उद्योजकतेला चालना

पाच वर्षांपूर्वी ‘आपला आवाज आपली सखी’ या ग्रुपची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी १५ हजार महिलांचा समावेश होता.
aapla aawaj aapli sakhi group
aapla aawaj aapli sakhi groupsakal

- संगीता तरडे, संस्थापक, राज्यस्तरीय महिला उद्योजक ग्रुप

पाच वर्षांपूर्वी ‘आपला आवाज आपली सखी’ या ग्रुपची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी १५ हजार महिलांचा समावेश होता आणि या ग्रुपला प्रतिसाद एवढा चांगला मिळत होता, की लगेच दुसऱ्याच वर्षी या ग्रुपमध्ये साठ हजार महिला सहभागी झाल्या.

या ग्रुपची सुरुवात करण्याचं कारण असं, की मला पहिल्यापासूनच नेतृत्व करण्याची आवड होती. महिलांनी एकत्रपणे काम सुरू केलं, तर खूप काही बदल होऊ शकतो हा विचार मनात घेऊन या ग्रुपची सुरुवात झाली. महिला एकत्र आल्या, तर कोणतीही क्रांती घडू शकते. मग ते समाजकार्य असो, वा एंटरटेनमेंट असो.

या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही महिलांना त्यांच्यामधील कला-गुण, कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ तयार करून दिलं होतं. सुरुवातीला वर्षभर त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट रिलेटेड कार्यक्रम घेतच होतो; परंतु कोविड काळ आल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना कामाची कमतरता भासू लागली. त्यांच्यासाठी काम शोधून देण्याची मागणी वाढू लागली.

ग्रुपमध्ये बऱ्याच शिकलेल्या महिला सहभागी होत्या. त्यांची काहीही काम करण्याची तयारी होती, त्यामुळे त्यावेळी मला असं वाटलं, की, ज्या महिलांना कामाची गरज आहे, उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे अशा महिलांसाठी प्लॅटफॉर्म तयार करून द्यावा.

त्याचवेळी ‘आपला आवाज आपली सखी’च्या माध्यमातूनच मी ‘राज्यस्तरीय महिला उद्योजिका ग्रुप’ तयार केला. यामध्ये ज्यांना काम करण्याची, व्यवसाय करण्याची आवड आहे, त्या सर्व महिलांना एकत्रित केलं. हा ग्रुप सुरू झाल्यानंतर त्यांना लगेच सोशल मीडिया ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.

म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही लाखोंचा व्यवसाय कसा करू शकता, किंवा व्यवसाय कसा पुढं नेऊ शकता यावर ट्रेनिंग देणं सुरू केलं. सुरुवातीला सर्व महिलांकडून आम्ही एक फॉर्म भरून घ्यायला लागलो. त्यामध्ये कोणत्या व्यवसायाकडे कल आहे, त्यांची मागणी या विषयाबाबत सर्वेक्षण करायला सुरुवात केली. अगदी कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळावी याबद्दल मार्गदर्शन करायला लागलो.

एवढ्या महिलांमध्ये काही महिलांची प्रॉडक्शन तयार करण्याची क्षमता होती, तर काही महिलांना मार्केटिंग चांगल्या प्रकारे जमत होतं. गावाकडच्या ज्या महिलांचा कुरडई, पापड बनवण्याचा व्यवसाय होता; पण व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्या माध्यमाचा वापर करावा याबद्दल काही माहीत नव्हतं. त्यावेळी आमच्या ग्रुपमधल्या अनेक महिलांनी त्या महिलांकडून या वस्तू विकत घेऊन स्वतःचा ब्रॅंड तयार करून रिसेलिंगचा व्यवसाय सुरू केला.

यामुळे दोन्ही स्तरांतील महिलांना फायदा होऊ लागला. स्त्रियांनी बनवलेल्या कुरडई पापडांचा व्यवसाय खूप वाढला आणि अनेक महिलांचा रिसेलिंगचा व्यवसाय जम धरू लागला. आम्ही अनेक महिलांना अशा सूचना देतो, की तुम्ही एकमेकींच्या उद्योगाला सपोर्ट करा. घरी कोणाचाही वाढदिवस असेल, तर बाहेरून केक घेण्यापेक्षा ग्रुपमध्ये ज्या महिलांचा केकचा व्यवसाय आहे त्यांच्याकडून केक घ्या. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ग्रुपमधल्या सदस्यांच्या व्यवसायाला चालना मिळाली आणि ग्रुपचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत गेला.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com