Parenting
ParentingSakal

‘पालन’गोष्टी : टाळू शेरेबाजी

‘तुमच्या मुलाचा आवाज मुलींसारखाच आहे...’ शेजारच्या काकूंचा हा टोमणा आईच्या जिव्हारी लागला. विहानला काय बोलावं तेच कळेना. टोमणा त्याच्या वर्मी लागला होता.
Summary

‘तुमच्या मुलाचा आवाज मुलींसारखाच आहे...’ शेजारच्या काकूंचा हा टोमणा आईच्या जिव्हारी लागला. विहानला काय बोलावं तेच कळेना. टोमणा त्याच्या वर्मी लागला होता.

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

प्रसंग १

‘तुमच्या मुलाचा आवाज मुलींसारखाच आहे...’ शेजारच्या काकूंचा हा टोमणा आईच्या जिव्हारी लागला. विहानला काय बोलावं तेच कळेना. टोमणा त्याच्या वर्मी लागला होता.

प्रसंग २

‘माझी गुणाची परी आहे,’ आईने छोट्या काजलच्या गालावरून हात फिरवला. इतक्यात काजलची आत्या बोचकरणारं हसली. ‘‘वहिनी, ही काळी पोर कोणत्या अँगलने परी हाये ओ?’’ हे ऐकून सगळेजण हसत सुटले.

आईचा चेहरा उतरला. काजल रडवेली झाली.

असे टोमणे, शेरेबाजी आपल्याला नवीन नाही. आपण हे नेहमीच ऐकत आलोय किंवा स्वत:ही जाणते-अजाणतेपणी असं बोलतही आलोय. एखाद्याला त्याच्या शारीरिक रचनेवरून, आवाज, चाल, दिसण्यावरून सतत हिणवणं, चिडवणं, अपमानित करणं आपल्या कुटुंबात, समाजात नेहमीच घडत आलं आहे. दोन मुलांमध्ये दिसण्यावरून तुलना करत एकाला जवळ केलं जाणं आणि दुसऱ्याला वाईट वागणूक देणं हे हे घडतानाही आपण पाहतो. यातून नेमकं आपण काय साधत असतो? आनंद? की असुरी आनंद?

एखाद्याला जेव्हा आपण त्याचं शरीर, दिसणं, आवाज किंवा इतर कोणत्याही कारणांनी डिवचत राहतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होत असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अशी मुलं न्यूनगंडाने ग्रस्त होतात. एकेकटी राहू लागतात. आपणाला काहीच किंमत नाही, आपण देखणे नाही, अशा नकारात्मक विचारांचे शिकार होतात. हसती खेळती लेकरं उदासून जातात. अशा कोवळ्या जीवांना दुखावताना आपली सो कॉल्ड सभ्य मनं शरमिंदी का होत नाहीत? आपण आपल्या देखणेपणाच्या बुरसटलेल्या व्याख्या बदलत का नाही?

अशा वेळी आपण समाजाला नाही बदलू शकलो, तरी आपल्या मुलांना लढायला तयार करायला हवं. हाही एक संघर्षच आहे. ‘‘जग काहीही म्हणू दे, तुझं आयुष्य आहे आणि तुला ते आनंदाने जगण्याचा पुरेपूर अधिकार आहे. आम्ही आहोत तुमच्यासोबत,’’ हा विश्वास मुलांना जग जिंकण्याचं बळ देईल. पालक म्हणून लक्षात असू द्या, आपल्या दोन मुलांत किंवा आपल्या व बाहेरच्या मुलांत दिसण्यावरून कधीही तुलना करू नका. आपल्या मुलांना सतत कुरूप म्हणून त्याची वाट आणखी बिकट नका करू. कारण त्यांच्यासाठी तुम्ही विसाव्याची जागा असता. जगाचं हिणवणं सहन करण्याचं बळ तुम्ही तर त्यांना देत असता. मग तुम्हीच जर त्यांना हीन लेखू लागलात, तर त्या लेकरांनी जावं कुणाकडे? विचार जरूर करा.

मला जेव्हा अनेकजण भेटतात, तेव्हा पहिल्यांदा ते माझ्या वाढलेल्या वजनावर बोलतात. त्यांना चिंता असते हे मान्य केलं, तरी बोलायला शंभर विषय असताना आपण त्याच त्या विषयावर का बोलतो याचं भान नसणं हा दुर्गुण आहे. तेव्हा शक्य तितक्या लवकर ही सवय बदला. तेव्हा मग आपली मुलंही उद्या जाऊन कुणाला हिणवणार नाहीत. तीही समोरचा माणूस जसा आहे तसाच त्याचा स्वीकार करतील. स्वीकार करणं ही खूप मोठी आणि कठीण गोष्ट आहे; पण जमेल नक्की. एक कोशिश तो बनती है!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com