
Mumbai News : पाणीपुरीवरुन चायनीज विक्रेत्याची तरुणांना जबर मारहाण
डोंबिवली – कल्याण पूर्वेत पाणी पुरी खाण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांनी पाणी पुरी वाल्याला पाणी पुरी कमी दिल्याबाबत विचारणा केली. याचा राग पाठीमागे गाडी लावणाऱ्या चायनीज विक्रेत्याला आला आणि त्याने साथीदारांसह दोघा तरुणांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात विकास गायकवाड याच्यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पूर्वेत राहणारा निखिल शहारे (वय 30) व त्याचा मित्र योगेश चौधरी हे मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास शंभर फुटी रोड पलीकडील मोकळ्या मैदानात मुस्कान पाणीपुरी सेंटरवर पाणीपुरी खाण्यासाठी गेले होते.
पाणी पुरी वाल्याला दोघांना पाणीपुरी कमी दिली त्याबाबत विचारणा केली. याचा राग पाणीपुरी वाल्याच्या पाठीमागे असलेल्या चायनीज विक्री सेंटर मधील आरोपी विकास गायकवाड याला आला.
त्याने निखिल व योगेश या दोघांना शिवीगाळ करत ठोश्याबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आपल्या चार ते पाच साथीदारांना विकासने तेथे बोलावून घेतले. विकास याच्यासह त्याच्या साथीदारांनी निखिल व योगेश यांना मारहाण करत निखिल याच्या डोक्यात लाक़डी दांडके घालत त्याला जखमी केले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरिक्षक एस.डी.चौरे हे याचा पुढील तपास करत आहेत.