कसदार जगण्याची ‘पेरणी’

मला नृत्य, अभिनय करायला आवडतो; पण तो माझा छंद नसून माझा व्यवसाय आहे आणि माझं पॅशन आहे. सुदैवाने माझे छंद हे माझा व्यवसाय आहेत आणि ते मी पॅशनेटली करत असते.
mrunmayee deshpande
mrunmayee deshpandesakal

मला नृत्य, अभिनय करायला आवडतो; पण तो माझा छंद नसून माझा व्यवसाय आहे आणि माझं पॅशन आहे. सुदैवाने माझे छंद हे माझा व्यवसाय आहेत आणि ते मी पॅशनेटली करत असते. छंद असं म्हटलं, की आपण त्याला खूप कमी वेळ देतो. त्यामुळे मी आयुष्यात ज्या गोष्टी करते, त्या माझं पॅशन आणि माझा व्यवसाय असं दोन्हीही आहे. काही वर्षांपासून मी शेती करत आहे.

शेती करणं म्हणजे माझा छंद नसून माझं पॅशन आहे आणि ती माझ्यासाठी फावल्या वेळात करणारी गोष्ट नसून, पूर्ण वेळ करण्याची गोष्ट झाली आहे. शेती हे माझ्यापेक्षा माझे पती स्वप्नीलचं खूप मोठं स्वप्न होतं. त्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशानेच मी या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मला आता त्यात खूप मजा येते. माझी जीवनशैली आता याच गोष्टींभोवती फिरते.

माझ्या घरात कधीच कोणी शेती केली नव्हती. माझ्या आजोबांकडे शेती होती; पण ती कधी कोणी कसली नव्हती. मात्र, माझं स्वप्नीलशी लग्न झालं, तेव्हा त्यानं मला शेतीबद्दल सांगितलं. स्वप्नीलला अनेक वर्षांपासून निसर्ग खुणावत होता. त्याला त्या संदर्भात काही तरी करायचं होतं. लग्नानंतर आम्ही या विषयी फार काही बोललो नाही; पण तरीही या क्षेत्राकडे वळण्याबाबत दोघांचंही एकमत झालं.

दोघांनाही शहरातली जीवनशैली, ताणतणाव याचा कंटाळा आला होता आणि आम्ही इकडे वळलो. स्वप्नीलनं या विषयाबद्दल सविस्तर माहिती घेतली, जिथून शक्य असेल तिथून गोष्टी शिकून घेतल्या. जगात काय सुरू आहे, हेही त्यानं समजून घेतलं. सध्याची जीवनशैली आणि त्याचे आरोग्यावर होणारे वाईट परिणाम समजल्यावर आम्ही स्वतःसाठी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

त्यानं इकॉलॉजीमध्ये शिक्षण घेतलं आहे, त्यामुळे त्याला या गोष्टींची बेसिक माहिती होती. मग आम्ही दोघांनी जमिनी शोधायला सुरुवात केली. आम्ही दोघंही मातीची घरं बांधणं शिकलो. मग आम्हाला महाबळेश्वरमध्ये हवी तशी जमीन मिळाली आणि मग आम्ही तिकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. आता मी फक्त कामापुरतं मुंबईत येते; पण आम्ही पूर्णवेळ तिकडेच राहतो. स्वप्नील मात्र पूर्णपणे सगळं सोडून याच क्षेत्रात काम करतो आहे.

मला जेव्हा त्यानं ही संकल्पना सांगितली, तेव्हा मी त्याला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. कारण हे क्षेत्र मला खुणावतं, मला त्यातली मजा माहीत आहे, मला त्याचं महत्त्वही पटलं आहे. खरंतर आत्ता मुंबई आणि महाबळेश्वर दोन्ही बाजू सांभाळणं म्हणजे थोडी तारेवरची कसरत होत आहे; पण ही मेहनत फळाला येईल, हा विश्वास मला नक्की वाटतो. आत्ता पाया भक्कम झाला की पुढच्या गोष्टी नक्कीच सोप्या होतील. हे जगणं खरं आहे. खोट्या गोष्टींची नाळ आपोआपच तुटते.

या जीवनशैलीला अंगिकारल्यामुळे आमची तब्येत सुधारली, अनावश्यक ताणतणाव कमी झाला, औषधं घेण्याचं प्रमाण अगदीच कमी झालं. शरीरात आणि मनातही खूप सकारात्मक बदल झाले. हे परिणाम कदाचित आत्ता लगेच दिसणार नाहीत; पण यामुळे जीवनाची गुणवत्ता नक्कीच सुधारेल.

आम्ही आता आमच्या शेतातलं खातो आहोत. आम्ही गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बाहेरून भाज्या विकत घेतलेल्या नाहीत. आम्ही रोजच्या सगळ्या भाज्या परसात उगवतो. स्ट्रॉबेरी, भाताची लागवड केलेली आहे. विविध प्रकारची फळं म्हणजे मलबेरी, गुजबेरी लावली आहेत. भविष्यात गहू लावण्याचंही नियोजन आहे.

ही लागवड कशी करायची, पर्माकल्चर ही संकल्पना काय आहे, याबद्दल आम्ही कार्यशाळाही घेतो. तिथे एक लर्निंग सेंटर उभं करायचं हे आमच्या दोघांचंही स्वप्न आहे. अशी जीवनशैली आत्मसात करण्याबाबत जनजागृती करण्याचं काम आम्ही यानिमित्ताने करतो. ऑर्गेनिक जीवनशैली आपण अंगीकारू शकतो, हे आम्हाला लोकांना पटवून द्यायचं आहे.

शेतीबरोबरच ऑर्गेनिक, घरच्या घरी बनवलेले साबण, शॅम्पू असं सगळंही विकायला सुरुवात केली. अर्थात मला माझं कलाक्षेत्र सोडायचं नाही. कारण मी अगदी लहानपणापासून स्वप्न पाहून, ठरवून या क्षेत्रात आले आहे; पण त्याचबरोबर शेतीकडेही लक्ष द्यायचं आहे.

(शब्दांकन - वैष्णवी कारंजकर)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com