कर्णबधिर दिनविशेष : वाहन परवान्यासाठी शिक्षणाची अट नाहीच! कर्णबधिरांनाही परवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहन परवान्यासाठी शिक्षणाची अट नाहीच! कर्णबधिरांनाही परवाना
वाहन परवान्यासाठी शिक्षणाची अट नाहीच! कर्णबधिरांनाही परवाना

वाहन परवान्यासाठी शिक्षणाची अट नाहीच! कर्णबधिरांनाही परवाना

सोलापूर : हिअरिंग एड (कानयंत्र) लावून अथवा न लावता सिग्नल ऐकू येणाऱ्या 18 वर्षांवरील कर्णबधिर (Deaf) व्यक्‍तीला वाहन चालविण्याचा परवाना (Driving License) मिळतो, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड (Archana Gaikwad) यांनी दिली. परंतु, त्याच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक तथा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्णबधिर व्यक्‍तींनाही वाहन चालविण्याचा अधिकार आहे. परंतु, त्याचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले हवे. वाहन परवान्यासाठी आठवी उत्तीर्ण ही अट आता कायमस्वरूपी हटविण्यात आली आहे. त्यामुळे कानयंत्र लावून ज्यांना सिग्नल अथवा आजूबाजूच्या वाहनांचा आवाज ऐकू येतो, अशांनाच परवाना दिला जाणार आहे. दरम्यान, त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. वाहन चालविताना त्याला चौकातील सिग्नलबद्दल माहिती असणे आवश्‍यक आहे. लाल, हिरवा, पिवळा रंग कशासाठी सिग्नलमध्ये वापरला जातो? डावीकडे, उजवीकडे वळताना काय करायला हवे, याचीही त्याला माहिती असायला हवी, असेही गायकवाड यांनी या वेळी सांगितले.

परभणी येथील राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनने मुबंई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाच्या निकालानुसार मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम आठमधील तरतुदीनुसार कलम सातच्या तरतुदीच्या अधीन राहून शारीरिक योग्यतेसंबंधीचा अर्ज व प्रतिज्ञापत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार त्या कर्णबधिर व्यक्‍तीला वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो. परंतु, त्या व्यक्‍तीला कानयंत्र लावून अथवा न लावता सिग्नल ऐकू येत नसल्यास त्यांना परवाना दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

परवान्यासंबंधी ठळक बाबी

  • आठवी उत्तीर्णची अट रद्द; वाहन परवान्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही

  • कानयंत्र लावून ऐकायला येणाऱ्या कर्णबधिर व्यक्‍तीला मिळतो वाहन चालविण्याचा परवाना

  • वाहन चालविण्याचा परवाना देण्यापूर्वी कर्णबधिर व्यक्‍तीला उत्तीर्ण व्हावी लागेल वाहनाची चाचणी

  • वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय मिळणार नाही वाहन परवाना

मेडिकल सर्टिफिकेट बंधनकारक

कर्णबधिर व्यक्‍तीला वाहन चालविण्याचा परवाना मिळतो, परंतु त्या व्यक्‍तीला कानयंत्र लावून ऐकायला येणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडे सक्षम वैद्यकीय अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सकांचे मेडिकल सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे.

- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर