esakal | वजन कमी करताना केस, त्वचेकडेही द्या लक्ष; वाचा काही सोप्या टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

weight loss

वजन कमी करताना केस, त्वचेकडेही द्या लक्ष; वाचा काही सोप्या टिप्स

sakal_logo
By
स्वाती वेमूल

वजन कमी करण्याच्या प्रवासात अनेकदा केस आणि त्वचेकडे दुर्लक्ष होतं. वजन कमी करण्यावर इतकं लक्ष केंद्रीत केलं जातं की त्यामुळे केसांवर आणि त्वचेवर काय परिणाम होतोय, याचा विचार केला जात नाही. चेहऱ्याचा तजेलदारपणा नाहीसा होतो आणि केसांनाही योग्य ते पोषण मिळत नाही. यावर काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास, वजन कमी करताना केस आणि चेहऱ्यावरील चमकही कायम राखता येईल. मात्र उपाय म्हणून सौंदर्यप्रसाधनांचा वापर न करता आपल्या आहार आणि जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे. (Simple tips to improve hair and skin quality during weight loss)

आहारतज्ज्ञ पूजा मखिजा यांनी रोजच्या जीवनातील काही आवश्यक टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्सद्वारे वजन कमी करतानाही केसांची आणि त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

'वजन कमी करताना अनेकजण चेहऱ्यावरील उजळ गमावून बसतात. जर तुम्ही आहारात विचारपूर्वक काही गोष्टींचा समावेश केला तर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासोबतच तुमच्या केसांचं आणि त्वचेचं आरोग्य जपता येईल', असं कॅप्शन देत पूजा मखिजा यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

- त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी हे सर्वांत महत्त्वाचं आहे, हे विसरू नका.

- अत्यंत कमी कॅलरी (low calorie diets) असलेल्या आहाराचे सेवन केल्याने स्नायू कमकुवत होतात आणि कोलेजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अशा आहारापासून दूर रहा.

- दररोज एक ग्लास व्हेजिटेबल ज्यूस प्या.

- काकडी, गाजर, बीट, मिरची, टोमॅटो, पाणी आणि लिंबू यांपासून हा ज्यूस बनवून प्या.

हेही वाचा: पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' ५ भाज्या

ज्यूस बनवण्याची प्रक्रिया-

काकडी, गाजर, बीट, मिरची, टोमॅटो हे थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्या. त्यात थोडा लिंबूचा रस मिसळून लगेच प्या.

- काकडीमुळे शरीराला थंडावा मिळेल आणि गाजरमध्ये बेटा कॅरोटिनचं प्रमाण अधिक असतं. बीटमध्ये लोह आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन असते. व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेल्या हिरव्या मिरचीसह हे पदार्थ एकजीव करून प्यायल्यास शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. केस आणि त्वचेसाठी हे ज्युस अत्यंत फायदेशीर आहे, असं मखिजा यांनी सांगितलंय.

- प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करू नका.

- नारळाचं तेल, बिया, दाणे, सुका मेवा यांचा आहारात समावेश करा.

शरीराला आतून पोषण मिळाल्यास त्याचा परिणाम बाहेरही दिसून येतो. त्यामुळे वजन कमी करताना या साध्या सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा.

loading image