समृद्ध करणारा चित्रपटांचा आस्वाद

मला प्रत्येक भाषेतले चित्रपट पाहायला फार आवडतं. आता हे माझ्या व्यवसायाशी निगडित असल्यानं त्याला छंद म्हणावं की नाही मला माहीत नाही; पण त्यातून मला आनंद मिळतो, हे नक्की.
actress harshada khanvilkar
actress harshada khanvilkarsakal

- हर्षदा खानविलकर

मला प्रत्येक भाषेतले चित्रपट पाहायला फार आवडतं. आता हे माझ्या व्यवसायाशी निगडित असल्यानं त्याला छंद म्हणावं की नाही मला माहीत नाही; पण त्यातून मला आनंद मिळतो, हे नक्की. मी जवळपास रोज न चुकता चित्रपट पाहतेच. पूर्ण जमला नाही तर अर्धा पाहते; पण पाहतेच. हे खरंतर मी अगदी लहान असल्यापासून करत आले आहे. मला माझ्या वडिलांनी लहानपणापासूनच थिएटरला जाऊन चित्रपट पाहण्याची सवय लावली.

मला माझ्या वडिलांसोबत चित्रपट पाहायला फार आवडायचं. कारण ते चित्रपट सुरू असताना शिट्ट्या वगैरे वाजवायचे. पूर्ण चित्रपट कसा एन्जॉय करायचा हे मी त्यांच्याकडूनच शिकले. आता शूटिंगमधून कितीही थकून घरी गेले तरीही मी चित्रपट किंवा एखादी मालिका पाहते.

मी सगळ्या भाषेतले चित्रपट पाहते. माझ्या टॅबवर मी हे चित्रपट पाहत असते. हा टॅब मी माझ्यापासून लांब कधीही ठेवत नाही. त्यातल्या त्यात मला थ्रिलर चित्रपट पाहायला आवडतात. मला असं वाटतं, की कोणतीही कलाकृती पाहताना तिने एकतर आपली उत्सुकता अगदी शिगेला पोचवली पाहिजे किंवा घडाघडा रडवलं तरी पाहिजे किंवा खो खो हसवलं तरी पाहिजे.

कधी कधी काही चित्रपट असेही असतात, की ते फक्त आपले डोळे ओले करतात, मनाला स्पर्शून जातात. असे चित्रपटही मला भावतात. नुकताच मी पाहिलेला चित्रपट म्हणजे ‘ट्वेल्थ फेल’. ती एक अशी कलाकृती होती, की त्यात ढसाढसा रडू आलं नाही; पण त्यातील साधेपणाने मी प्रभावित झाले. चित्रपट पाहून एक महिना झाला; पण अजून त्याची छाप माझ्या मनावर कायम आहे.

मला सगळेच चित्रपट पाहायला आवडतात, चांगले काय किंवा वाईट काय. कारण कोणतीही मालिका, चित्रपट किंवा कोणतीही कलाकृती बनवताना आपण काहीतरी चांगलं करूयात, हाच विचार करून ती बनवलेली असते आणि ती कलाकृती एकाच वेळी दहा वेगळ्या लोकांपर्यंत दहा वेगळ्या पद्धतींनी पोचते. त्यामुळे चांगलं-वाईट असं काही नसतं.

मी बरेच चित्रपट दोन-चार वेळा पाहते. तेव्हा मला कळतं, की अरे मागच्या वेळी जी गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती, ती आता आली आहे. त्यामुळे एखाद्या कलाकृतीबद्दल पटकन मत बनवू नये. एखादा खूप कमाल चित्रपट असतो, तो आपल्याला खूप आवडतो. नकळत तो आपण दुसऱ्यालाही तो पाहायला सांगतो. त्यात मी रमते, त्यामुळे हा माझा छंदच आहे, असं म्हणता येईल. हॉरर चित्रपटही मी पाहते; पण सध्या नवीन काही हॉरर चित्रपट आलेले नाहीत. मात्र, ‘पुरानी हवेली’, ‘भूत’ वगैरे चित्रपट मी आवडीने पाहिलेले आहेत आणि ते पाहून घाबरलेही आहे.

चित्रपट पाहताना आपण जिथे बसलो आहोत, तिथून आपल्याला उठून जावं असं वाटता कामा नये, मला असं वाटतं. पाणी जरी प्यायचं असेल तरी आपल्याला असं वाटायला हवं की राहूदे, चित्रपट संपल्यावर पाणी पिते. असं चित्रपटानं आपल्याला धरून ठेवायला हवं. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘शोले’ हे काही माझ्या आवडीचे चित्रपट आहेत.

यांच्यामधले संवाद मला अक्षरशः तोंडपाठ आहेत. काही वर्षांपूर्वी ‘शोले’ पुन्हा एकदा थिएटरला आला होता, तेव्हा मी तो थिएटरमध्ये जाऊन पाहिला. तिथंही मी संवाद म्हणतच होते, आणि थिएटरमधले जवळपास सगळेच त्या चित्रपटाचे संवाद म्हणत होते. ही जादू आहे चित्रपटाची, यालाच म्हणतात चित्रपटाचं यश. हे कलाविश्व खूपच छान आहे आणि मला त्यात रमायला फार आवडतं.

खरंतर मला कोणता चित्रपट आवडतो, हे असं एका चौकटीत बसवणं अवघड आहे. कारण मला त्या त्या वेळी तो तो चित्रपट भावतो. मग तो मल्याळम असेल किंवा तेलुगू, तमीळ असेल. त्यामुळे असा एक कोणता प्रकार, भाषा मी सांगू शकणार नाही. हल्ली ओटीटीमुळे मी मालिकाही पाहू लागले आहे; पण चित्रपटांचं जग मला जास्त आवडतं आणि त्या जगात रमण्यासाठी मी आवर्जून वेळ काढते. या चित्रपटांमधून मी काही गोष्टी वेचत असते आणि त्या वेचलेल्या गोष्टी मी माझ्या वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्यातही वापरत असते.

(शब्दांकन - वैष्णवी कारंजकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com