झूम : ‘ऑफरोड’, लाईफस्टाईलसाठी आदर्श ‘जिम्नी’

‘ऑटो एक्स्पो२०२३’मध्ये मारुती-सुझुकीने ‘जिम्नी’ ही एसयूव्ही श्रेणीतील ऑफरोडिंग कार प्रदर्शित केल्यानंतर मारुती-सुझुकीच्याच एक काळ गाजवलेल्या ‘जिप्सी’च्या आठवणी ताज्या झाल्या.
maruti jimny
maruti jimnysakal

‘ऑटो एक्स्पो२०२३’मध्ये मारुती-सुझुकीने ‘जिम्नी’ ही एसयूव्ही श्रेणीतील ऑफरोडिंग कार प्रदर्शित केल्यानंतर मारुती-सुझुकीच्याच एक काळ गाजवलेल्या ‘जिप्सी’च्या आठवणी ताज्या झाल्या. जिप्सीचा भारतातील ३४ वर्षांचा प्रवास २०१९मध्ये संपुष्टात आला; परंतु आधुनिक काळाशी सुसंगत अशी रचना असलेल्या ५-डोअर ‘जिम्नी’च्या एंट्रीमुळे कारप्रेमी विशेषत: ऑफरोडिंग करणाऱ्यांना तिची प्रचंड उत्सुकता आहे. प्रथमच राईडची संधी मिळाल्यानंतर ‘जिम्नी’ची खाचखळगे, तीव्र वळणाच्या रॉकी रस्त्यांवर ऑफरोडिंग केली. या सर्व राईड्सनंतर एकच म्हणू शकतो, की आताच्या स्पर्धात्मक युगात जिम्नीचा स्वत:चा वेगळा ‘स्वॅग’ आहे, जो तिच्याकडे आकर्षित करू शकतो.

डेहराडूनच्या (उत्तराखंड) मालदेवता येथील नदीपात्रात जिम्नीच्या ऑफरोडिंगचा विविध टप्प्यात अनुभव घेतला. ‘लेट्स फ्लेक्स सम मस्सल्स’, ‘ॲडव्हेंचर ऑन रॉक’, ‘द साईड क्वेस्ट’, ‘जिम्नी गोज स्विमिंग (वॉटर वेडिंग)’, ‘ॲन ॲडव्हेंचर ऑफ मेनी डिग्रीज’ असे हे टप्पे होते. अवघड आणि अरुंद चढ, दगडी चढ-उतार आणि तीव्र वळणाच्या मार्गातून कोणतेही धक्के न जाणवता जिम्नी सहज मार्गक्रमण करते. २१० मिलिमीटर ग्राऊंड क्लिअरन्स असताना ३१० मिमी खोलीच्या पाण्यातूनही जिम्नी सहज जाते.

सर्व टप्पे पार पाडल्यानंतर पॉवर डिलिव्हरी, थ्री-लिंक सस्पेन्शनमुळे होणारी धक्केविरहित राईड, ३६ डिग्रीचा अॅप्रोच अँगल, ५० डिग्रीचा डिपार्चर अँगल, २४ डिग्रीचा रँप ओव्हर (या सर्वांचा पुढील भागात उहापोह करणार आहोत) आदींमुळे जिम्नीच्या क्षमतेचा अंदाज येतो. यात फोर व्हील ड्राईव्हसाठी दिलेला गिअर लिव्हर हाताळण्यास सुलभ आहे. यामध्ये २ एच (फक्त मागील चाकांना ताकद मिळते), ४ एच (सर्व चाकांना ताकद मिळते) आणि ४ एल असे तीन ड्राईव्ह मोड मिळतात, जे रस्त्याच्या परिस्थितीनुसार बदलू शकतो.

जिम्नीत ६ एअर बॅगसह इतर आधुनिक सुरक्षात्मक फीचर्स दिले आहेत. यातील ‘हिल डिसेंट कंट्रोल’ (एचडीसी) हे फीचर उताराला केवळ एक्सलरेशनच्या साह्याने ब्रेक न दाबताही गाडीचा वेग नियंत्रित करते; तर ‘हिल होल्ड असिस्ट’ (एचडीए) हे फीचर चढावर असताना वाहनाला पाठीमागे जाण्यापासून रोखते. जिम्नीमध्ये ‘ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरिन्शिअल’ फीचर असून, ते एखाद्या चाकाला रस्त्यावर पकड (ग्रीप) न मिळाल्यास स्वयंचलित पद्धतीने ब्रेक घेते आणि इतर तीन चाकांमध्ये टॉर्क जनरेट करून गाडीचा पुढील मार्ग सुकर करते.

...असे आहे इंजिन, सस्पेन्शन

जिम्नीमध्ये १.५ लिटर के१५बी, ४ सिलिंडर, १४६२ सीसी क्षमतेचे नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे- जे ६००० आरपीएमला १०५ एचपी ताकद, ४००० आरपीएमला १३४ एनएम टॉर्क निर्माण करते. यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ४ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.

जिम्नीत ऑफ रोडिंगला सुसंगत लॅडर फ्रेम चेसी, ३-लिंक दणकट एक्सल सस्पेन्शन दिले असून, ते खडबडीत रस्त्यांवर कारमध्ये स्थिरता राखण्यासाठी टायरचा रस्त्याशी संपर्क वाढवते. जिम्नीमध्ये अल्फा (टॉप) आणि झेटा (बेस) असे दोन व्हेरिएंट येतात. जिम्नीच्या किमतीबाबत अद्यापही सस्पेन्स ठेवला आहे.

जिम्नी का घ्यावी?

भारतीय बाजारात जिम्नीच्या स्पर्धेत अन्य तीन कंपन्यांची वाहने आहेत; परंतु या तिन्हींच्या तुलनेत साधारण लुक असला तरी ऑल ग्रीप, ऑल टेरियन, ऑफरोडिंग कॅपेबलिटीजमुळे आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची क्षमता जिम्नीमध्ये आहे.

बॉक्सी लूक, पाच दरवाजे, ऑफरोडिंगला सुसंगत रचना, सर्व बाजूंनी नियंत्रित आकारमान, आधुनिक आणि पुरेसे सुरक्षात्मक फीचर्स, रोड प्रेजेन्स, वजनाने हलकी (१२०५ किलो ग्रॅम) त्यामुळे सुलभ हँडलिंग आदी तिच्या जमेच्या बाजू आहेत.

ऑफरोडिंग वाहनामध्ये आरामदायी प्रवासाची अपेक्षा नसते; तरीही जिम्नीच्या केबिनमध्ये ड्रायव्हरसह चारजणांसाठी पुरेसी जागा आहे. त्यामुळे पहिले ऑफरोडिंग आणि नंतर लाईफस्टाईल (दैनंदिन वापराचे) वाहन म्हणून जिम्नीकडे नक्कीच पाहू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com