भावी पिढ्यांसाठी व्हावे ऐतिहासिक स्थळांचे जतन, इतिहासप्रेमीचे मत

ऐतिहासिक स्थळे, प्राचीन वास्तू, वस्त्र, खाद्यसंस्कृती, भाषा, नृत्य, गायन जपले गेले पाहिजे.
Historical Places:
Historical Places:Sakal

Historical places should be preserved for future generations

ऐतिहासिक स्थळे, प्राचीन वास्तू, वस्त्र, खाद्यसंस्कृती, भाषा, नृत्य, गायन जपले गेले पाहिजे. पूर्वजांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नुसता पोचवायचाच नाही, तर मूर्त व अमूर्त वास्तूंविषयी मनात आदर हवा आणि संवर्धनाची वृत्ती हवी, किंबहुना घटनादरुस्तीने ते आपले मूलभूत कर्तव्य बनविले गेलेले आहे. त्यामुळे किमान आपल्या आसपासच्या वारशांची माहिती व जतन झाले पाहिजे, असे विचार इतिहासप्रेमी व अभ्यासकांनी नोंदवले.

वारसास्थळे पर्यटकांचे आकर्षण असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतात. भावी पिढ्यांसाठी त्यांचे संरक्षण होणे गरजेचे असल्याने युनेस्कोने त्यांच्या सार्वत्रिक महत्त्व ओळखले. इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्युमेंट्स ॲण्ड साइट्स (आयसीओएमओएस) ने पुढाकार घेतला आणि युनेस्कोने प्रस्तावाला मंजुरी दिली. तेव्हापासून 1982 पासून दरवर्षी 18 एप्रिल जागतिक वारसा दिन म्हणून साजरा होतो.

यंदाचा जागतिक वारसा दिन ‘विविधतेचा शोध घ्या आणि अनुभवा’ या थीमनुसार साजरा झाला. यानिमित्ताने मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीचे सदस्य श्रीकांत उमरीकर यांनी सांगितले की, येरगी (ता. देगलूर, जि. नांदेड) येथील अप्रतिम असे सरस्वतीचे शिल्प गावकऱ्यांनी बायाबापड्यांनी सांभाळले.

राजापूर (ता. औंढा, जि. हिंगोली) येथील सरस्वती, योग नरसिंह आणि अर्धनारी नटेश्वराच्या मूर्ती गावकऱ्यांनी सांभाळल्या. शहरातील ‘नहर-ए-अंबरी’ प्रगत अभियांत्रिकीलाही लाजवेल, अशी पाणीपुरवठा यंत्रणा आहे. आजपासून 400 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे तंत्रज्ञान पालिका आणि पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, अशी खंत इतिहासप्रेमी उमेश पटवर्धन यांनी व्यक्त केली.

प्रत्येक वास्तू, मंदिर, स्मारके यांचे जतन पुरातत्त्व विभाग करतोच असे नाही. येरगी सरस्वतीचे शिल्प गावकऱ्यांनी सांभाळले. आपल्याकडे पैठणी वस्त्र प्रसिद्ध आहे. शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन आहे. मूर्त व अमूर्त दोन्ही वारसे जपले गेले पाहिजेत.

—श्रीकांत उमरीकर,मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समिती

  • महत्त्व नहर-ए-अंबरीचे

नहर-ए-अंबरीविषयी इतिहासप्रेमी व अभ्यासक उमेश पटवर्धन यांनी सविस्तर माहिती दिली. पूर्वी ‘खडकी’ या नावाने छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख होती. मलिक अंबरने या शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी चारशे वर्षांपूर्वी सायफन या शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब केला. अतिशय कल्पकतेने हर्सूल-सावंगीच्या टेकड्यांपासून रोजाबागपर्यंत भूमिगत कालवा अर्थात मुख्य 12 नहरींद्वारे पाणी आणले.

तेथून पुढे खापराच्या (भाजलेली माती) पाइपलाइनद्वारे शहराला पाणी वितरण केले. नहरींतील पाणी खळाळून वाहण्यासाठी जमिनीवर उंच मनोरे (मेन होल किंवा पानी का बंबा) उभारण्यात आले होते. मलिक अंबरने शहरासाठी 1612 ते 1620 दरम्यान नहरीचे काम केले. जमिनीच्या अंदाजे 20-25 फूट खालून विशिष्ट प्रकारचे बांधकाम करून गुरुत्वाकर्षणाने त्यांनी पाणी आणले. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जोबन टेकडी येथून नहरीचा उगम झाला.

या टेकडीपासून सावंगीपर्यंत नहर आणण्यात आली. त्यानंतर नहर गोमुखपर्यंत आली. मलिक अंबरने नहरीचे सर्वप्रथम काम केल्यामुळे नहर-ए-अंबरी या नावाने ही ‘नहर’ ओळखली जाते. गोमुखपासून नहर-ए-शहानूरमियाँ, छोटा तकिया नहर, बडा तकिया नहर, थत्ते हौद नहर, शहागंज नहर आणि पानचक्की नहर अशा विविध नहरी तयार झाल्या व शहरातील सर्व हवेल्या व वाड्यांमध्ये पोचविण्यात आल्या.

गोमुख येथे ऐतिहासिक हौद तयार करण्यात आला आहे. नहरीचे पाणी या हौदात जमा होते, तेथून जमिनीच्या खालून गुरुत्वाकर्षणाने पाणीवाटपाची व्यवस्था करण्यात आली. अत्यंत शुद्ध आणि थंड पाणी नहरीच्या माध्यमातून नागरिकांना मिळत होते, असे उमेश पटवर्धन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com