडलाइन्स; घ्या चिमुकल्यांची काळजी

गुजरातमधील धारपूर येथील GMERS Hospital मधील डॉ. सोहिल यांनी त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. यापैकी पहिल्या फोटोमध्ये ते पीपीई किटमध्ये दिसत आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये ते पीपीई किटशिवाय दिसत आहेत. मात्र, पीपीई किट काढल्यानंतर त्यांचं संपूर्ण अंग घामाने चिंब भिजलेलं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पीपीई किट घातल्यानंतर डॉक्टरांनादेखील असंख्य त्रास जाणवत असतात. मात्र, त्याही परिस्थितीत ते रुग्णांवर उपचार करत असतात हे सांगणार हा फोटो आहे.

दरम्यान, डॉ. सोहिल यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर काही क्षणार्थात तो सोशळ मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी डॉक्टर व इतरेतर कर्मचाऱ्यांना सलाम केला आहे.