
कोजागरी पौर्णिमा वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.
- दिपाली सुसर
कोजागरी पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा. या दिवसाला ग्रामीण संस्कृतीत फार महत्त्व आहे. हिंदू धर्म आणि बौध्द धर्म दोन्हीचा प्राचीन इतिहास जर का आपण पाहिला तर त्यात कोजागरी पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलेले दिसून येते. कोजागरी पौर्णिमा वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. प्रामुख्याने याला मणिकेथारी म्हणजेच मोती तयार करणारी पौर्णिमा असं संबोधल जातं.
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो. चंद्र अगदी स्पष्ट दिसत असतो. त्याच्या लखलखीत प्रकाशाने डोळे दिपून जातात. तो आपल्या सोळा कलामध्ये असतो, असे देखील म्हणतात. कोजागरीच्या दिवशी गावाकडे छोट्या मुलींनी बसवलेल्या भुलाबाईचं जागरण असतं. भुलाबाई म्हणजे राधा-कृष्णाची मूर्ती असते. भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत त्या बसवल्या जातात. कोजागरी पौर्णिमेला भुलाबाईचा शेवटचा दिवस असतो म्हणून जागरण केले जाते. विवाहित बायका या दिवशी उपवास करतात. लक्ष्मीची आराधना करतात. थोडक्यात काय तर उपासना, उपवास आणि जागरण या तिन्ही गोष्टी एकत्र करुन कोजागरी साजरी करतात.
कोजागरीच्या पुजेत कलश मांडून त्यासमोर शेतातील नवीन धान्यांची रास ठेवली जाते. त्यांची पूजा केली जाते. मग पुढे गावातील एक आजी कोजागरीची कहाणी सांगू लागते. कोजागरी म्हणजे लक्ष्मीचा प्रगटदिन असतो. ती समुद्रमंथनातून याच दिवशी प्रगटते, अशी मोठी पौराणिक कहाणी आजी उत्तम कथानक करुन सांगते. मग त्या नंतर भारुडं, भजणं, लोकगीतं म्हणून बाया आपलं सुखदुःख त्यातून व्यक्त करतात. लहान मुली पारंपरिक वेशभुषा करुन नृत्य करतात.
भुलाबाईच्या जागरणासाठी ज्वारीचा धांडयाच्या मखर केल्या जातो. तो रानफुलांनी सजवला जातो. मग लहान लहान मुली आपल्या घरात बसवलेल्या भुलाबाया त्या मखरात आणून ठेवतात.
भुलाबाईला 32 भातकुलीचा नैवेद्य तयार केला जातो. त्यात काही रानमेवा जसं की मक्याचं कणीस, भुईमूगाच्या शेंगा तर काही हलव्याच्या दुकानाचे भातके असतात. काही प्रसाद आई घरी तयार करुन देते. पुढे भातकुल ओळखण्याचा एक खेळ रंगतो. तोपर्यंत मोठ्या बायका दूध आटवण्याची तयारी करतात.
दूध कसे आटवले जाते ? गावातली प्रत्येक बाई आपल्याला जितकं शक्य होईल तितकं दूध घेऊन येते. मग ते दूध एकत्र केले जातं. मोकळ्या मैदानात किंवा चावडीवर विटांची चुल करुन त्यावर मोठया कढईत ते दूध आटवण्याकरता ठेवलं जातं. नंतर त्यात विलायची, खोबर, करवंदाची चारोळी टाकली जाते आणि दूध उतु जाणार नाही याची काळजी घेतली जाते. तोपर्यंत मध्यरात्र होते. पुर्ण चंद्राची किरणं त्यात पडू देतात. मग त्याचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवले जाते.
गावाकडे कोजागरी आनंदात साजरी केली जाते, कारण शेतातील काम या काळात थोडी हलकी झालेली असतात. नव-धान्य घरात येऊन पडलेलं असतं. त्यामुळे बळीराजा खुश असतो. जसं की आता विदर्भात सोयाबीन, तिळ, उडीद, मूग तर कोकणात भात, नाचणी, वरी हे धान्य म्हणजेच शेतकऱ्यांची खरी लक्ष्मी असते. त्याचेच पुजन या दिवशी केलं जातं. काही ठिकाणी यालाच 'नवं फेडून टाकणं' असं सुध्दा म्हणतात.
विशेष करुन आदिवासी पाडयावर झेंडुची फुलं, आंब्याची पानं, करडू, लहू, अशा वनस्पती एकत्रित करुन त्याचं तोरण दारावर बांधल जात. आदिवासी लोकांमध्ये कोजागिरीला पारंपरिक होजागिरी नृत्य करुन आनंद साजरा केला जातो आणि रात्री त्यांच्या देवदेवतांची पुजा केली जाते.
कोजागरी पौर्णिमा प्राचीन काळात लोकोत्सव म्हणून साजरी व्हायची. त्या दिवशी बळीराजाची देखील पुजा करायचे, असे काही दाखले इतिहासात आहेत. कोजागरीचं जागरण झालं की मग दुसऱ्या दिवशी गोडधोड करुन घरातील देवदेवतांना नैवेद्य दाखवला जातो. सोबत आटवलेल्या दुधाचा प्रसाद कुटुंबातील सगळयांना वाटून दिला जातो.
दुपारच्या प्रहरी मग लहान मुलींच्या भुलाबाईचं गावातील नदीपात्र विसर्जन केलं जातं. गावाकडे कोजागिरी झाली म्हणजे आता हिवाळा सुरु होणार असा समज असतो. मग शेतकरी मायबाप रब्बी हंगामाच्या पेरणीच्या पुर्वतयारीला लागतात. अशा रितीने गावात कोजागरी पौर्णिमा साजरी केली जायची. आता या सगळ्या गोष्टी फक्त आठवणीच्या यादीत जाऊन बसल्यासारखी स्थिती येऊन ठेपलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.