“क्रीम लावल्याने दोन महिन्यात त्वचा उजळली, पण त्यानंतर...” | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

“क्रीम लावल्याने दोन महिन्यात त्वचा उजळली, पण त्यानंतर...”

“क्रीम लावल्याने दोन महिन्यात त्वचा उजळली, पण त्यानंतर...”

- मिलिना पाटील

भारतातच नाही तर संपुर्ण जगात गोरा रंग म्हणजे श्रेष्ठ किंवा गोरे व्यक्तीच सुंदर असतात असा समज आहे. त्यासाठी पुर्वी पासून अनेक घरगुती किंवा रासायनिक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्वचा उजळते, असा दावा करणारे जे क्रीम उपलब्ध आहेत, ते खरंच त्वचेसाठी फायदेशीर आहेत का, असा प्रश्न सोमा बानिक या महिलेचा अनुभव वाचल्यानंतर निर्माण होतो. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या या महिलेने फेअरनेस क्रीममुळे होणारे नुकसान ब्लॉगच्या माध्यमातून मांडले आहेत.

हेही वाचा: मंगळसूत्र खरेदी करताय? ही पाहा नवी डिझाईन्स

सोमा बानिक या कोलकात्यात राहतात. सोमा बानिक यांनी ब्लॉगमध्ये गोऱ्या रंगाचं समाजात असलेले आकर्षण, क्रीमचे दुष्परिणाम यावर सविस्तर भाष्य केले आहे. सोमा या कोलकात्यात सरकारी नोकरी करतात. सीएनएन या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने नुकतीच त्यांची मुलाखत प्रसिद्ध केल्याने हा ब्लॉग चर्चेत आहे.

सोमा बानिक म्हणतात, “२००३ मधील गोष्ट असेल. मी सावळी होते. शेजारी राहणाऱ्या काकूंनी माझ्या आईला मुलीसाठी क्रीम घेण्याचा सल्ला दिला. तुमची मुलगी गोरी होईल, माझ्या मुलीलाही यामुळे फायदा झाल्याचे त्या काकूंनी माझ्या आईला सांगितले. काकूंच्या सल्ल्यानुसार माझ्या आईनेही क्रीम आणले आणि मी त्याचा वापर सुरू केला. काही दिवसांमध्येच मला फायदा झाला. शाळेतल्या वर्गमैत्रिणींनाही ही गोष्ट लक्षात आली. ‘चांगली’ दिसू लागल्याने मी आनंदात होते”

“दोन महिन्यानंतर मला त्रासही झाला. एकदा मी क्रीम न लावल्याने पिंपल्स आले. क्रीममुळे हा त्रास होतोय हे माझ्या लक्षात आले नाही. साधारणत: वर्षभरानंतर मला होणाऱ्या त्रासाची तीव्रता वाढली. उन्हात बाहेर गेल्यावर खाज येणे, पुरळ हे नेहमीचं झालं. चेहऱ्यावर केसाचं प्रमाणही वाढलं”, असे बानिक सांगतात. क्रीमचा वापर थांबवल्यावर हा त्रास वाढायचा.

हेही वाचा: कमरेचा आकार, ब्रा ते पायाची साइज! Matrimonial Ad मध्ये तरूणाच्या विचित्र अटी

२०१३ च्या सुमारास बानिक यांनी याबाबत ऑनलाईन रिसर्च करायला सुरूवात केली. त्वचेसाठी जे क्रीम आहे, त्यात कोणते घटक नसावे याबाबत त्यांनी सविस्तर अभ्यास केला. आता कोणतंही क्रीम घेताना त्यातील घटक काय आहे, हे मी आधी वाचते. केमिकलचा वापर मी थांबवलाच आहे, असंही बानिक यांनी म्हटले आहे.

बाजारात उपलब्ध असणारे क्रीम कोणते?

‘बेटनेसोमिथेन’ हा रसायनिक द्रव्य असलेले क्रीम सोमा यांनी वापरले होते. असे क्रीम वापरल्याने त्वचा गोरी होते मात्र काही महिन्यांनी चेहऱ्यावर फोडे व पुरळ होतात व महिन्यांनी खाज देखील येते. अशा घातक स्टिरॉईडमुळे त्वचा आधीपेक्षा अधिक सावळी होण्याची शक्यता असते. त्वचा रोग तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या समस्या या टॉपिकल स्टिरॉईड वापरल्याने उदभवतात.

भारतातील नियम आणि सीएनएनच्या पाहणीतील निष्कर्ष काय?

केंद्र सरकारने स्टिरॉईड आणि अँटिबायोटिक असलेल्या १४ क्रीमच्या सरसकट विक्रीवर निर्बंध आणले होते. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय या क्रीमची विक्री करता येणार नाही, असे आदेश होते. मात्र, आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे सीएनएनच्या पाहणीतून समोर आले. दिल्ली, कोलकाता, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांमध्ये सीएनएनने कॉस्मेटिक उत्पादन विकणाऱ्या दुकानांना भेट दिली. विशेष म्हणजे सहा पैकी पाच विक्रेत्यांना या नियमांची माहिती नव्हती. एका विक्रेत्याला नियमाबाबत माहिती होती. मात्र, तरीदेखील या उत्पादनांची सर्रास विक्री केली जात होती.

loading image
go to top