समस्या सोडवण्याचे कौशल्य मुलांमध्ये कसे विकसित करू शकता?

समस्या सोडवण्याचे कौशल्य मुलांमध्ये कसे विकसित करू शकता?
समस्या सोडवण्याचे कौशल्य मुलांमध्ये कसे विकसित करू शकता?

आयुष्य जगत असतांना प्रत्येकाला संकट, समस्या या सगळ्यांचा सामना करावा लागतो. परंतु, या सगळ्या समस्या आपण आपआपल्या परिने सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. विशेष म्हणजे या समस्या केवळ आपल्याच आयुष्यात नव्हे तर लहान मुलांनाही जाणवत असतात. परंतु, त्याच स्वरुप वेगळं असतं. म्हणूनच, लहान मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांसोबत मुलांनी कशाप्रकारे डील करावं म्हणजेच त्यांनी या समस्या कशाप्रकारे सोडवाव्यात याचं कौशल्य त्यांच्यात विकसित करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच मुलांमध्ये हे कौशल्य कसं डेव्हलप करावं ते जाणून घेऊयात. (expert-speak-develop-problem-solving-skills-in-children)

१. मुलांना वाचनाची गोडी लावा -

पुस्तक हा सर्वात जवळचा सोबती असतो असं म्हटलं जातं. त्यामुळेच लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी लावा. त्यामुळे मुलांचे शब्दोच्चार सुधारतील व त्यांच्यात बोबडे बोलण्याची समस्या असेल तर ती दूर होईल. तसंच मुलांनी नवनवीन विषयांची माहिती मिळेल, त्यातून त्यांची विचार करण्याची क्षमता वाढेल, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन तयार होण्यास सुरुवात होईल. परंतु, आपण मुलांना काय वाचायला देत आहोत. ते वाचण्यामागचं कारण काय हेदेखील मुलांना नीट समजावून सांगितलं पाहिजे.

पालकांनी हे करा -

मुलं जर लहान असतील तर तुम्ही त्यांना दररोज काही तरी वाचून दाखवा. तसंच मुलांना कोणत्या विषयात रस आहे हे ओळखून त्यांच्यात वाचनाची प्रेरणा निर्माण करा. तसंच मुलांना कथा वाचून दाखवल्यानंतर त्यांनी त्यातील काही प्रश्न विचारुन पाहा.

२. मुलांच्या विचारांना चालना द्या-

कोणत्याही समस्येवर तोडगा काढायचा असेल त्यावर प्रथम विचार केलाच पाहिजे. विचार केल्यानंतर अनेक अडलेल्या प्रश्नांची उकल निघते. त्यामुळेच मुलांनाही ही सवय लावा. मुलांना लहान लहान काम सांगून त्यावर विचार करायला भाग पाडा. उदा. सुट्टीचं नियोजन कसं करावं, गणितं कशी सोडवावीत. असे लहान लहान टास्क त्यांना द्या. ज्यामुळे त्यांच्या विचारांना चालना मिळेल.

पालकांनी काय करावं -

लहान मुलांना शक्यतो बुद्धिबळ, कार्ड गेम्स, लुडो यासारखे कोड्यात टाकणारे खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा. तसंच काही गणित, कोडी त्यांना द्या.

३. विचार करायला लावा -

मुलांच्या विचार क्षमतेला चालना देण्यासाठी त्यांनी लहान लहान गोष्टींतून विचार करायला लावा. त्यामुळे घरात एखादी गंभीर परिस्थिती उद्भवली तर मुलं घाबरुन न जाता त्याला सामोरं जातील.

पालकांनी काय करावं -

लहान मुलांमधील कुतूहल वाढवण्याचा प्रयत्न करा. सतत त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधा. मुलांना बोलतं करा. आपलं मूल कोणत्याही बाबतीत मागे राहणार नाही यासाठी त्याच्या सामान्य ज्ञानात वाढ करण्याचा प्रयत्न करा. मात्र, हे करत असताना त्यांच्यावर ताण येणार नाही याची काळजी घ्या.

४. क्रिएटिव्ह विचार -

मुलांमध्ये क्रिएटिव्ह विचार डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. मुलं जास्तीत जास्त सर्जनशील विचार करतील यावर भर द्या. यासाठी वेगवेगळ्या साधनांच्या वापर करा व त्यातून त्यांच्या क्रिएटिव्हीटीला चालना द्या.

पालकांनी काय करावं -

जर तुम्ही एखादी पिकनिक प्लॅन करत असाल तर त्यात मुलांना सहभागी करुन घ्या. त्यांच्या डोक्यात कोणत्या नवीन कल्पना आहेत हे त्यांना विचारा. ज्यांमुळे त्यांच्या विचारांना चालना मिळेल. तसंच घरातील आर्थिक नियोजन करतांना त्यांना सहभागी करुन घ्या. उदा. विजेचं बील जास्त येत असेल तर ते कमी करण्यासाठी काय करता येईल ? असे लहान लहान प्रश्न त्यांना विचारा. मुलांना प्रश्नात पाडण्याऐवजी ते प्रश्नाचं निराकरण कसं करतील याकडे पालकांचा कल असू द्या.

५. नियोजन करण्यास शिकवा -

एखादी समस्या सोडवायची असेल तर प्रथम तिचं नियोजन कसं करावं हे मुलांना शिकवा. कोणतीही समस्या सांगून येत नाही. त्यामुळे समोर समस्या असेल तर त्याला घाबरुन न जाता त्यातून मार्ग कसा काढता येईल हे त्यांना शिकवा.

पालकांनी हे करा -

मुलांना त्यांचे प्लॅन करण्यास शिकवा. उदा. मुलांना दिवसाचा दिनक्रम लिहिण्यास सांगा. त्या दिनक्रमानुसार ते काम करतायेत की नाही याकडे लक्ष ठेवा व या कामात कोणती अडचण आली तर ती कशी सोडवावी हे त्यांना सांगा.

६. चुका करु द्या -

चुकीतून माणूस शिकतो हे आपण सारेच जाणतो. त्यातच लहान मूल म्हटलं की चुका होणारच म्हणून मुलांना चुकू द्या. चुकांमधूनच ते शिकतील. परंतु, मूल चुकलं म्हणून लगेच त्यांना शिक्षा देऊ नका. त्यांच्यावर ओरडण्याऐवजी त्यांना प्रेमाने समजून सांगा. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा.

पालकांनी काय करावं -

मुलांना दररोज नवनवीन टास्क द्यावेत. त्यातून त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. तसंच ते चुकले तर पुढच्या वेळी कोणती चूक टाळायची हे त्यांचं त्यांना आपोआप समजू लागेल. अनुभवातून त्यांना शिकू द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com