Parents
ParentsSakal

‘पालन’गोष्टी : मग तुला बक्षीस...

‘या वर्षी पहिला नंबर काढशील तर सायकल मिळेल.’ बाबांनी असं सांगताच अक्षयने तोंड कसंनुसं केलं. त्याच्या मनात आलं ‘आणि नाहीच आला पहिला नंबर तर?’

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

‘या वर्षी पहिला नंबर काढशील तर सायकल मिळेल.’ बाबांनी असं सांगताच अक्षयने तोंड कसंनुसं केलं. त्याच्या मनात आलं ‘आणि नाहीच आला पहिला नंबर तर?’

शाळा दूर आहे. जाणार कसं?

आपल्या आयुष्यात असा एखादा प्रसंग निश्चितच डोकावून गेला असेल. आणि आपणही आपल्या मुलांना असंच काहीतरी सांगत असू. तेव्हा अशा बक्षिसांनी नेमकं काय साधलं जातं? याउलट बक्षीस द्यायचंच असेल तर आत्मविश्वास वाढवणारं द्यायला हवं. डॉ. ख्रिस्तोफर ग्रीन आपल्या पुस्तकात दोन प्रकारच्या बक्षिसांचा उल्लेख करतात. दृश्य बक्षिसं आणि अदृश्य बक्षिसं.

१) दृश्य बक्षीस : ‘पहिला नंबर मिळव, अमुक एक वस्तू मिळेल,’ ‘आज हे काम कर, आवडता खाऊ मिळेल,’ ‘एवढा अभ्यास पूर्ण कर, मग मोबाईल मिळेल.’ हे झालं दृश्य बक्षिसांचं स्वरूप. अशी बक्षिसं आपल्याकडे नेहमीच दिली जातात. आणि वस्तुरूप बक्षीस म्हणजेच बक्षीस अशी एक घट्ट धारणा आपल्याकडे पाहायला मिळते.

२) अदृश्य बक्षीस : दृश्य बक्षिसाच्या विपरीत हा प्रकार आहे. आज आपण यावर सविस्तर बोलणार आहोत. हे बक्षीस मुलांच्या भावनांना हात घालतं. त्यांना आतून प्रेरित करतं. ‘तू खूप चांगलं काम केलं आणि पुढेही करत राहा,’ ही भावना मुलांपर्यंत पोचते. या बक्षिसांशी संबंधित काही मुद्द्यांचा आपण विचार करू. हे मुद्दे परिपूर्ण नाहीत. यात तुम्ही अनुभवाने काही नवीन मुद्दे जोडू शकता.

१) कौतुकानं पाहणं : मूल जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण करतं आणि त्यात यशस्वी होतं, तेव्हा काही वस्तू तुमच्या भवना त्यांच्यापर्यंत पोचवू शकत नाहीत. अशावेळी तुम्ही मुलांकडे नुसतं कौतुकानं पाहिलं तरी मुलांना जग जिंकल्याचं फिलिंग येतं. ही भावना खूप महत्त्वाची असते. न जाणो तुमची कौतुकाची एक नजर त्या मुलांचं अख्खं जीवन बदलवून टाकेल.

२) प्रेमानं बोलणं : काहीना वाटेल हे कसलं बक्षीस? पण, कुणी व्यक्ती प्रेमाने बोलते अशावेळी आपल्या आसपास ज्या सकारात्मक लहरी तयार होतात त्या आपणाला एक वेगळाच आनंद देऊन जातात. तेव्हा प्रेमाने बोलणं हे खूप मोठं आणि महत्त्वाचं बक्षीस आहे.

३) शाबासकी देणं : कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता हे एक उत्तम उदाहरण आहे एखद्याला आयुष्यात उभारी कशी देता येईल याचं. ‘मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा’ या ओळी वाचताना आतून एक स्फुरण चढतं. मग विचार करा अशा शाबासकीने मनाला किती उभारी मिळत असेल. अशी पाठीवर हात ठेऊन शाबासकी दोन भिन्न वेळी देता येते, एक यश मिळवल्यावर आणि दुसरं पराजयाने खचून न जाता पुन्हा उभारी घेण्यासाठी. तेव्हा शाबासकी देण्यात कंजुषी करू नका.

४) कुरवाळणं : आपलं मूल जेव्हा एखादी गोष्ट करतं, त्यात यशस्वी होतं (पहिला येणं म्हणजे यश नव्हे... केलेला प्रयत्न यशस्वी होणं हेही यशच!) तेव्हा त्यांना प्रेमाने जवळ घ्या. डोक्यावरून हात फिरवा आणि तू करून दाखवलं ही भावना त्यांच्या मनापर्यंत पोचवा. माझी अम्मी आमच्या दोन्ही मुलांना असं जवळ घेते आणि डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवते. तेव्हा दोन्ही मुलं मला जगातील सर्वांत नशीबवान मुलं वाटतात. मुलं वस्तूंची नव्हे तुमच्या कौतुकभरल्या स्पर्शाची भुकेली असतात.

५) दखल घ्या : दखल घेणं म्हणजे काय? बरेचदा मुलं कशात तरी भाग घेतात पण पहिला किंवा वरचा नंबर मिळत नाही. मग आपण वरवर बोलून त्यांची बोळवण करतो. पण अशावेळी मुलांना आपली दखल घेतलं जाणं जास्त गरजेचं वाटतं. इतर मुलांच्या यशावर बोलताना आपण आपल्या मुलांच्या यशाकडे दुर्लक्ष करत तर नाही ना? हे पण समजून घेतलं पाहिजे. दखल घ्या. दखल घेणं मुलांसाठी मोठी गोष्ट असते. तेव्हा दखल घ्या आणि मुलांच्या आत्मविश्वासाला नवीन पंख द्या.

वस्तुरूप बक्षीसं वाईट किंवा चूक असं अजिबात मत नाही. त्यांचंही एक वेगळं महत्त्व आहेच; पण दृश्य बक्षिसांच्या गर्दीत उभारी देणारी अदृश्य बक्षीसं हरवून जाऊ नयेत म्हणून हा लेखनप्रपंच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com