नातीगोती : ‘एकमेकांवर विश्वास हवा’

एक भक्कम आणि निरोगी कुटुंब राखण्यासाठी प्रेम, आपुलकी आणि एकत्र सहजीवन आवश्यक आहे, असं मला वाटतं.
Relation
Relationesakal

- मानसी जोशी-रॉय

एक भक्कम आणि निरोगी कुटुंब राखण्यासाठी प्रेम, आपुलकी आणि एकत्र सहजीवन आवश्यक आहे, असं मला वाटतं. सुखी, आनंदी कौटुंबिक नाती राखण्यासाठी एकमेकांवर विश्वास ठेवणं, समजून घेणं आणि दुसऱ्याचा दृष्टिकोन लक्षात घेणं गरजेचं आहे. वैयक्तिकरीत्या मला माझ्या कुटुंबीयांशी खूपच जवळीक वाटते.

आम्ही एकमेकांचा खूपच आदर करतो आणि परस्परांची काळजीही घेतो. खरं सांगायचं तर मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सारखंच प्रेम करते; पण माझ्या मुलीचं स्थान माझ्या हृदयात खास आहे. माझ्या जीवनात ती आल्यापासून तिलाच मी कायम प्राधान्य दिलं आहे.

माझा पती रोहितपेक्षाही मला ती अधिक महत्त्वाची वाटते. माझ्या माहेरच्या कुटुंबीयांबाबत बोलायचं झाल्यास, मला माझे पालक खूप आवडतात. माझा भाऊ आणि वहिनी हे माझे सर्वांत मोठे आधार आहेत. थोडक्यात, माझ्या कुटुंबातील सर्वजण माझे आवडते आहेत.

मला वाटतं, आमच्या कुटुंबाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे, की आम्ही सर्वजण एकमेकांवर भरभरून प्रेम करतो. आम्ही प्रत्येकाच्या मदतीसाठी सदैव तयार असतो, मग ती रात्र असो की दिवस. आम्ही एकमेकांना ते जसे आहेत तसेच बिनशर्त स्वीकारलं आहे. कोणत्याही कुटुंबासाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे.

सध्या मी ‘झी टीव्ही’वरील ‘क्योंकी... सास माँ, बहु, बेटी होती है?’, या मालिकेत अभिनय करत आहे. चित्रीकरणामुळे मी खूप व्यग्र असते. मात्र, जेव्हा मला आणि कुटुंबीयांना वेळ मिळतो, त्यावेळी आम्ही वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांचा आस्वाद घेतो. एकमेकांच्या जीवनात आणि करिअरमध्ये काय सुरू आहे, त्यावर गप्पा मारतो, हसतो आणि एकमेकांच्या संगतीत राहतो.

पण जेव्हा केवळ कियारा, रोहित आणि मी असे तिघेच असतो, तेव्हा आम्ही बाहेर जेवायला जातो किंवा एखादा चित्रपट पाहतो किंवा फिरायला परगावी जातो. या ना त्या प्रकारे एकमेकांबरोबर राहणं हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मी माझा जोडीदार रोहितचे कुटुंबीय आणि माझे स्वत:चे कुटुंबीय यांची कृतज्ञ आहे. असे अनेक प्रसंग आहेत, जेव्हा आम्ही सर्वजण एकमेकांच्या मागे उभे राहिलो होतो. माझे कुटुंबीय हेच माझं घर आहे.

सशक्त नाती बनविण्यासाठी दुसऱ्यांच्या पडत्या काळात त्यांच्याबरोबर उभं राहणं महत्त्वाचं असतं. ते कुटुंबीयांबाबत आणि मित्रांबाबतही खरं आहे. तुम्हाला त्यांच्यामागे केवळ उभं राहायचं असतं. त्यामुळे आपल्यावर केव्हाही विश्वास ठेवता येईल, याची त्या व्यक्तीला खात्री पटते.

नाती दृढ होण्यासाठी...

  • आपल्या जवळच्या लोकांसाठी वेळ द्यावा. त्यामुळे आपल्याला त्यांची काळजी आहे, हे त्यांच्या लक्षात येईल.

  • चांगल्या-वाईट काळात त्यांना आधार देणंही महत्त्वाचं आहे.

  • आपल्या कुटुंबातील सदस्यांना ते जसे आहेत, तसं स्वीकारणं महत्त्वाचं आहे.

  • प्रत्येकाबरोबर शक्य तितका वेळ एकत्र राहणं आणि सर्व कुटुंबीयांना एकत्र आणणं गरजेचं आहे.

  • आपल्या कौटुंबिक सदस्यांना गृहित धरू नये आणि त्यांच्यावर मन भरून प्रेम करावं.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com