निखळ, नितळ नाते

फार कमीवेळा आपल्याला दिसते, की समान क्षेत्रात कार्यरत असूनही दोन व्यक्तींमध्ये स्पर्धा नसून घट्ट मैत्री असते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री प्रीतम कागणे आणि केतकी कदम.
ketaki kadam and pritam kagane
ketaki kadam and pritam kaganesakal

- केतकी कदम, प्रीतम कागणे

फार कमीवेळा आपल्याला दिसते, की समान क्षेत्रात कार्यरत असूनही दोन व्यक्तींमध्ये स्पर्धा नसून घट्ट मैत्री असते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री प्रीतम कागणे आणि केतकी कदम. त्यांची पहिली भेट पुण्यात एक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली.

याबद्दल बोलताना प्रीतम म्हणाली, ‘मी आणि केतकी नऊ वर्षांपूर्वी पुण्यामध्ये भेटलो. त्यावेळी आमच्या कामाची सुरुवात आम्ही एकत्रच केली. ‘बोकड’ या चित्रपटात आम्ही एकत्र काम केलं आहे. त्याच्या ऑडिशनदरम्यानच आमची ओळख झाली. त्यानंतर आम्ही पुण्यामध्ये बरेच मॉडेलिंग शोज् केले आणि त्यानंतर मुंबईला आलो. त्यावेळी आमच्यासोबत केतकीची आईदेखील असायची. काकूंनी आम्हाला खूप सपोर्ट केलं.

मुंबईत आल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचा प्रवास सुरू झाला. मला मराठी चित्रपटसृष्टीत संधी मिळत गेल्या, तर केतकीला विशेषतः हिंदी मालिकांमध्ये अनेक संधी मिळाल्या. तिची झी टीव्हीवरील ‘कुबुल है’ ही मालिका गाजली. एक अभिनेत्री म्हणून ती परफेक्ट आहे. ती डोळ्यांनी अभिनय करते, तिचा हा गुण मला प्रचंड आवडतो.’

केतकी म्हणाली, ‘प्रीतमची आणि माझी पहिली भेट झाली तेव्हा आम्ही दोघीही या क्षेत्रात नवीन होतो, शिकत होतो आणि यामुळेच आमची ओळख वाढत गेली. सोबतच आमची मैत्रीही वाढत गेली. प्रीतम प्रचंड हार्डवर्किंग आहे, ही गोष्ट मला तिला भेटल्यावर लगेचच कळून आली.

तिच्यातल्या या गुणामुळेच मी तिच्याशी कनेक्ट झाले. तिचं हेल्पिंग नेचरदेखील मला अतिशय आवडतं. जेव्हा गरज असते मदतीची, तेव्हा ती क्षणाचा विलंबदेखील न करता मदतीसाठी येते. आम्हा दोघींनाही फिरायला आवडतं. आम्ही सोबत अनेक ठिकाणं एक्सप्लोअर केली आहेत.’

केतकीच्या स्वभावाविषयी प्रीतम म्हणाली, ‘केतकी अतिशय चुलबुली आहे; पण कामाच्या बाबतीत मात्र ती शिस्तप्रिय आहे. तिच्या कामाला ती अतिशय गांभीर्यानं घेते आणि तिचा हा स्वभाव मला आवडतो. ती फिटनेसबाबत खूप जास्त जागरूक आहे. ती नेहमी एक्सरसाईज करते, जे माझ्याकडून बिलकुल होत नाही; पण तिचा हा गुण मला नक्कीच अंगीकारायला आवडेल.

तिची एक गोष्ट मला बिलकुल आवडत नाही, ती म्हणजे तिला कधी कॉल केला, तर ती कधीच लगेच कॉल रिसिव्ह करत नाही. कारण काही असो, ती कधी वेळेवर कॉल रिसिव्ह करत नाही. मी तिला दोन-तीन मेसेज केल्यानंतर तिला जाणवतं, की मला कॉल केला पाहिजे.

आमच्यातील समान दुवा म्हणजे आम्ही दोघीही आमच्या कामाला प्राधान्य देतो. भेटल्यावरही कामाविषयीच गप्पा मारतो. एकत्र कोणतं काम करता येईल यावर चर्चा करतो. बाकी मैत्रीच्या गप्पा होतातच; पण त्यासोबत कामसुद्धा आमची प्रायोरेटी असते.’

केतकी म्हणाली, ‘प्रीतम तिच्या कामाप्रती अतिशय प्रामाणिक आहे. तिचा ‘हलाल’ चित्रपट मला खूप आवडतो. त्यात तिनं केलेलं कामदेखील मला अतिशय आवडलं. आता तिचा नवीन ‘लॉकडाऊन लग्न’ हा चित्रपटही लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. ही रॉमकॉम जॉनरची फिल्म आहे आणि तिच्या या आगामी चित्रपटासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आपण मुंबईसारख्या शहरात आपल्या आई-वडिलांपासून लांब राहतो, तेव्हा मित्र-मैत्रिणी हेच आपली फॅमिली असतात.

माझ्या आयुष्यात तिचं स्थान खूप स्पेशल आहे. कारण ज्या ज्यावेळेस मी माझ्या आयुष्यात डाऊन झाले, तिथं ती नेहमीच माझी सपोर्ट सिस्टम बनून राहिली. तिनं प्रत्येकवेळी मला नवीन काहीतरी करायला उत्तेजन दिलं आहे, अजूनही देते आणि यालाच मैत्री म्हणतात, असं मी नक्कीच म्हणेन.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com