शाश्वत, पर्यावरणपूरक ‘कॉटन कल्चर’

कॉटन वस्त्र फॅशन ट्रेंडचा शाश्वत पर्याय. विशेषतः आजच्या जीवनशैलीमध्ये तर कॉटन कपडे अनिवार्य आहेत.
शाश्वत, पर्यावरणपूरक ‘कॉटन कल्चर’

- पृथा वीर

कॉटन वस्त्र फॅशन ट्रेंडचा शाश्वत पर्याय. विशेषतः आजच्या जीवनशैलीमध्ये तर कॉटन कपडे अनिवार्य आहेत. भलेही कॉटन कपडे ग्लॉसी वाटत नसले, तरी कॉटनइतके आरामदायी वस्त्र नाही.

जगातील सात उद्योग विविध प्रकारचे प्रदूषण करतात. यामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. केमिकलयुक्त डाय, पॅकेजिंग, ट्रान्स्पोर्टेशन, इतकेच नव्हे तर कपडे ड्रायक्लीन करणेसुद्धा प्रदूषणाचाच भाग आहे. परिणामी एकीकडे फॅशन इंडस्ट्री जोमाने सुरू असली, तरीही दुसऱ्या बाजूने आपण सगळेच पर्यावरणाच्या हानीमध्ये प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभागी होतोय.

त्यामुळे फॅशन फॉलो करताना त्याच्याशी संबंधित इतर घटकांचे, दुष्परिणामांचेही भान हवे. कॉटनचे कपडे वापरून एकप्रकारे आपण शाश्वत फॅशन ट्रेंडचे भागीदार होतो. जबाबदारीने फॅशन फॉलो करण्याच्या या ट्रेंडला ‘स्लो फॅशन’ किंवा ‘टिकाऊ फॅशन’ म्हणूनही ओळखले जाते.

कॉटनचे कपडे म्हणजे सुती वस्त्र. हे कापसापासून तयार होतात आणि कापूस पर्यावरणपूरक आणि जैवविघटनशील फॅब्रिक आहे. त्यातल्या त्यात सेंद्रिय कापूस हा आरोग्यदायी पर्याय आणि टिकाऊ फॅब्रिक आहे. सेंद्रिय कापसाचे उत्पादन घेताना कृत्रिम खते, कीटकनाशके किंवा इतर विषारी रसायनांचा वापर केला जात नसल्याने तो पर्यावरणास अनुकूल आहे. या कापसापासून तयार झालेले सुती कपडे ॲलर्जी आणि त्वचारोग टाळण्यास मदत करतात. हेच भान असल्याने भारतातील ऑर्गेनिक फॅब्रिक कपड्यांचे ब्रँड लोकप्रिय होत आहेत.

अगदी परवडणाऱ्या दरात आणि पारंपरिक लूक आणि स्टाईल यांचा मेळ असलेल्या साऊथ कॉटन साड्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या साड्या वजनास हलक्या असतात. शिवाय त्यांच्यामुळे व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र छाप पडते. कॉटन साडीवर कॅज्युएल ज्वेलरी छान दिसते आणि ठसठशीत दागिने खूप उठून दिसतात.

कॉटन साडीवर ‘कॉन्ट्रास्ट’ ट्रेंड उठून दिसतो. साडीच्या रंगाच्या ब्लाऊजऐवजी विरुद्ध रंगाचा ब्लाऊज साडीला वेगळा लूक देतो. पश्चिम बंगालची प्रसिद्ध साडी म्हणजे ‘मसलिन साडी!’ तिलाच ‘मल कॉटन साडी’ असेही म्हणतात. तलम मसलिन जगभर ‘ढाका मसलिन’ म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे ‘मसलिन’चं तलम कापड फक्त हातानंच तयार होऊ शकते. ही साडीसुद्धा कम्फर्टेबल म्हणून आवर्जून घेतली जाते.

कॉटनचे कुर्तेही छान दिसतात आणि आरामदायी वाटतात. भारतात ऑर्गेनिक फॅब्रिक कपड्यांचे ब्रँड अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. या फॅब्रिकचे कपडे त्वचेवर सौम्य वाटतात. या फॅब्रिकचे कपडे पारंपरिक कपड्यांपेक्षा अधिक टिकाऊ असतात. अलीकडे कॉटन कपडे विविध आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत आणि अधिकाधिक फॅशनेबल होत आहेत.

कॉटनचे कपडे निवडताना ते ग्लोबल ऑर्गेनिक टेक्स्टाईल स्टँडर्डनुसार आहेत का हे बघा. या प्रमाणपत्रासाठी पात्र होण्यासाठी त्या कापडामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त सेंद्रिय फायबर असणे आवश्यक आहे. ज्या उत्पादनांमध्ये ‘ऑर्गेनिक’ कॉटन शब्द असतो, त्या उत्पादनांमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा जास्त सेंद्रिय फायबर आवश्यक आहे.

फॅशन ट्रेंडला जबाबदारीचे भान

  • नवीन खरेदी करण्याऐवजी आपण सेकंडहँड कपडेही खरेदी करू शकतो. सोशल मीडियावर सेकंड हँड शॉप्स आणि सेकंड साईट्स भरपूर आहेत

  • तुमच्या वॉर्डरोबमधील कपड्यांचे अपसायकलिंग करता येते. जसे जुन्या कपड्यांपासून पिशव्या, कुशन, पडदे, कलाकृती, ॲक्सेसरीज तयार करणे.

  • अनेक व्यावसायिक जुने कपडे खरेदी करतात आणि त्यातले चांगले भाग वापरून पूर्णपणे नवीन ड्रेस तयार करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com