International Women's Day : स्त्रीचे स्वातंत्र्य फक्त नोकरी आणि कपड्यांपुरते नाही तर त्याचा आवाका खूप मोठा...

शिक्षण झालं.. नोकरी लागली.. नोकरीत तीन चार वर्ष झाली.. आता लग्नाचे वेध लागलेले.. घरचे सगळे म्हणू लागले की आता लग्न करायला हवं.. रीतसर स्थळं पाहणं सुरु झालं..
international womens day multitasking women scope for the other also
international womens day multitasking women scope for the other alsoSakal

Pune News : शिक्षण झालं.. नोकरी लागली.. नोकरीत तीन चार वर्ष झाली.. आता लग्नाचे वेध लागलेले.. घरचे सगळे म्हणू लागले की आता लग्न करायला हवं.. रीतसर स्थळं पाहणं सुरु झालं.. मी ठरवलेलं माझा जो कोणी असेल त्याला मी आधीच सांगणार की बाबा रे..लग्नानंतर तू हे घालायचं नाही ते घालायचं नाही असलं करायचं नाही..

मला कळतं कसे कपडे घालायचे... दुसरं म्हणजे मी कमावलेले पैसे मी कुठं खर्च करायचे कसे करायचे हे देखील मी माझं ठरवणार.. याचा अर्थ असा अजिबात नाही की मी खर्चासाठी पैसे देणार नाही.. जे काही करूया ते आपण दोघेच करूया.. पण ती टिपिपल नवरेगिरी मी खपवून घेणार नाही..

अर्थात असा मुलगा भेटला देखील आणि आमचं लग्न देखील ठरलं.. लग्न ठरल्यानंतर आम्ही जेव्हा फिरायला जायला लागलो तेव्हा देखील एका वेळचं बिल मी आणि एका वेळचं बिल त्याने.. मुव्हीची तिकीटं, हॉटेलचे बिल देखील निम्म्या निम्म्याने वाटून घेतली..

लग्न झाल्यावर देखील आमच्यात पैशावरून असं कधी काही झालं नाही.. चारचौघींप्रमाणे सगळीकडे मिरवत होते.. सणावाराला साड्या नेसणे, ऑफिसला ड्रेस, मधून अधून फिरायला जाणे असं छान सुरु होतं, दोघांचा पैसा पाणी देखील व्यवस्थित पुरत होता..

वयाच्या २९ व्या वर्षी लग्न झालं होतं अर्थातच तिशीत आल्यावर मुलाचा विचार करणं भाग होतं.. लगेच चार महिन्यांनी गरोदर राहायचा निर्णय घेतला.. ३० व्या वर्षी मुलगा झाला.. घरातले खुश होते कारण मुलगा झालेला ना.. आम्ही मात्र दोन्ही नावं ठरवलेली.. जे होईल ते होईल.. एकच बास असं देखील ठरलेलं..

मुलगा मोठा होत असताना घरातल्या मंडळींशी थोडे खटके उडत होते पण आमच्या तिघांचं मात्र छान चाललं होतं.. एकाच्या पगारावर भागू शकलं असतं पण हल्ली कोणाची नोकरी कधी जाईल याची शाश्वती नसल्याने दोघांनी काम सुरु ठेवलेले..

मुल पाळणाघरात आम्ही दोघे कामावर असा कार्यक्रम सुरु होता.. ते कोव्हिडचे दिवस होते.. पहिली लाट ओसरली होती.. सगळ्यांना वाटलं कोव्हीड गेला आता.. आम्हालाही तसंच वाटत होतं.. पण तो कोव्हीड काही कळायच्या आत माझ्या नवऱ्यालाच घेऊन गेला.. काय झालं? कसं झालं? कोव्हीडमुळेच झालं की आणखी कश्याने? काही कळायच्या आत सगळं सुन्न झालं होतं..

हातात दीड वर्षांचं मूल आणि मी.. १८० कोनात आयुष्य फिरलं होतं..! नको जगायला असंही वाटलं पण मुलबाळ असल्यावर तो पर्यायही नसतो. जसे १३ दिवस संपले तशी आजूबाजूची गर्दी कमी झाली.. आणि वास्तव काय असतं याची जाणीव व्हायला सुरुवात झाली..

मुलाला घेऊन सासू सासऱ्यांसोबत राहायला लागले.. काही दिवस गेले.. तुम्ही आता तुमचं तुमचं बघा असा संदेश हळूहळू मिळायला लागला... माझं काम सुरूच होतं पण बाळाला सांभाळणार नाही असा आडून आडून पवित्रा घेतला गेला.. अर्थात त्यांना दुसरं अपत्य होतं म्हणून त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित केलं.. मला माहेरी जाण्याशिवाय कुठला पर्यायच ठेवला नाही..

या काळात नातेवाईक, मित्रमैत्रिणी, आजूबाजूचे या सगळ्यांनी अगदी रोज चौकश्या केल्या.. त्यांना हवी ती माहिती मिळाली की त्यांचा त्यांचा काळजीचा सूर संपलेला असायचा.. प्रश्न देखील माझ्या भविष्याच्या चिंतेतून विचारलेले..

सासरी परत कधी जाणार? सासरची मंडळी येतात का भेटायला? पैसे देतात का? तू कुठे झोपते, बेडरूममध्ये की हॉल मध्ये? दोन वर्ष झाली... त्या दरम्यान बरंच काही ऐकून झालेलं..एव्हाना आपल्या समाजात स्त्री चं स्थान काय हे मला व्यवस्थित जाणवलं होतं..

तिचा प्रवास कायमच एका पुरुषाच्या हातातून दुसऱ्या पुरुषाच्या हातात करतो केला जातो .. बापाकडून - नवऱ्याकडे आणि मूल असेल तर मुलाने आईला सांभाळायचं ... प्रत्येक वेळी तिला एका पुरुषाच्या आधाराने राहायला भाग पाडलं जातं

नवऱ्याचा टर्म इन्शुरन्स नव्हता का? असा प्रश्न तो गेल्यावर अनेकांनी विचारला पण तो शब्दच मी पहिल्यांदा ऐकलेला.. LIC च्या टिपिकल दोन चार लाखांच्या इन्शुरन्स पलीकडे आमची पोच नव्हती...

अर्थात त्याला आपल्या जोडीदाराला नॉमिनी ठेवावं एवढी बुद्धी देखील आम्हा दोघांनाही सुचलेली नव्हती.. एवढंच काय तर बँकांमध्ये जी अकाउंट होती त्याला देखील आम्ही एकमेकांना नॉमिनी नव्हतं केलं... नवरा गेल्यावर मुलाला लस देण्यासाठी पैसे काढायला देखील सेव्हिंग अकाउंटला पैसे नव्हते.. सगळे खर्च त्याच्याकडून गेलेलं जायचे.

माझ्या गुगल पे चा पासवर्ड देखील मला ठाऊक नव्हता, तोच ऑपरेट करायचा. आमचा एकमेकांवर खूप विश्वास आणि पैशांचं नियोजन देखील उत्तम करत होतो पण दोघांपैकी एक जण नसेल तर काय असा विचार कधी केलाच नव्हता.. सेव्हिंग पासून इन्शुरन्सपर्यन्त सगळीकडे नॉमिनी अर्थातच आईवडील.

या प्रसंगांनी एवढं शिकवलं होतं की, स्त्री म्हणून आर्थिक स्वावलंबन म्हणजे केवळ आपण कमावणे आणि आपला खर्च आपण करणे, आपल्याला हवे ते कपडे घालायचे, हवे तिथे हवे तेव्हा जायचे एवढेच नाही, त्यापलीकडे 'स्त्री स्वातंत्र्य' याचा आवाका बराच मोठा आहे हे लक्षात आलं..

मला जेव्हा घर सोडण्याचा प्रसंग आला तेव्हा मला ज्या घरातून कोणीही बाहेर काढू शकणार नाही असं मालकी असलेलं घर माझ्याकडे नव्हतं. मी जर कमावती होते इतकी वर्ष.. तर का नाही मी स्वतःचं घर घेण्याचा विचार केला? का आम्ही इतकं मोठं लग्न केलं ज्या पैशात कदाचित आम्ही आमच्या फ्लॅटचं डाऊन पेमेंट करू शकलो असतो.

का आजवर मी माझे पैसे फक्त सेव्हिंग, एफडी आणि सोन्यात गुंतवत होते? का मला शेअर, म्युच्युअल फंड माहिती नव्हते? का आम्हाला टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ते माहीती नव्हतं? का मला घरची शेती किती आहे याची काहीच कल्पना नव्हती.. का मी कधी विचारायचं धाडस दाखवलं नाही? का आम्ही मुल जन्माला घालण्याआधी या गोष्टींचा विचार केला नव्हता..?

आपली जडण घडण होत असताना मुलींना लग्नाची स्वप्न दाखवली जातात तर मुलाला आर्थिक घडी बसविण्याची. आपण कुंडली पाहतो पण इन्शुरन्स, कायदेशीर कागदपत्र वेळेवर करून घेणे, वेळेवर गुंतवणूक करणे हे आपल्याला शिकवलंच जात नाही..

फक्त आकडेवारी सांगते.. कोव्हीड काळात १ लाख महिला महाराष्ट्रात विधवा झाल्यात.. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ही माहिती गोळा केली आहे. प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा आहे.. महाराष्ट्रातील घटस्फोटाचे प्रमाण देखील १८ ते १९ टक्के आहे.

या परिस्थितीत पुरुषापेक्षा स्त्रीला जास्त सोसावं लागतं कारण अजूनही स्त्रीसाठी सामाजिक स्थिती तिच्यासाठी पूरक नाही.. अर्थात पुरुषांची काही वेगळी दुःख असतीलही जी मी स्त्री असल्या कारणाने मला समजली नसतील..

मी स्वतंत्र आहे असे म्हणणाऱ्या महिलांनी किंवा माझी मुलगी, आई, बहीण आणि बायको स्वतंत्र आहे असे म्हणणाऱ्या पुरुषांनी हे स्वातंत्र्य या महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा पडताळून पाहायची गरज आहे.

बाकी, हे लिहिणारी व्यक्ती कोण असेल? हिने नाव का नाही लिहिलं हिचं? आपल्या आजूबाजूला कोणाचं असंच झालंय का? असल्या टुकार प्रश्नात आपली ऊर्जा वाया न घालविता यातून काय सांगायचा प्रयत्न केलाय यावर मात्र जरूर लक्ष द्या..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com