esakal | नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश; कोविडनंतर आलेला अशक्तपणा होईल दूर
sakal

बोलून बातमी शोधा

Food

Coronavirus : नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा जोर आता हळूहळू कमी होत आहे. मात्र, या विषाणूवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर असंख्य जणांमध्ये पोस्ट कोविडची लक्षण दिसून येत आहेत. तर, काही जणांना प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा आल्याचं जाणवत आहे. त्यामुळेच हा अशक्तपणा, थकवा दूर करायचा असेल तर आपल्या आहारात जास्तीत जास्त सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यामुळेच कोविडवर मात केल्यानंतर आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे जाणून घेऊयात. (healthy-food-in-breakfast-for-people-who-recovered-from-covid19)

१.उपमा -

प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्याला हमखास होणारा पदार्थ म्हणजे उपमा. पचायला हलका आण पौष्टिक असलेला हा पदार्थ जाड रव्यापासून केला जातो. रव्यामुळे छातीतील कफ पातळ होतो. त्यामुळे कोविडनंतर जरी तुम्हाला कफाची समस्या असेल तर उपम्यामुळे ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल. उपमा करणं अत्यंत सोपं असून तो वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. त्यामुळे उपम्यातील तोच तो पणा टाळायचा असेल तर रुग्णाला कधी सांजा ( पिवळ्या रंगाचा पातळ उपमा), मटार उपमा, कॉर्न किंवा गाजर घातलेला उपमा द्या.

हेही वाचा: देशावर आता ग्रीन फंगसचं सावट; 'ही' आहेत लक्षणे, कारणे

२. कडधान्य -

शरीराच्या योग्य वाढीसाठी आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा असा सल्ला डॉक्टर कायमच देत असतात. त्यामुळे फळे, भाज्या, कडधान्य खा हे त्यांचं आवर्जुन सांगणं असतं. भिजवून मोड आलेले कडधान्य शरीरासाठी कधीही चांगले. त्यामुळे आपल्या नाश्त्यामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करावा. कडधान्य नुसती खाल्ली जात नसतील तर त्याचं चाटदेखील करु शकता. कडधान्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्रोटीन मिळतं.

३. मेथी -

चवीला कडू असलेली मेथी अनेक शारीरिक आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल तर आहारात मेथीचा समावेश करावा. मेथीमध्ये कार्ब्स, प्रोटिन आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असतं.

४. बाजरीची भाकरी-

आता दरवेळी तुम्ही आलू पराठा, गोबी पराठा, पनीर पराठा असे पराठ्यांचे वेगवेगळे प्रकार खात असता. परंतु, कोविडवर मात केल्यानंतर या पदार्थांवर ताव मारण्यापेक्षा बाजरीच्या भाकरीवर ताव मारा. सोबत लोणी किंवा दहीदेखील खाऊ शकता. बाजरीमुळे शरीरातील ऊर्जा वाढीस लागण्यास मदत मिळते व भूकही वाढते.

५. सुकामेवा आणि दूध -

सकाळच्या नाश्त्यामध्ये सुकामेवा व दूधाचा जरुर समावेश करावा. दुधामुळे शरीरातील ताकद वाढते.तर, सुकामेवामुळे ऊर्जा निर्माण होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image
go to top