नातीगोती : कुटुंब हेच सर्वोच्च

कुटुंबव्यवस्था प्रेमावर अवलंबून असते. माझ्या मते, बाकीच्या गोष्टीचा नंतर विचार होतो. जेव्हा नात्यात प्रेम व आपुलकी असते, तेव्हा सगळ्या गोष्टी सुरळीत असतात.
Family
Familysakal

- लीना गोएंका

कुटुंबव्यवस्था प्रेमावर अवलंबून असते. माझ्या मते, बाकीच्या गोष्टीचा नंतर विचार होतो. जेव्हा नात्यात प्रेम व आपुलकी असते, तेव्हा सगळ्या गोष्टी सुरळीत असतात.

कुटुंबामध्ये माझी सर्वांत जवळची व्यक्ती म्हणजे माझा भाऊ. त्याचा धाडसीपणा व सगळ्या गोष्टींना संयमाने सांभाळून घ्यायची समज मला खूप आवडते. नुकतंच माझं एक ऑपरेशन झालं, अशा वेळी माझ्या भावानं माझी खूप काळजी घेतली. अगदी हवं नको ते सगळं बघितलं. मी खूप नाराज होते; पण माझ्या भावानं मला धीर दिला व समजावलं, तो क्षण माझासाठी खूप महत्त्वाचा होता.

आमच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणीही कुठलाही निर्णय घेतला, तर त्याच्यावर संवाद होतो; पण आम्ही सगळे पूर्णपणे त्या व्यक्तीच्या निर्णयाला साथ देतो. जेव्हा मी माझं करिअर सुरू केलं, तेव्हा मी खूप चिंताग्रस्त होते; पण माझ्या आई व भावानं मला पाठिंबा दिला. मला त्या दोघांचा खूप आधार वाटतो.

मी सध्या ‘अँड टीव्ही’वरील ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत डिम्पलची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणात व्यग्र असतानाही मला कुटुंबाला वेळ देण्यासाठी तशी फारशी कसरत करावी लागत नाही. कारण, आम्ही सर्वजण एकत्र राहतो. त्यामुळे गप्पागोष्टी दररोज होत असतात. आज दिवस कसा होता, दिवसभरात काय केलं, यावरही आमची चर्चा होत असते. केव्हा काही विशेष प्रसंग असेल, तर बाहेर एकत्र फिरायला जातो.

माणूस आजारी असतो, तेव्हा त्याला कुटुंबाची जास्त गरज असते आणि मी खूप नशीबवान आहे, की अशा सुंदर कुटुंबाची मी सदस्य आहे.

केव्हाही कुटुंबात भांडण झालं, तर लगेच टोकाचा निर्णय घेऊ नये. संवाद साधावा, समजून घ्यायची व माफ करण्याची क्षमता ठेवावी. शेवटी आपलं कुटुंबच आपल्यासाठी महत्त्वाचं असतं.

नाती दृढ होण्यासाठी…

१) आपल्या कुटुंबावर व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करत राहा.

२) एकमेकांनी केलेल्या चांगल्या कामाची वेळोवेळी स्तुती करा. त्यामुळे समोरच्या माणसाला बरं वाटतं.

३) एखाद्या व्यक्तीकडून काही चुकत असेल, तर ती गोष्ट त्याला शांततेत समजून सांगा. उगीचच गैरसमज होऊ देऊ नका.

४) जसं आपण आनंदात सहभागी होतो, त्याचप्रमाणे कठीण प्रसंगात एकमेकांची काळजी घ्यावी, साथ द्या.

५) एकमेकांचा आदर करा. कारण, आपल्या कुटुंबापेक्षा इतर कोणीही महत्त्वाचं नाही.

(शब्दांकन - अरूण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com