फॅशन ट्रेंड्स : दिसा ‘खण’खणीत!

थोडा बदल हवा म्हटले, की जुनी फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये येते. हल्लीच्या वेस्टर्न ट्रेंडमध्येही पारंपरिक वेशभूषा आणि दागिन्यांचा प्रभाव अगदी स्पष्ट दिसून येते.
fashion trends
fashion trendssakal

- पृथा वीर

थोडा बदल हवा म्हटले, की जुनी फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये येते. हल्लीच्या वेस्टर्न ट्रेंडमध्येही पारंपरिक वेशभूषा आणि दागिन्यांचा प्रभाव अगदी स्पष्ट दिसून येते. भलेही जुन्या वळणाचे कपडे, दागिने घालण्याची पद्धत बदलली. तरीही पारंपरिक वेशभूषेचे महत्त्व आजही कायम आहे. फॅशन जगतानेच मागे पडलेली खणाची फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये आणली आहे. त्यात अनेक सेलेब्रिटींनी खणचा ट्रेंड उचलून धरला आणि पुन्हा या पारंपरिक प्रकाराचे महत्त्व अधोरेखित झाले.

पूर्वी बालपणी परकर-पोलके घालण्याची पद्धत होती. मुलगी वयात येईपर्यंत परकर-पोलके वापरले जायचे. हे परकर-पोलके मुख्यत्वे खणाचे असायचे. पूर्वी बायका घरीच शिवणकाम करत कपडे शिवायच्या. केसाला घट्ट रिबीनी लावलेल्या दोन वेण्या, पायात पैंजण, पोटापर्यंत उंचीचा पोलका आणि पायाच्या लांबीइतका परकर असा बहुतेक मुलींचा पेहराव असे. त्या काळी धारवाडी खणाचे परकर-पोलकी हा प्रकार हमखास दिसायचा. आता हाच ट्रेंड परतला आहे.

या खणाचा इतिहास जवळपास ४०० वर्षांपूर्वीचा आहे. चालुक्य राजघराण्याच्या काळात हे वस्त्र नावारूपास आले. कर्नाटकासोबत विदर्भ व मराठवाडा हे खणाच्या कापडाचे माहेरघर. खण स्वतंत्र असे वस्त्र. गेल्या दोन- तीन वर्षे पुन्हा एकदा ‘खणा’ची फॅशन ट्रेंडमध्ये आली आहे. पूर्वी फक्त खणाचे ब्लाऊज शिवले जायचे. आता हा प्रकार फक्त चोळी म्हणजेच ब्लाऊजपुरता मर्यादित न राहता साडी, बॅग, पाऊच आदींमध्येही आला आहे. ठेवणीतल्या जरीकाठाच्या साडीला अपसायकलिंग करून परकर-पोलके शिवण्याचा प्रकारही खूप रूळला आहे. खणाची साडी तर कोणत्याही कॅज्युअल कार्यक्रमापासून ते ऑफिसच्या कार्यक्रमात खुलून दिसते. खणाचे पंजाबी ड्रेससुद्धा एथनिक लूक देतात. गोल गळा, चौकोनी गळा, त्रिकोणी गळा, मटका गळा आणि स्लीवलेस पँटर्न अशा वेगवेगळ्या प्रकारात खणाचे ड्रेस शिवता येतात.

सौंदर्यात भर घालणारा आणि स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दागिने, ज्वेलरी. हल्ली पारंपरिक मोती, गोल्डन ज्वेलरीबरोबरच ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीलाही पसंती दिली जात आहे. त्यातही चोकर, कानातले, नथ यांची चलती आहे. खणाच्या साडीसोबत ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खुलून दिसते. पारंपरिक लूकला थोडा वेस्टर्न टच देण्यासाठी खणाच्या ब्लाऊज डिझाइनमध्ये ऑफ शोल्डर, हायनेक, कोल्ड शोल्डर, बॅकलेस, स्लीवलेस असे विविध प्रयोग केले जातात. त्यामुळे साडी पारंपरिक असली तरी खणाच्या ब्लाउजच्या डिझाइनमुळे वेगळा आणि आकर्षक लूक येतो.

हे करून पाहा

  • खणाची साडी, ड्रेससोबत ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातल्यास वेगळाच ट्रेंडी लूक मिळतो.

  • वजन जास्त असलेले दागिने नको असल्यास मोत्याचे दागिने हा उत्तम पर्याय आहे.

  • खणाच्या साडीवर तीन किंवा चार पदरी चोकर, त्यावर ठसठशीत कानातले, नाजूक नथ या ऑक्सिडाइज ज्वेलरीमुळे इंडो वेस्टर्न लूक मिळतो.

  • खणाची साडी आणि इतर एक्सेसरीजचा सध्या ट्रेंडमध्ये साध्या पंजाबी ड्रेसवर खणाचा दुपट्टा उत्तम.

  • खणामध्ये खूप सुंदर रंग अलीकडे मिळतात. त्यामुळे कोणत्याही रंगाच्या पारंपरिक ड्रेस अथवा कुर्तीसोबत हे सुंदर काठाचे खणाचे दुपट्टे मॅच करता येतात.

  • पायात मस्त पारंपरिक चपला अथवा मोजडी कॅरी केली तर अजूनच छान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com