‘पालन’गोष्टी : वागण्यावर उपाय काय?

आजच्या लेखात एक पालक म्हणून काही गोष्टींचा विचार आपण करणार आहोत
life style
life style sakal

फारूक काझी

बालमानसविषयक साहित्यिक

मा गील दोन्ही लेखांमध्ये आपण मुलांच्या वागण्याच्या तऱ्हा, त्यांच्या वागण्यामागील कारणं या गोष्टींबाबत चर्चा केली. हे सर्व करत असताना एक पालक म्हणून आपली प्रचंड चिडचिड होत असते. वैताग होत असतो. इतर कामं, जबाबदाऱ्या आणि मुलांच्या वागण्याचा अंदाज लावून त्यावर उपाय करणं, या तशा कठीण गोष्टी असतात, परंतु पालक म्हणून अशा गोष्टींची सवय आपणाला असायला हवी. जेणेकरून आपली चिडचिड होणार नाही.

आजच्या लेखात एक पालक म्हणून काही गोष्टींचा विचार आपण करणार आहोत. पालकांचा स्वभाव कसा आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तेव्हा थोडी चर्चा पालक म्हणून आपणासाठी.

मुलांच्या वाढीचं गणित

आपली मुलं वयाचा एकेक टप्पा पार करताना वेगवेगळ्या अवस्थांतून जात असतात. त्यांचा परिचय आपणाला असला पाहिजे. बरेचदा ‘मुलं तसंच वागणार’, असं काही लोक म्हणताना दिसतात. मूल म्हणून त्यांच्या वयाची काही वैशिष्ट्यं असतात. काही मुलं अत्यंत शांत, तर काही भयंकर व्रात्य असतात. अशा वेळी पालकांच्या भूमिका बदलत जातात. सगळी मुलं एकसारखी नसतात; तसंच त्याची वैशिष्ट्यंही एकसारखी नसतात. तेव्हा आपलं मूल कसं आहे हे समजून घेऊन आपण वर्तन केलं, तर आपला मनस्ताप वाचतो.

नेमका गुंता कुठं आहे?

आपलं मूल नेमकं असं का वागतंय, याचा शोध घेणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी गेल्यावर मुलांचं वर्तन एकदमच का बदललं, याची काही करणं असू शकतात. ठिकाण अावडलेलं नसणं, गर्दी नको असणं, दुसरीकडे जायचं असणं किंवा त्यांच्या मनात भीती बसलेली असणं, अशी कारणं मुलांचं वर्तन बदलवू शकतात. मोठे लोक नाईलाज म्हणून काही गोष्टी सहन करतात; परंतु मुलं तसं करत नाहीत. तेव्हा नेमकं कारण जाणून घ्यावं लागेल.

चुकतंय कोण? चुकतंय काय?

मुलं काहीतरी वेगळंच वागत आहेत, असं वाटलं की आपण पालक लगेच काळजीत पडतो. काहींना तर खूप ताण यायला लागतो. हे अगदी स्वाभाविक आहे; परंतु मुलांच्या वर्तनामागील कारण लक्षात घेतल्यावर आपल्याला उलगडा होऊ लागतो. नेमकं चुकतंय काय, हे लक्षात आल्यावर पालक म्हणून आपण आपली चूक कबूल केली पाहिजे आणि मुलं चुकत असतील, तर त्यांच्याशी बोलावं लागेल, समजून घ्यावं लागेल आणि मुलं पुन्हा तसं वागणार नाहीत, यासाठी त्यांना सातत्यानं समजून घेत पुढं जावं लागेल. एखादी छोटी चूक मोठा गुन्हा समजू नका. छोट्या छोट्या चुका करतच मुलं शिकत असतात; पण त्या चुका सवय बनू नये याची खबरदारी मात्र पालक म्हणून आपण घ्यायला हवी.

जबाबदारी आणि भान

मुलांच्या चुका आपण सतत उगाळत बसलो, तर मुलं जाणून-बुजून त्याच चुका पुनःपुन्हा करू लागतात. हे प्रचंड मनस्ताप देणारं असतं. तेव्हा मुलांच्या चुका सतत उगाळत बसण्यापेक्षा त्यांना जबाबदारी द्या. त्यांच्यावर विश्वास टाका. त्यांना जबाबदारीतून हळूहळू भान येत जाईल. घाई कधीच करू नका. घाईनं काम बिघडतं. वेळ द्या. मुलांना आणि स्वत:लाही. जबाबदारी आणि भान यांचा ताळमेळ बसायला वेळ लागेल.

शहाणपण हळूहळू येतं

मुलांच्या वागण्यात बदल होण्यास कधी वेळ लागतो, तर कधी त्यात पटकन बदल दिसून येतात. लक्षात असू द्या, आपण किंवा एखाद्यानं एखादी गोष्ट सांगितली आणि मुलांचं वागणं एकदम बदललं असं सहसा होत नाही. कारण शहाणपण हळूहळू येतं. मुलं हळूहळू काही गोष्टी समजून घेत असतात. चांगलं काय, वाईट काय हे पडताळून पाहत असतात. आपणही असंच तर वागत असतो. मुलांच्या बाबतीत हाच नियम लावून पाहू या.

त्रागा आणि बरंच काही

मुलांच्या कोणत्याही वागण्यावर आपली पहिली प्रतिक्रिया असते ती त्रागा करण्याची, रागावण्याची. थोडं थांबून यावर विचार जरूर करू.

त्रागा, राग वगैरे उत्तरं नाहीत. उपाय तर अजिबात नाही. तेव्हा वरील सर्व मुद्द्यांचा विचार जरूर करा. वेळ द्यावा लागतो आणि शहाणपण हळूहळू येतं.

हे पक्कं लक्षात ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com