
नात्यांतील वीण सैलावताना...
‘घरोंदे जो हम बनाते है, रिश्ते जो इनमें बसते है...’ ही टॅग लाइन असलेला राहुल चित्तेला दिग्दर्शित ‘गुलमोहर’ हा चित्रपट नात्यांच्या विणीतील गुंतागुंत, त्याची परीक्षा सुरू झाल्यावर लागणारा कस आणि नियती आणि निर्णयाच्या हिंदोळ्यावर झुलणारं एकाच कुटुंबातील प्रत्येकाचं भविष्य याची भावुक गोष्ट सांगतो.
एकत्र कुटुंब विभक्त होऊ पाहताना होणाऱ्या घर्षणाचा हेलावून टाकणारा पटही उभा करतो. शर्मिला टागोर, मनोज वाजपेयी, अमोल पालेकर अशा कसलेल्या कलाकारांचा देखणा अभिनय, संगीत, संवाद, छायाचित्रण या सर्वच आघाड्यांवर चित्रपट दमदार कामगिरी करत अविस्मरणीय अनुभव देतो.
आयुष्यातील आठवणी गाळणीतून काढत हव्या त्याच जवळ ठेवायच्या आणि नकोशा बाजूला काढायच्या, असं कधीच करता येत नाही. ‘गुलमोहर व्हिला’मध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळ राहिलेल्या बत्रा कुटुंबाला याच सत्याचा सामना करावा लागणार आहे.
कुटुंबप्रमुख कुसुम (शर्मिला टागोर) दिल्लीतील हा बंगला विकून पदुचेरीला स्थायिक व्हायचा निर्णय घेते. तिचा मुलगा अरुण (मनोज वाजपेयी) नव्या जागेत राहायला जाणार आहे, तर त्याचा मुलगा आदित्य (सूरज शर्मा) भाड्याच्या जागेत राहायला जाण्याचा निर्णय घेतो. अरुणच्या मुलींच्याही करिअरच्या, प्रेमाच्या समस्या आहेतच.
कुसुम होळी चार दिवसांवरच आली असल्यानं सर्व कुटुंबानं हे शेवटचे चार दिवस एकत्र घालवावेत असा प्रस्ताव ठेवते. वेगळे राहणारे कुसुमचे दीर सुधाकर (अमोल पालेकर) जुने हिशेब पूर्ण करण्याच्या तयारीनं येतात.
अरुणची पत्नी इंदू (सिमरन) तुटू पाहणारं घर सावरू पाहते, मात्र अरुणच्या वडिलांच्या मृत्युपत्र हाती पडताच काही धक्कादायक खुलासे होतात आणि कथा अधिकच टोकदार, हळवी होत जाते आणि एका चांगला, विचार करायला लावणारा संदेश देत संपते.
चित्रपटाच्या कथेमध्ये नात्याचे अनेक पदर आहेत. त्यातील कुसुम आणि अरुण यांच्या नात्यातील रंग अधिक गहरे आहेत. मुलाचं भलंच पाहणारी, मात्र ते करताना अनवधानानं त्याला दुखावलेली आई व तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणारा मुलगा हे नातं आणि त्यातील संघर्ष चित्रपटाचा आत्मा आहे.
अरुण व आदित्य यांच्यातील दरी, प्रत्येक कृतीतून कुसुमला अडचणीत आणू पाहणारे सुधाकर आणि त्यांच्या मुलातील संघर्ष, रखवालदार आणि मोलकरणीतील संबंधांचा आणखी एक पदर असा मोठा कॅनव्हास दिग्दर्शक उभा करतो. हे करताना उपकथनांची संख्या व चित्रपटाची लांबी वाढली आहे, ती कमी करता आली असती. मात्र, चित्रपटाच्या शेवटाचे प्रसंग कथेची उंची वाढविण्यात यशस्वी ठरतात.
शर्मिला टागोर यांचं अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावरचं दर्शन सुखावून जाणारं आहे. विशिष्ट आवाजातली त्यांची संवादफेक, देहबोली, लालित्य, प्रेम आणि वात्सल्य व्यक्त करण्याची पद्धत सर्वच डोळ्यात साठवून ठेवावं असंच.
मनोज वाजपेयीनं आईसाठी अत्यंत प्रेमळ मुलगा आणि मुलाशी कठोर बाप अभिनयातील समतोल छान साधला आहे. संकटं असह्य झाल्यानंतरची त्याची देहबोली जबरदस्तच. अमोल पालेकर नकारात्मक भूमिका आणि त्यातील टोकदार संवादांच्या जोरावर छाप पाडतात. इंदूच्या भूमिकेत सिमरन छानच. इतर सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. एकपदरीच, नात्यांची घट्ट वीण सैलावत जाते, तेव्हा ती पुन्हा सांधण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा पट तुम्हाला गुंतवून ठेवेल, लक्षात राहील. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.