actress sonali khare and sanaya anand
actress sonali khare and sanaya anandsakal

निखळ, नितळ मैत्री

आई - मुलीच्या नात्याला अनेक पैलू असतात. जे विविध गोष्टींशी निगडित असतात. त्यांच्या या एका नात्यात अनेक नाती लपलेली असतात. जसं की मैत्रीचं नातंच घ्या.

- सोनाली खरे / सनाया आनंद

आई - मुलीच्या नात्याला अनेक पैलू असतात. जे विविध गोष्टींशी निगडित असतात. त्यांच्या या एका नात्यात अनेक नाती लपलेली असतात. जसं की मैत्रीचं नातंच घ्या. आपल्या आईइतकं जवळून कोणीच आपल्याला ओळखत नाही. त्यामुळे ती जेवढी आपली घट्ट मैत्रीण असते, तितकं दुसरं कोणीच असू शकत नाही. मराठी चित्रपट सृष्टीतीतील याचंच एक उदाहरण म्हणजे, अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची मुलगी सनाया आनंद.

याविषयी सोनाली म्हणाली, ‘आमच्या नात्यामध्ये मी नेहमी दोन भूमिका पार पाडत असते. मी तिची आई म्हणून तिच्याकडे बघते, तेव्हा मी शिस्त, नीटनीटकेपणा एकूणच सांगायचं झालं, तर तिला योग्य वळण लावणं; तसंच तिच्यावर योग्य संस्कार करणं या गोष्टींकडे माझ्या भर असतो.

मात्र, मी तिची मैत्रीण म्हणून तिच्यासोबत असते, तेव्हा नियमांची बंधनं शिथिल होतात आणि यामुळे आमच्या नात्यामध्ये फ्रीडम येतो. तिचे निर्णय घेण्याची क्षमता तिच्याकडे आहेच; परंतु एक पालक म्हणून तिच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे.

त्यावेळी मला असं वाटतं, की एक पालक म्हणून तिला समजावण्याऐवजी मी एक मैत्रीण म्हणून तिला याबद्दल सांगितलं, तर ते ती पटकन समजून घेईल. त्यामुळे मी ठरवते, की कधी तिच्यासोबत तिची आई म्हणून वावरायचं आणि कधी मैत्रीण म्हणून. खरंतर हे खूप कठीण असतं, पण गरजेचं आहे.’

सनाया म्हणाली, ‘माझी आईच माझी एकमेव बेस्ट फ्रेंड आहे. ज्याच्याशी आपण बिनधास्तपणे सगळ्या गोष्टी शेअर करतो, ज्याच्यावर आपला विश्वास असतो तो आपला बेस्ट फ्रेंड. तशी मला माझी आईच वाटते, जिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून तीच माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी तिच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करते. रोज रात्री आम्ही अर्धा एक तास गप्पा मारतो. एकमेकींच्या दिवसभरातल्या गोष्टी एकमेकींना सांगतो. आपली आई आपल्यासाठी नेहमीच असते. त्यामुळे आपण कधीपण तिच्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नाही पाहिजे.’

सोनाली सांगत होती, ‘‘सनायाकडे फक्त एक व्यक्ती म्हणून पाहिलं आणि मला विचारलं, की ‘ही व्यक्ती मैत्रीण म्हणून तुम्हाला आवडेल का?’ तर माझं उत्तर नक्कीच हो असेल. ती खरंच एक मैत्रीण म्हणून खूप चांगली आहे. तिचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. तिच्यासोबत असताना मला कायमच आनंदी वाटतं.

पॉझिटिव्ह वाईब्स येतात. ती स्वच्छंदी जीवन जगते. याबाबतीत मला तिचं अत्यंत कौतुक वाटतं. आपल्याला अशा माणसांमध्ये राहायला आवडतं ज्यांच्यासोबत असताना आपल्याला आनंद मिळतो. मी जेव्हा जेव्हा सनायाकडे बघते तेव्हा तेव्हा मला तो आनंद मिळतो. भलेही ती माझी मुलगी असली, तरी मला तिच्याकडून एक गोष्ट शिकायला नक्कीच आवडेल ती म्हणजे, सनाया कधीच कोणती गोष्ट धरून बसत नाही.

तिला जी गोष्ट पटत नाही, ज्या गोष्टींचा तिला त्रास होतो, त्या सगळ्या गोष्टी ती तिथंच सोडते. तिचा हा प्रॅक्टिकल स्वभाव मला अतिशय आवडतो. अर्थात कुठेतरी असंही वाटतं, की अतिप्रॅक्टिकल असल्याने कधीकधी माणसं आपल्यापासून दुरावली जातात. ते होता कामा नये. आता येत्या १९ एप्रिलला माझा आणि माझ्या मुलीचा ‘मायलेक’ हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार आहे.

यामध्ये पहिल्यांदा मी आणि माझ्या मुलीने एकत्र काम केलं आहे. तिचा हा पहिलाच सिनेमा आहे. तिच्यासोबत काम करताना मला खरंच एक आई म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणूनही तिचं खूप कौतुक वाटल. हा तिचा पहिला चित्रपट असूनसुद्धा तिनं ज्या प्रकारे काम यात काम केलंय ते कौतुकास्पद आहे. तिची सीन समजून घेण्याची क्षमता खूप छान आहे. तिच्यासोबत काम करताना खूप मज्जा आली.’’

सनाया म्हणाली, ‘मला पहिल्यांदा आईनं याविषयी सांगितलं, तेव्हा मला थोडं दडपण आलं होतं; पण जेव्हा ती म्हणाली, की या चित्रपटात मीसुद्धा आहे आणि मी तुझ्या आईचा रोल प्ले करत आहे, तेव्हा मी लगेचच होकार दिला. मला हे काम करताना कधीच असं वाटलं नाही, की मी काहीतरी वेगळं करते.

सीनचे डायलॉग पाठ करणं वगैरे गोष्टी करताना मला कोणतेच अधिक कष्ट घेण्याची गरज नाही पडली. उलट मला वाटलं, की मी आणि आई घरात जसं वावरतो तसंच वावरत होतो. या सगळ्यात मला खूप काही शिकायला मिळालं आणि मी स्वतःला नशीबवान समजते, की माझा पहिलाच चित्रपट मला माझ्या आईसोबत करता आला.

‘आई एक व्यक्ती म्हणून मुळात मला खूप आवडते. तिच्या स्वभावातील मला सगळ्यांत जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तिचा संयम आणि शांतता. परिस्थिती कितीही वाईट असली, तरी आई खूप संयमानं ती हाताळते. तिचा हा गुण मला नक्कीच माझ्यामध्ये आत्मसात करायला आवडेल.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com