सामाजिक कामाशी ‘दोस्ती’

दौंड तालुक्यातील गलांडवाडी हे २४०० लोकवस्तीचे गाव. पुरुषप्रधान परंपरेला छेद देत दहा वर्षांपूर्वी गावातील दोस्ती ग्रुपच्या महिलांनी एकत्रित येऊन ग्रामविकास, समाजसेवा व आरोग्याचे व्रत स्वीकारले.
Dosti Group Womens Galandwai
Dosti Group Womens GalandwaiSakal

- प्रकाश शेलार

दौंड तालुक्यातील गलांडवाडी हे २४०० लोकवस्तीचे गाव. पुरुषप्रधान परंपरेला छेद देत दहा वर्षांपूर्वी गावातील दोस्ती ग्रुपच्या महिलांनी एकत्रित येऊन ग्रामविकास, समाजसेवा व आरोग्याचे व्रत स्वीकारले. चूल आणि मूल या पारंपरिक संकल्पनेतून बाहेर पडत उच्चशिक्षित महिलांनी सर्वप्रथम नारायणी भिशी गट व राजमाता जिजाऊ बचत गट सुरू केला.

गावातीलच माहेर व‌ सासर असणाऱ्या ज्योती शितोळे यांनी सर्वप्रथम महिलांना एकत्रित येण्यासाठी प्रोत्साहित केले. सुरुवातीला अनेक महिला ग्रामसभेत येत नव्हत्या, महिलांनी ग्रामसभेत यावे म्हणून शितोळे यांनी उपस्थित राहणाऱ्या महिलांना लकी ड्रॉ योजना अमलात आणली व हळूहळू महिलांची उपस्थिती ग्रामसभेला दिसू लागली.

ज्योती शितोळे यांनी‌ गावातील अनामिका भापकर, पल्लवी कदम, सविता देवकर, वर्षा देवकर, समाधानी भापकर, सुनीता छाजेड, स्वाती नहाठा, सारिका कदम, कांचन चव्हाण, निर्मला पाडळे, ललिता मांढरे व रोहिणी शेडगे आदी महिलांचा दोस्ती ग्रुप तयार केला.

सर्वप्रथम महिलांनी महिन्यातून एकदा ग्रामस्वच्छता करण्याचा ध्यास घेतला. याशिवाय गावातील मुख्य कार्यालये व स्मशानभूमी परिसर स्वच्छ केला. याशिवाय गावामध्ये आरोग्य शिबिर, पशुधन शिबिर, रेशनिंग कार्डसाठी महसूल शिबिर घेण्याचा पुढाकार घेतला. लोकसहभागातून २२ फाटा ते गलांडवाडी रस्त्याच्या दुतर्फा हजारो झाडे लावली व झाडांची संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.

२०१९ मध्ये सातारा व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून गावात घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तू व धान्य जमा केले. वढू (ता. हवेली) येथील माहेर संस्थेला भेट देत येथील विद्यार्थ्यांना अन्नदान, जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत केली. मासूम संस्थेच्या वतीने गावातील महिलांसाठी आरोग्य तपासणी घेण्यात आले. शौचालयाबाबत महिलांनी घरोघरी फिरून जागृती केली. आज गावात १०० टक्के शौचालये आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या काळात ग्रुपमधील अनेक महिलांनी अध्यापनाचे काम केले. अखंड हरिनाम सप्ताह असतो, त्यावेळी दोस्ती ग्रुपच्या महिला सर्व नियोजन करत असतात. सप्ताह काळात गावातील प्रत्येक कुटुंबामध्ये सायंकाळची चूल बंद असते. कीर्तन सायंकाळी सात ते नऊ असते. नऊनंतर गावातील सर्व कुटुंबे जेवण्यासाठी एकत्रित येतात. सुरुवातीस महिलांची पंगत असते व त्यानंतर पुरुष जेवतात.

ग्रुपमधील एका महिलेच्या पतीचे आकस्मिक निधन झाल्यानंतर ग्रुपमधील महिलांनी त्यांना कुंकू लावत रुढी व परंपरेला छेद दिला आहे. या ग्रुपचा आदर्श घेत इतर गावातील महिलाही पुढे येऊन सामाजिक काम करण्यासाठी अग्रेसर झाल्या आहेत.

गावातील सर्व सामाजिक उपक्रमांसाठी, सण उत्सवासाठी एकत्रित येणारा दौंड तालुक्यातील आमचा हा आगळावेगळा ग्रुप आहे. सर्व उपक्रमांत आमच्या कुटुंबीयांचा पाठिंबा असतो. हा ग्रुप म्हणजे आमचे दुसरे कुटुंबच आहे.

- ज्योती शितोळे, संस्थापक, ‘दोस्ती’ ग्रुप

तुमचाही असा वेगळं काम करणारा ग्रुप असेल, तर आम्हाला त्याच्याविषयी लिहून नक्की पाठवा. शब्दमर्यादा पाचशे शब्द. ग्रुपच्या कामाशी संबंधित फोटो नक्की पाठवा. त्यासाठीचा ई-मेल : maitrin@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com