
संक्रांती दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण घातले जाते. तर हे बोरन्हाण म्हणजे काय आणि कशासाठी ते केलं जातं याची माहिती तुम्हाला आहे का?
पुणे - नव्या वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रात. महिलांसाठी हा सण महत्त्वाचा असतो. वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण महिला साजरा करतात. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून वाण देण्याचीही पद्धत असते. याशिवाय आणखी एक परंपराही असते. ती असते लहान मुलांसाठी. संक्रांती दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण घातले जाते. तर हे बोरन्हाण म्हणजे काय आणि कशासाठी ते केलं जातं याची माहिती तुम्हाला आहे का?
नवविवाहितेला जसं हलव्याचे दागिने घालण्यात येतात तसेच लहान मुलांनासुद्धा हलव्याचे दागिने घातले जातात. चिमुकल्यानं सजवण्यातही येतं. महिलांचा ज्यापद्धतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो तसा लहान मुलांसाठी बोरन्हाण असतं. संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत हे कधीही करता येतं.
हे वाचा - Makar Sankranti 2021 : तिळा-गुळाच्या गट्टीचं काय आहे आरोग्यदायी महत्त्व?
लहान मुलांच्या उत्तम आरोग्यसाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे. मुल जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रातीला लहान मुलांना हे बोरन्हाण घालण्यात येतं. शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना हे बोरन्हाण घालतात. बदलत्या ऋतुचा परिणाम लहान मुलांवर होऊ नये यासाठी या कालावधीत मिळणारी फळे (बोर, उसाचे तुकडे) भूईमुगाच्या शेंगा मुलांच्या डोक्यावर टाकल्या जातात.
मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. तसंच या कार्यक्रमासाठी लहान मुलांना आणि जवळच्या नातेवाईकांना बोलावलं जातं. जमिनीवर स्वच्छ कापड अंथरले जाते. त्यावर पाट ठेवून मुलाला बसवण्यात येतं. त्याच्यावर बोरं, उसाचे तुकडे, भुईमुंगाच्या शेंगा, चिरमुरे इत्यादी ओतले जातात. त्यानंतर फळे, उसाचे तुकडे, शेंगा, चिरमुरे लहान मुलांना दिली जातात.
हे वाचा - Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?
प्रत्येक पिढीनुसार या बोरन्हाणच्या कार्यक्रमात त्यांना हवा तसा बदल होताना दिसतो. आता त्याचाही इव्हेंट केला जातो. यामध्ये फळांच्याऐवजी चॉकलेट्स टाकली जातात. सजावट, दागिने इतर गोष्टी आणि भरगच्च कार्यक्रमही आयोजित करण्याचा ट्रेंड सध्या आहे.