Alcohol Facts : दारू पिऊन इंग्लिश स्पीकिंग का सुरू होते ? या मागे सुद्धा आहे सायन्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alcohol Facts

Alcohol Facts : दारू पिऊन इंग्लिश स्पीकिंग का सुरू होते ? या मागे सुद्धा आहे सायन्स

Alcohol Facts : दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. अरे तो दारू पितो, बेवडा आहे पक्का, त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे, त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे.

त्याचं कारण म्हणजे आपल्या समाजात दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू पिली की माणूस बडबडत बसतो हे तर सगळ्यांना माहिती आहे.

कधीकधी तर इंग्रजी भाषाही येत नाही, तो माणूस दारूच्या नशेत इंग्रजी बोलू लागतो. हे का होतं? हा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच पडलेला असतो.

संशोधनातून असं समोर आलंय की, जर एखाद्या व्यक्तीला दारूची नशा चढली तर तो इतर काही विदेशी भाषाही बोलू लागतो. हा अभ्यास सायकोफार्माकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालाय.

सायन्स डेलीच्या रिपोर्टनुसार, किंग्ज कॉलेज लंडन, लिव्हरपूल युनिव्हर्सिटी आणि मास्ट्रिच युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एकत्रितपणे येऊन हा अभ्यास केलाय. संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, दारु प्यायल्यानंतर लोकांच दुसऱ्या भाषेच कौशल्य सुधारतं आणि ते त्या भाषेत अस्खलितपणे बोलू लागतात.

आणि जर्मन लोक डच बोलू लागले..

खरं तर, संशोधकांनी नेदरलँड्समधील डच विद्यापीठात शिकत असलेल्या काही लोकांवर याचा अभ्यास केला, यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची मातृभाषा जर्मन होती. त्या विद्यार्थ्यांना थोड्या थोड्या प्रमाणात दारू दिली जात होती.

हे सर्व विद्यार्थी जर्मन बोलत होते आणि त्यांनी अलीकडेच डच भाषा शिकण्यास सुरुवात केली होती. या अभ्यासात काही डच लोकांनाही दारु प्यायला लावून त्यांच्यासोबत बसवण्यात आलं. आणि मग दोन प्रकारची भाषा येणाऱ्या लोकांमध्ये संवाद सुरू झाला.

संशोधकांनी हे संभाषण रेकॉर्ड केले. त्यात त्यांना असं दिसून आलं की, जर्मन भाषिक जे अजूनही डच शिकत होते, डच लोकांशी अस्खलित डचमध्ये बोलू लागले.

नंतर, जेव्हा या लोकांना डच बोलण्याबद्दल स्वतःला रेटिंग द्यायला सांगितले तेव्हा प्रत्येकजण त्यांच्या स्वतःच्या भाषेच्या कौशल्याबद्दल आश्चर्यचकित झाला. ते चांगलं डच बोलत होते

दारूमुळे आत्मविश्वास वाढतो!

इंग्रजी किंवा इतर कोणतीही परदेशी भाषा बोलण्यासाठी बौद्धिक क्षमता आणि आत्मविश्वास असणं खूप आवश्यक असतं. अल्कोहोलबद्दल सामान्य माहिती अशी आहे की यामुळे मानवाची बौद्धिक क्षमता बिघडते आणि त्याचा वाईट परिणाम होतो.

पण या नव्या अभ्यासात उलटेच परिणाम समोर आले. नवीन अभ्यासात असं म्हटलंय की अल्कोहोलमुळे बौद्धिक क्षमता मजबूत होते आणि यामुळे आत्मविश्वास देखील कैक पटींनी वाढतो.

अस्वस्थता, चिंता आणि लाजाळूपणा निघून गेला!

या नवीन अभ्यासानुसार, अल्कोहोलमुळे चिंता देखील दूर होते. म्हणजे एखादी गोष्ट करण्याबद्दल आपल्यात जो लाजाळूपणा असतो तो निघून जातो. दारू पिऊन जेव्हा आपण इतर लोकांशी संभाषण करतो, तेव्हा त्या व्यक्तीची दुसऱ्या भाषेत बोलण्याची क्षमताही वाढते.