‘पालन’गोष्टी : अहंकाराचा अवघड घाट

‘आपण आणखी विचार करू आणि मग निर्णय घेऊ या का? आकाशची जाणारी वर्षं भरून निघणार नाहीत.’ आई बाबांना समजावून सांगत होती.
Parents
Parentssakal
Summary

‘आपण आणखी विचार करू आणि मग निर्णय घेऊ या का? आकाशची जाणारी वर्षं भरून निघणार नाहीत.’ आई बाबांना समजावून सांगत होती.

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

प्रसंग १

‘आपण आणखी विचार करू आणि मग निर्णय घेऊ या का? आकाशची जाणारी वर्षं भरून निघणार नाहीत.’ आई बाबांना समजावून सांगत होती.

‘आता जे ठरलं ते ठरलं. आता निर्णय नाही बदलायचा.’ बाबा आपल्या मतावर ठाम होते.

आई एकदा बघून उठून गेली. आकाशचे बाबा कुणाचंच ऐकायला तयार नव्हते.

प्रसंग २

‘बाबा, मला वाटतं आपण असं करून बघू या का?’ ज्ञानेश बाबांना काही सांगायचा प्रयत्न करत होता.

‘तू लय शहाणा झाला काय? आता तू मला सांगणार का, की मी काय करायला हवं?’ बाबा चिडक्या आवाजात बोलले.

ज्ञानेश गप्प बसला.

लहान मुलं (आणि अगदी मोठी मुलंसुद्धा) ही बहुतांश मोठ्या व्यक्तींवर अवलंबून असतात. दैनंदिन गरजा तर आहेतच; परंतु जीवनातील महत्त्वाच्या निर्णयांबाबतसुद्धा. अशावेळी जेव्हा वयाने लहान व्यक्ती वयाने मोठ्या व्यक्तीला काही सांगायला जाते, तेव्हा मोठ्या व्यक्तींचा अहंकार दुखावला जातो आणि ते आपले निर्णय थोपवण्याकडे झुकताना दिसतात.

आपण नेहमी अनुभवत असतो, की घरातील वयाने मोठ्या व्यक्ती या कोणताही निर्णय घेताना लहानांना फारसं विश्वासात घेत नाहीत, त्यांचं मत जाणून घेत नाहीत. याला कारणीभूत असतो तो अंहकार. प्रचंड अहंकार. आणि त्यापायी बरेच चुकीचे निर्णय घेतले जातात. इतरांना काय येतंय? मी करतोय तेच योग्य, ही धारणा आपणाला योग्य-अयोग्य याची ओळखच पटू देत नाही. चूक उमगते, तेव्हा उशीर झालेला असतो. मोठेपणाची झूल आपणाला झालेल्या चुकीची कबुलीही देऊ देत नाही.

पालकांनी या अहंकारापायी आपल्या मुलांच्या जीवनात अनेकदा ढवळाढवळ केलेली दिसते. निर्णय मोठ्यांच्या सल्ल्याने घ्यायला हवेत हे जरी आपण मान्य केलं, तरी ज्याच्याशी निगडित निर्णय आहेत त्यांच्याशी नको का बोलायला? की कुणीतरी ऑर्डर देणार आणि कुणी तरी ती फॉलो करणार इतकाच त्याचा अर्थ घ्यायचा? नाती ऑर्डर आणि फॉलोवर चालत नाहीत. संवादातून उत्तरं मिळत जातात. आपण तितका वेळ दिला पाहिजे. आणि स्वत:ही वेळ घेतला पाहिजे. आपण मोठे म्हणजे सर्वज्ञ नसतो. तेव्हा अहंकाराचा अवघड घाट पार करताना वळणं, कोपरे आणि निसरड्या वाटा जाणीवपूर्वक बघितल्या पाहिजेत. आपलंच खरं करण्याचा अट्टाहास निरुपयोगी ठरू शकतो. आणि चूक उमगेपर्यंत बरंच काही हातून निसटून गेलेलं असतं.

हा प्रवास सुंदर आहे. जग काय म्हणेल याची चिंता करत बसून कसं चालेल? आपली मुलं आपल्यासाठी सर्वांत अधिक महत्त्वाची असतात आणि त्यांच्यासोबतच आपणाला हा अहंकाराचा घाट टाळून पुढं जायचं आहे. अशावेळी वाद होतील. रुसवेफुगवेही होतील; परंतु कुटुंब आणि कुटुंबातील व्यक्तींचा आनंद हा सर्वोतोपरी असतो. घरातील थोरामोठ्यांचा सल्ला, तरुणांचे दृष्टिकोन आणि या सर्वांतून एक उचित मार्ग शोधण्याची कसरत करणे म्हणजेच पालकत्वाची समंजस वाटचाल आहे. या वाटेत अनकेदा अहंकाराचा अवघड घाट लागणार आहे. तेव्हा हे सर्व कुटुंबीयच तुमच्या सोबती असणार आहेत. तेव्हा अहंकार टाळून, जपत आणि काळजी घेत घेत पुढे जायला हवं. तेही सर्वांसोबत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com