बहिणी ते घट्ट मैत्रिणी

मैत्रीची परिभाषा प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. कोणी आपल्या वर्गमैत्रिणीत आपली मैत्रीण शोधते, तर कोणी आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीत आपली मैत्रीण शोधते. कोणी आपल्या आईमध्ये मैत्रीण शोधते, तर कोणी आपल्या बहिणीमध्ये. अशीच मैत्री आहे अभिनेत्री सुरभी हांडे आणि श्रीनिधी हांडे यांची.
sister
sistersakal

मैत्रीची परिभाषा प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. कोणी आपल्या वर्गमैत्रिणीत आपली मैत्रीण शोधते, तर कोणी आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीत आपली मैत्रीण शोधते. कोणी आपल्या आईमध्ये मैत्रीण शोधते, तर कोणी आपल्या बहिणीमध्ये. अशीच मैत्री आहे अभिनेत्री सुरभी हांडे आणि श्रीनिधी हांडे यांची. तसं तर या दोघी सख्ख्या बहिणी; पण त्या पलीकडेही या दोघी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्‍सदेखील आहेत.

सुरभी म्हणाली, ‘‘श्रीनिधी माझी धाकटी बहीण आहे. आमच्यामध्ये साडेपाच वर्षाचं अंतर आहे. आम्ही घरात तिला लाडानं चिनू म्हणतो. आपण लहानाचे मोठे होत असताना अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येत असतात. अनेक मित्र-मैत्रिणी बनतात; पण कालांतराने आपली धाकटी भावंडं जेव्हा वयाच्या त्या टप्प्यात येतात, तेव्हा आपण त्यांच्याशी काही गोष्टी शेअर करू शकतो आणि आपली भावंडंदेखील त्यावर रिॲक्ट करू शकतात. हे सर्वांसोबतच होतं, तसं आमच्यासोबतही झालं. चिनू मोठी होत गेली, तसं आमच्यातील बहिणीच्या नात्यानं मैत्रीचं रूप घेतलं आणि आता आम्ही दोघी एकत्र असलो ना, तर आम्हाला कोण्या दुसऱ्या मैत्रिणीची गरज नाही पडत.’’

श्रीनिधी सांगत होती, ‘‘जेव्हा आपल्याला कुटुंबाव्यतिरिक्तच्या बाहेरच्या जगात वावरत असताना काही अनुभव येतात, तेव्हा आपण आपल्या घरच्यांशी, स्पेशली आपल्या ताई- दादांशी जास्त कनेक्ट होत जातो. मग त्यात गोष्टी शेअर करणं आलं, सिक्रेट्स ठेवणं आलं, एकमेकांना सांभाळून घेणं आलं. अशा रीतीनं वयाचे टप्पे पार करत असताना आमच्यात मैत्रीचं नातं रुजत गेलं. ताई माझी मोठी बहीण असली, तरी तिच्याशी माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करताना मला कधीही दडपण आलं नाही. कारण माझे एकेक घोटाळे जरी तिला सांगितले, तरी त्यावर ती कशी आणि काय रिॲक्ट करेल हे मला माहिती आहे. त्यामुळे मी बऱ्याचदा असे घोटाळेदेखील ताईला सांगितले आहेत. तसं आमच्या घरातलं वातावरण खूप फ्री आहे; पण ताई माझा कंफर्ट झोन आहे. तिच्याशी मनातल्या गोष्टी शेअर केल्यानंतर मला खूप रिलॅक्स वाटतं. म्हणूनच आमचं नातं ‘सिस्टर कम बेस्ट फ्रेंड’ आहे.’’

स्वभावाबद्दल बोलताना सुरभी म्हणाली, ‘‘चिनू हे एक आनंदी व्यक्तिमत्त्व आहे. ती नेहमी हसतमुख असते. मी तिला कधीही हताश झालेलं, टेंशनमध्ये असलेलं नाही पाहिलंय. ती बिनधास्त आणि मुक्त विचारांची आहे. तिला नेहमी खूश राहायला आवडतं. तिचा मला आवडणारा गुण म्हणजे, तिला एखाद्याची कोणतीही गोष्ट आवडली, किंवा ती पटली तर ती गोष्ट चिनू आत्मसात करण्यासाठी नेहमी प्रयत्न करते. चिनू माझ्या आसपास असते, तेव्हा मीही खूश असते. आमचे दिवसातून बऱ्याच वेळा फोन कॉल्स होतात. तिच्याशी फक्त पाच मिनिटं जरी बोलले, तरी माझ्या दिवस मस्त जातो. चिनू माझ्या रिलॅक्स पॉइंट आहे. तिचा आनंदी स्वभाव मला नेहमीच आवडतो; परंतु तिला गरज नसताना कधीकधी सल्ले देण्याची सवय आहे. ते मला बिलकुल नाही आवडत. बाकी ती मस्त आहे.’’

श्रीनिधी म्हणाली, ‘‘मला ताईची तिच्या कामाप्रती असलेली एकनिष्ठता खूप आवडते. ती प्रचंड जिद्दी आहे. तिनं एकदा ठरवलं, की ती ते काम केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तिचा हा गुण मला आवडतो. ती माझ्यासाठी माझी मोठी बहीण म्हणूनही नेहमीच प्रोटेक्टिव्ह असते; परंतु कधीकधी तिचा राग खूपच जास्त अनावर होतो. तिनं तो थोडा कमी केला पाहिजे.’’ सुरभी म्हणाली, ‘‘आमच्या नात्यात खूप पारदर्शकता आहे, ज्यामुळे आम्हाला एकमेकींच्या कोणत्या गोष्टी नाही पटल्या, तर त्या आम्ही एकमेकींच्या तोंडावर सांगतो. हा विश्वास प्रत्येक नात्यात असला पाहिजे, जिथं आपण मनात काहीही न ठेवता मुक्तपणे बोललं पाहिजे. मैत्री हे नातं खूप खास असतं. ज्यामध्ये कोणतीही बंधनं असत नाहीत. फक्त असते ते बिनाशर्तीचं आणि निरपेक्ष प्रेम. आमचं नातं असंच आहे. भलेही आम्ही बहिणी आहोत; पण त्यापेक्षाही जास्त आम्हाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम आमच्यातली मैत्रीच करते.’’ (शब्दांकन : मयूरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com