लोकसंस्कृतीची दागिन्यांना झळाळी

वेगवेगळी नाणी, पक्षी, प्राण्यांचे आकार, भौगोलिक रचना, तुकडे तुकडे जोडून मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या आदिवासी पद्धतीची (ट्रायबल आर्ट) ज्वेलरी सध्या कमालीची लोकप्रिय झाली आहे.
tribal art jewellery
tribal art jewellerysakal

- पृथा वीर

वेगवेगळी नाणी, पक्षी, प्राण्यांचे आकार, भौगोलिक रचना, तुकडे तुकडे जोडून मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या आदिवासी पद्धतीची (ट्रायबल आर्ट) ज्वेलरी सध्या कमालीची लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे पूर्वापार चालत आलेला कलेचा हा वारसा आदिवासी समाज अजूनही जपून आहे.

फॅशन ट्रेंडने आदिवासी ज्वेलरीला उभारी देत हा अद्‍भुत वारसा समोर आणला. तर ऑनलाइन मार्केटने ही कला एका विशिष्ट उंचीवर नेली. यामुळे  आदिवासी दागिन्यांचे सौंदर्य, साध्या; पण विलक्षण डिझाईन्सकडे संपूर्ण जग आकर्षित झाले आहे.

प्राचीन काळापासूनच संपूर्ण जगभरातील आदिवासी समुदाय वेगवेगळ्या दागिन्यांचा वापर करतात. प्राण्यांची हाडे, दात, हस्तिदंत, दगड, टरफले, लाकूड आणि इतर नैसर्गिक साधने वापरून थक्क करणारी प्रतिभा या दागिन्यात दिसते. वेगवेगळे स्टोन, नाणी, टेराकोटा, कवड्या, हस्तिदंत, पिसे, कवच असे साहित्य वापरून नुसती ज्वेलरी तयार होत नाही, तर आदिवासी समाजाचे निसर्गाशी असणारे नाते दिसून येते.

स्टोन ज्वेलरी, बंजारा पद्धतीची ज्वेलरी, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, टेराकोटा कलेक्शन अशा कितीतरी ज्वेलरीमध्ये ही किमया दिसते. उपासनेची विविध चिन्हे व आकार यामुळे ट्रायबल ज्वेलरी खूप उठून दिसते. कानातले असो की चोकर, बांगड्या असोत की नोझ रिंग, ट्रायबल ज्वेलरी ट्रेंड सेट करते. भारतात तर प्रत्येक आदिवासी समाजाची आपापल्या पद्धतीची ज्वेलरी आहे.

खासी, गारो- खासी, जैंतिया आणि गारो प्रदेशात राहणारे आदिवासी समाज जाड लाल कोरल मणींचे हार घालतात. सिक्कीममधील भुतिया जमाती दागिन्यांच्या आकर्षक आणि सुंदर डिझाईन्स तयार करण्यासाठीही ओळखली जाते. बंजारा समाजातील दागिने अत्यंत सुबक आणि प्रसिद्ध आहेत. ते रंगीबेरंगी आणि जड दागिने वापरतात.

अरुणाचल प्रदेशातील आदिवासी आपले दागिने सजवण्यासाठी बिया, पिसे, बांबू, छडी यासारख्या नैसर्गिक संसाधने वापरतात. हिमाचली समाजात चांदीच्या हंसली, चांदीच्या चोकर वापरतात. इथल्या चांदीच्या बांगड्या प्रसिद्ध आहेत. मध्य प्रदेशातील बस्तर जिल्ह्यातील आदिवासी गवत आणि मोत्यापासून दागिने बनवतात.  चांदी, लाकूड, काच, मोराची पिसे, तांबे आणि रानफुले यांचा वापर केला जातो.

ट्रायबल ज्वेलरीमध्ये मोर, कासव, बैल, घोडे, हत्ती आणि सिंह, मासे, सिंह, वाघ यांसारखे प्राण्यांच्या आकाराचे डिझाइन बघायला मिळतात आणि ही डिझाइन खरच खूप सुंदर दिसतात. ट्रायबल ज्वेलरीमधली नाण्यांची ज्वेलरी तर अत्यंत आकर्षक आणि वेगळी आहे. कालौघात बदल होत गेले; पण या दागिन्यांची झलक ऑनलाइन बघायला मिळते.

हस्तकलेचा हा वारसा आधुनिकतेच्या दबावाला न जुमानता आजही आपल्या परंपरा आणि मूल्ये जपून आहे. भारतात पर्यटन, व्यापारानिमित्त आलेल्या परदेशी पर्यटकांनाही इथले दागिने पाहून आश्चर्य वाटायचे ते उगाच नाही. एका पारंपरिक; पण ग्लॅमरस जगाशी जोडणारी ट्रायबल ज्वेलरी अलंकारांचे भारतातील महत्त्व दर्शवते.   ट्रायबल ज्वेलरी भारताचा वारसा आहे आणि तो जपायला तर हवाच.

भारत आणि अलंकार

  • मोहेंजोदडो आणि सिंधू संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननात हाताने तयार केलेले सुंदर दागिनेही सापडल्याचे दिसते.

  • प्राचीन भारतातील राजघराणी स्वत:साठी खास दागिने बनवण्यासाठी स्वदेशी कारागिरांची नेमणूक करायची. हे मौल्यवान दागिने पिढ्यान्‌पिढ्या वारसा जपून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com