
गिरिजा ओक-गोडबोले - अभिनेत्री
माझ्यासह प्रत्येकासाठी आई खूप महत्त्वाची आणि गरजेची असते. माझे बाबा अभिनय क्षेत्रात असल्यामुळे चित्रीकरण, नाटक आणि विविध कार्यक्रमांनिमित्त बऱ्याचदा बाहेर असायचे. त्यांचे दौरेही मोठ्या प्रमाणात असायचे. कोणत्या ना कोणत्या कामामध्ये ते व्यग्र असायचे. त्यामुळे आमच्या आसपास ते फारसे नसत. त्यामुळे आईनेच मला वाढवलं. त्यावेळी लहान मुलांवर जे काही संस्कार करायचे असतात, ते सर्व आईनंच केलं. सगळ्याच गोष्टी मला आईनं शिकवल्या. विविध कामांमुळे बाबा बाहेर राहत असल्यानं आई आणि मीच घरात नेहमी एकत्र राहत असे. एकमेकांचे वाढदिवस, सण आणि उत्सव; तसंच आई-बाबांची ॲनिव्हर्सरीपण आम्ही दोघीच एकत्र साजरे करत होतो. त्यामुळे माझ्या सर्व जडणघडणीत आईचा फार मोठा वाटा आहे.