बालपण समृद्ध होण्यासाठी...

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज (ता.१४) वाढदिवस, तो बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पालकत्व अधिक सजग करून बालपण समृद्ध कसे करावे, याबाबत केलेले विवेचन.
Childhood
Childhoodsakal
Summary

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज (ता.१४) वाढदिवस, तो बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पालकत्व अधिक सजग करून बालपण समृद्ध कसे करावे, याबाबत केलेले विवेचन.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज (ता.१४) वाढदिवस, तो बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पालकत्व अधिक सजग करून बालपण समृद्ध कसे करावे, याबाबत केलेले विवेचन.

देशात युवकांचे प्रमाण ४५ टक्क्यांहून अधिक आहे. त्याचा योग्य वापर केल्यास समाजाला आणि देशाला नक्कीच फायदा होईल. थॉमस हक्सले यांचे, ‘मला एक असा तरुण मिळवून द्या की, जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विचार त्याच्या ताब्यात आहेत. मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन,’ हे वाक्य लक्षात घ्यावे. त्यांचा सर्वसमावेशक अर्थ म्हणजे आजकाल अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली मुलं क्वचितच मिळतात. अशी मुलं घडवण्याची जबाबदारी पालकांवर आहे. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनाने पालक मुलांकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाहीत. त्याचा दुष्परिणाम म्हणजे मुलांना पालकांप्रतीच नव्हे तर त्यांच्यामध्ये समाजात वावरताना सहानुभूतीचा अभाव दिसतो. प्रेम, मैत्रीभाव व नातेसंबंध जपण्यामध्ये अशी मुले कमी पडू शकतात. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता, नैराश्य व कधीकधी आगाऊपणा वाढलेला दिसू शकतो. म्हणून प्रेम, जबाबदारी, समाजाचा विचार, संयम, मैत्रीभाव, बंधुत्व इत्यादी गोष्टींनी मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी उत्तम पालकत्व आवश्यक आहे. चांगला पालक होण्यासाठी प्रभावी पालकत्व शैलीची गुणवैशिष्ट्ये माहिती असणे गरजेचे आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डियाना बॉमरिंड यांनी पालकत्व शैलीवर संशोधान करून चार महत्त्वाच्या पालकत्व शैली समाजासमोर मांडल्या आहेत. त्या अशा -

हुकूमशाही पालकत्व

नावाप्रमाणेच हे पालकत्व आदेश देणारे तसेच कठोर प्रकारचे असते. या शैलीतील पालकांना आपली मुले आपण सांगितल्याप्रमाणेच वागतील अशी अपेक्षाच नव्हे तर विश्वास असतो. असे पालक मुलांना स्वतंत्रपणे कोणताही विषय हाताळू देत नाहीत. त्यात ते स्वतः लक्ष घालतात. असे पालक मुलांना शिस्त लावण्यापेक्षा चुकल्यावर शिक्षा देण्यावरच भर देतात. त्यांचा कल मुलांना शिकवण्यापेक्षा त्यांच्या चुका दुरुस्त करण्यावर भर असतो. अशा पालकांची मुले शिस्तबद्ध व स्वतःवर नियंत्रण असलेली असतात. अशा पालकांमध्ये व मुलांमध्ये नात्यात दुरावा राहिल्याने पालक आणि मुलांमध्ये संवाद, सुसंवाद व विश्वास निर्माण होणे कठीण जाते. पालकांच्या अतिजाचामुळे मुलांचा आत्मविश्वास घटून ती एकलकोंडी बनतात. स्वतःला असुरक्षित समजतात. अशा पालकांनी स्वतःच मुलांची कोंडी दूर करावी. त्यांच्या समस्या सोडवाव्यात. मुलांचा विश्वास संपादून त्यांच्यासोबत चर्चेद्वारे शंकेचे समाधान शोधावे. त्यांना स्वतःला समस्यांवर तोडगे शोधण्याकरता प्रोत्साहित करावे.

मुक्ताचार पालकत्व

अशा पालकत्वामधील पालक आपल्या मुलांवर नाही ती बंधने आणत नाहीत. स्वयंनिर्णयास, मनमोकळ्या आचरणास परवानगी देतात. अशा पालकांमध्ये दयाळूपणा व ममत्व भरभरून असते. ते मुलांची काळजी घेतात, निराश करत नाहीत. उभयतांत मैत्री व बंधुभाव जपतात. मुलांना समस्या मांडण्याकरिता प्रोत्साहित करतात. अशी मुले भविष्यात अहंकारी, रागीट किंवा वर्चस्ववादी बनू शकतात.

अशा शैलीच्या पालकांनी थोडीशी सूट दिल्यामुळे त्यांची मुले अतिउत्साही होऊन चुकीचे निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे पालकांनी गरज आहे तिथेच मुलांच्यापाठी राहावे. अशा पालकांनी मुलांची चूक झाली असेल तर ती त्यांना दाखवून द्यावी, त्यांना पाठीशी घालू नये. ही मुले हट्टी असतात. मुक्ताचार पालकत्व शैली असलेले पालक मनाने हळवे असू शकतात. परंतु त्यांनी मुलांचा योग्य हट्ट पुरवावा.

विश्वासार्ह पालकत्व

अशा शैलीच्या पालकांची खरी ताकद म्हणजे मुले आणि त्यांच्यामधील सुसंवाद. या शैलीचे पालक आणि हुकूमशहा पालक यामध्ये काहीसे साम्य असते. या शैलीचे पालकसुद्धा आपल्या मुलांसाठी नियम बनवतात. पण ते तुलनेने थोडेसे शिथिल किंवा मुलांच्या गरजेनुसार असतात. असे पालक तर्कवितर्क लावतात व मुलांना समजावून सांगतात. यामुळे मुलांना आयुष्याचे गणित कळू लागते. असे पालक वेळोवेळी मुलांना योग्य ती समाज देतात, परिणामी सकारात्मकता वाढते.

या शैलीचे पालक चारचौघांमध्ये मुलांच्या बाजूने उभे राहतात, ज्यामुळे त्यांचा पालकांवरील विश्वास वाढतो. असे पालक मुलांचे निर्णय किंवा त्यांच्या गोष्टी स्वच्छंदपणे मान्य करतात, मताला प्रोत्साहित करतात. अशा पालकांमुळे मुलांची निर्णयक्षमता आणि मते मांडण्याची क्षमता वाढते. या प्रकारचे पालकत्व वाढत्या वयातील मुलांसाठी पर्वणीच असते. ज्यामुळे कुटुंबात सकारात्मक वातावरण राहते. मुले व पालकांमधील ऋणानुबंध वाढतात. अशा पालकांच्या सहवासातली मुले हुशार, संवेदनशील, आनंदी असतातच, शिवाय हमखास यशस्वीही होतात. देशाचे जबाबदार, समाजात नावलौकिक मिळवलेले व निर्णयक्षम नागरिक बनतात.

अशा पालकांनी मुलांना हात धरून न शिकवता त्यांना त्यांच्या डोळ्यांनी जग पाहण्याची संधी द्यावी. मुले जेव्हा प्रत्येक गोष्टीचा वैयत्तिक अनुभव घेतात तेव्हा त्यांची आकलनशक्ती वाढते. प्रतिकूलतेशी सामना करायला शिकतात. त्यांना लहानपणापासूनच स्वावलंबी, निर्भीड व आत्मनिर्भर बनवायचा प्रयत्न करावा. अशा पालकांकडून कधी गैरवर्तन झाले तर मुले ते लक्षात ठेवतात. या शैलीतील पालकांनी मुले चुकल्यास त्यांची इतरांशी तुलना न करता त्यांना समजावत योग्य मार्गदर्शन करावे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांची पुढील वाटचाल आत्मविश्वासाने होते.

निष्काळजी पालकत्व

या शैलीचे पालक आपल्या मुलांना कधीच समजून घेऊ शकत नाहीत. त्यांना मुले काय करतात आणि काय नाही याच्याशी काही घेणे-देणे नसते. ते स्वतःच्या आयुष्यात रमतात, अनेकदा त्यांचे मुलांकडेही दुर्लक्ष होते. ही सर्वात नुकसानकारक शैली आहे. यामधील पालक मुलांची कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वतःवर घेत नाहीत, त्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण करत नाहीत. अशांची मुले कायम वंचित, त्रासलेली, नकारात्मक व चिडचिडी असतात. नैराश्याने ग्रासलेली असतात. त्यांच्या मनात काहूर माजलेले असते, जे सहजासहजी कधी कोणाला ओळखू येत नाही. अशा पालकांची मुले अतिशय बुजरी राहतात. ती कायम स्वतःच्याच मस्तीत असतात. बाहेर कायम भावनिक आधार शोधतात. आयुष्यातील जवळजवळ सगळ्याच क्षेत्रांत अशी मुले कमकुवत व अयशस्वी ठरतात.

या शैलीतील पालकांनी मुलांसमोर कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन टाळावे. खोटे, असभ्य बोलणे व वागणे टाळावे. मुले नकारात्मक गोष्टी लगेच आत्मसात करतात. पालक जे बोलतात, करतात ते त्यांना करायला आवडते. अशी शैलीतील पालकांची मुले नैराश्याने ग्रासलेली व नकारात्मक असतात. अशा मुलांच्या चुका पालकांनी समजून घ्याव्यात. त्यांना नवीन स्पर्धेसाठी तयार करावे.

मुलांचे योग्य भवितव्य घडवण्यासाठी व त्यांच्यासोबत मैत्री व विश्वासाचे दृढ नाते करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपण कोणत्या शैलीमध्ये येतो हे जाणून घ्यावे. आपली मुले प्रेमळ, सकारात्मक, जबाबदार, ध्येयवादी, आशावादी होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आपल्या मुलांनाही समजून घ्यावे.

(लेखक आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com